बनावट नंबरप्लेट लावून टोलनाका पार, फास्टॅग संदेशामुळे चोरीचा माग लागला
सिडको : प्रतिनिधी
अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अश्विननगर परिसरातून नगरसेविकेच्या घराबाहेर उभी केलेली ह्युंदाई क्रेटा कार गुरुवारी पहाटेच्या सुमारास चोरीला गेल्यानंतर चोरट्यांनी तिच्यावर बनावट नंबरप्लेट लावून ती संगमनेरच्या दिशेने नेल्याचा प्रकार समोर आला आहे.
वाहन हिवरगाव पावसा टोलनाक्यावरून पहाटे 5 वाजून 5 मिनिटांनी गेल्याचे फास्टॅगच्या संदेशातून स्पष्ट झाले. त्यानंतर टोलनाक्यावरील सीसीटीव्ही
फुटेज तपासले असता कारवर मूळ क्रमांकाऐवजी गुजरात पासिंगची नंबरप्लेट असल्याचे निदर्शनास आले.
अश्विननगरमधील राम निवास परिसरात गुरुवारी पहाटेच्या सुमारास एमएच 15 जेएस 8212 क्रमांकाची क्रेटा कार घराबाहेर उभी करण्यात आली होती. पहाटेच्या सुमारास ती चोरीला गेल्याचे लक्षात आले. सदर कार हार्दिक रमेश देवांग यांच्या मालकीची असून, ते नगरसेविका छाया देवांग यांचे पुतणे असल्याची माहिती आहे. कार चोरीला गेल्यानंतर काही अंतरावर मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या एक्स्प्रेस हॉटेलजवळ वाहनातील जीपीएस ट्रॅकर काढून टाकण्यात आल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे वाहनाचा माग काढण्यास अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय आहे. दरम्यान, पहाटे 5.05 वाजता क्रेटा संगमनेर येथील हिवरगाव पावसा टोलनाक्यावरून गेल्याचा फास्टॅग संदेश वाहनमालकाला मिळाला. त्यानंतर टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात संबंधित वाहन टोलनाका ओलांडताना दिसले. मात्र, वाहनावर मूळ एमएच 15 जेएस 8212 क्रमांकाऐवजी गुजरात पासिंगची नंबरप्लेट लावण्यात आल्याचे आढळून आले.
वाहन ज्या ठिकाणाहून चोरीला गेले ते ठिकाण अंबड पोलिस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस ठाण्याच्या जवळच वाहन चोरीला गेल्याने परिसरातील पोलिस गस्त आणि सुरक्षाव्यवस्थेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ‘नगरसेविकेच्या घराबाहेरूनच वाहन सुरक्षित नसेल, तर सर्वसामान्यांच्या वाहनांसह इतर खासगी मालमत्तेचे काय?’ असा सवालही नागरिकांकडून केला
जात आहे.
फास्टॅग, सीसीटीव्ही आणि जीपीएसच्या आधारे तपास
वाहन चोरीची माहिती मिळाल्यानंतर संबंधितांनी अंबड पोलिसांकडे तक्रार केली असून, अंबड पोलिस ठाण्यात वाहन चोरीला गेल्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. फास्टॅग व्यवहार, टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज आणि जीपीएस ट्रॅकरच्या आधारे तपास सुरू आहे. चोरीनंतर अवघ्या काही तासांत वाहनाने नाशिक जिल्ह्याबाहेर जाण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आल्याने पोलिसांकडून चोरट्यांचा माग काढला जात आहे. सत्ताधारी पक्षाच्या महिला लोकप्रतिनिधींची चोरीला गेलेले चारचाकी वाहन शोधून देण्याचे पोलिस यंत्रणेसमोर मोठे आव्हानच असल्याचे बोलले जात आहे.
‘नगरसेविका’ नावही हटविले
चोरीनंतर वाहनाची ओळख पटू नये यासाठी नंबरप्लेट बदलण्यासोबतच कारवर असलेले महापालिकेचे बोधचिन्ह आणि ‘नगरसेविका’ या नावाचे स्टिकरदेखील काढण्यात आल्याचे सीसीटीव्ही फुटेजच्या पाहणीतून समोर आले आहे. त्यामुळे वाहनाची ओळख लपविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय व्यक्त
होत आहे.
Creta stolen from outside incumbent corporator’s house