मुसळगावात 220 केव्हीचे वीज उपकेंद्र

सिन्नरच्या पारेषण व्यवस्थेला बळ

300 एमव्हीए क्षमतेची भर पडणार; 121 किमी पारेषण वाहिन्या उभारणार, वर्षभरात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य

सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील मुसळगाव येथे 220/132/33 केव्ही क्षमतेचे अतिउच्चदाब वीज उपकेंद्र उभारण्याच्या प्रकल्पाने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने (महापारेषण) या प्रकल्पासाठी स्थापन केलेल्या ‘मुसळगाव पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड’ या विशेष उद्देश कंपनीचा ताबा आरईसी पॉवर डेव्हलपमेंट अँड कन्सल्टन्सी लिमिटेडकडून घेतला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती मिळणार असून, सिन्नरसह नाशिक परिसरातील वाढती वीज मागणी पूर्ण करण्यास मदत होणार आहे.
महापारेषणने दराधारित स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेतून बांधा-मालकी-चालवा-हस्तांतरित करा, या पद्धतीअंतर्गत हा प्रकल्प मिळविला आहे. विशेष उद्देश कंपनीचा ताबा हस्तांतरित झाल्यानंतर 9 सप्टेंबर रोजी महापारेषण आणि महाराष्ट्र राज्य पारेषण उपयुक्तता यांच्यात वीज पारेषण सेवा करार करण्यात आला. प्रकल्प 12 महिन्यांत पूर्ण करून 8 सप्टेंबर 2027 पर्यंत व्यावसायिकरीत्या कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विक्रम कुमार, संचालक (प्रकल्प) दत्तात्रय पडळकर, संचालक (संचलन) सतीश चव्हाण आणि संचालक (वित्त) तृप्ती मुधोळकर यांच्या नेतृत्वाखाली हा महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यात आला. प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर नाशिक व परिसराच्या दीर्घकालीन वीज गरजा पूर्ण करण्यासह राज्याच्या वीज पारेषण पायाभूत सुविधांना आणखी बळकटी मिळणार आहे.

220 kV electricity substation in Musalgaon

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *