नाशिक

36 हजार कंपन्या बंद, कामगारांची सरकारकडे माहितीच नाही!

खासदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रश्नाने उद्योगधोरणावर गंभीर प्रश्नचिन्ह

पाच वर्षांत 36,211 खासगी कंपन्यांना टाळे

मुंबई-पुण्यानंतर नाशिकही ‘बंद’च्या यादीत

नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र हे देशाचे औद्योगिक इंजिन असल्याचा दावा केला जात असताना, केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या अधिकृत आकडेवारीने या दाव्यालाच मोठा धक्का दिला आहे. गेल्या पाच आर्थिक वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल 36,211 खासगी कंपन्या लिक्विडेट, विसर्जित किंवा कंपनी रजिस्टरमधून स्ट्राइक ऑफ झाल्या आहेत. खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
विशेष म्हणजे, औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या नाशिक जिल्ह्यात तब्बल 840 कंपन्या बंद झाल्या, तर पुण्यात 6,433, ठाण्यात 4,704, मुंबई शहरात तब्बल 12,009 आणि नागपुरात 1,478 कंपन्यांवर टाळे लागले आहे. संभाजीनगरमध्येही 654 कंपन्या बंद झाल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरातून ही आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे, कंपन्या बंद झाल्यानंतर किती कामगार बेरोजगार झाले, कितींची भविष्य निर्वाह निधी, उपदान आणि थकीत वेतनाची देणी आहेत, याची एकत्रित माहितीच केंद्रीय
कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडे उपलब्ध नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. यामुळे महाराष्ट्रात उद्योग बंद होण्याची वास्तविक व्याप्ती किती मोठी आहे आणि त्याचा थेट फटका किती कुटुंबांना बसला आहे, हा प्रस्न अधिक गंभीर बनला आहे.
खासदार राजाभाऊ वाजे यांनी संसदेत कंपन्या बंद होण्याबरोबरच विस्थापित कामगारांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही थेट उपस्थित केला. कंपन्या बंद झाल्यानंतर कामगारांना कायदेशीर देणी मिळाली का? भविष्य निर्वाह निधी, उपदान आणि थकीत वेतनाची रक्कम किती कामगारांना मिळाली? प्रभावित कामगारांसाठी विशेष पुनर्वसन योजना आहे का? या प्रश्नांची उत्तरे केंद्राकडून मागण्यात आली होती. मात्र, केंद्र सरकारने स्पष्ट केले की, खासगी कंपन्यांचे कामकाज बंद झाल्यामुळे प्रभावित झालेल्या कामगारांची माहिती मंत्रालयाकडे राखली जात नाही. कंपनी दिवाळखोरी प्रक्रियेत गेल्यास किंवा परिसमापनात गेल्यास कामगारांचे दावे संबंधित कायदेशीर प्रक्रियेत हाताळले जातात, असे सरकारने सांगितले. मात्र, महाराष्ट्रातील 36,211 कंपन्यांच्या प्रकरणात प्रत्यक्ष किती कामगार प्रभावित झाले, याचा एकत्रित आकडा केंद्राकडे नाही.
त्यामुळे ‘महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उद्योग येत आहेत’ या दाव्यासोबत ‘महाराष्ट्रातून किती उद्योग बाहेर पडत आहेत किंवा बंद होत आहेत?’ याचाही हिशेब सरकारने जनतेसमोर मांडण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

कुठल्या क्षेत्रात किती कंपन्या बंद?

♦ व्यवसाय सेवा क्षेत्र – 14,613
♦ उत्पादन, खाणकाम व उत्खनन – 6,582
♦ सामुदायिक, वैयक्तिक व सामाजिक सेवा – 3,361
♦ व्यापार – 4,196
♦ बांधकाम – 2,356
♦ वाहतूक, साठवणूक व दळणवळण – 1,336
♦ स्थावर मालमत्ता व भाडेपट्टा – 1,149
♦ वित्त – 1,012
♦ वीज, वायू व पाणी – 387
♦ विमा – 41

आकडे काय सांगतात
बंद/वगळलेल्या कंपन्या (जिल्हानिहाय)
मुंबई शहर 12,009
पुणे 6,433
ठाणे 4,704
नागपूर 1,478
नाशिक 840
रायगड 822
संभाजीनगर 654
अहिल्यानगर 308
जळगाव 215
सातारा 196
एकूण 36,211

नवीन उद्योग किती आले? याचे उत्तर कुठे?

खासदार वाजे यांनी महाराष्ट्रातील उद्योग बंद होण्याबरोबरच नवीन उद्योगांची निर्मिती आणि रोजगारवाढीचे वास्तव काय आहे, याकडेही सरकारचे लक्ष वेधले आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात किती नवीन उद्योग आले? किती नवीन कंपन्या स्थापन झाल्या? किती गुंतवणूक झाली? किती रोजगार निर्माण झाला? बंद झालेल्या कंपन्यांच्या तुलनेत नव्या उद्योगांची संख्या किती? या प्रश्नांचे स्पष्ट तुलनात्मक चित्र संसदेत सादर केलेल्या उत्तरातून समोर आलेले नाही.

नाशिकमध्ये 840 कंपन्यांना टाळे

नाशिकला राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या घोषणा होत असतानाच, केंद्राच्या आकडेवारीतून गेल्या पाच आर्थिक वर्षांत नाशिकमधील 840 खासगी कंपन्या बंद झाल्याचे किंवा नोंदणीतून वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. नाशिकच्या तुलनेत पुण्यात तब्बल 6,433, ठाण्यात 4,704, मुंबई शहरात 12,009, नागपुरात 1,478, रायगडमध्ये 822 आणि संभाजीनगरमध्ये 654 कंपन्यांची नोंद या श्रेणीत झाली आहे.

गेल्या पाच वर्षांत 36 हजारांहून अधिक खासगी कंपन्या बंद झाल्याची अधिकृत आकडेवारी संसदेत समोर आली आहे. नाशिकमधील 840 कंपन्यांचे बंद होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. उद्योग बंद होण्यामागची कारणे काय, त्यातून किती रोजगार गेले आणि प्रभावित कामगारांचे काय झाले, याचा सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे. केवळ नवीन उद्योग आणण्याच्या घोषणा नकोत; विद्यमान उद्योग टिकले पाहिजेत, रोजगार वाचला पाहिजे आणि उद्योग बंद पडल्यास कामगारांच्या हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे.
– राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक

36,000 companies shut down; the government has no information about the workers!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

14 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

14 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

15 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

15 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

15 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

15 hours ago