दोन टप्प्यांत निवडणूक, 14 नोव्हेंबरला निकाल
नवी दिल्ली :
अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा
निवडणुकीचा बिगुल काल वाजला. गेल्या काही दिवसाांपासून मतदार यादीवरून बिहारचे राजकारण ढवळून निघाले होते. पंतप्रधान नरेंदर् मोदी यांनी गेल्या आठवड्यात बिहारचा दौरा केला होता. काल निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. या निवडणुका दोन टप्प्यांत होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबर, तर दुसर्या टप्प्यातील मतदान 11 नोव्हेंबरला होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 14 नोव्हेंबर 2025 रोजी लागणार आहे.
पहिल्या टप्प्यातील निवडणूक 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दुसर्या टप्प्यासाठी 11 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी 10 ऑक्टोबर व 13 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. बिहार निवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख 17 ऑक्टोबर (पहिला टप्पा) आणि 20 ऑक्टोबर (दुसरा टप्पा) असेल. अर्जांची छाननी ही 18 ऑक्टोबर (पहिला टप्पा) आणि 21 ऑक्टोबर (दुसरा टप्पा) रोजी होणार. अर्ज मागे घेण्याची मुदत ही 20 ऑक्टोबर (पहिला टप्पा) आणि 23 ऑक्टोबर (दुसरा टप्पा) असेल. बिहारमध्ये आम्ही सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. त्याचसोबत सर्व निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी आणि इतर सर्व अधिकार्यांशी चर्चा केली.
आचारसंहिता लागू
दरम्यान, बिहारमध्ये निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे बिहारमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. यादरम्यान विकासकामांवर बंदी असणार आहे.
बुरखा परिधान करून मतदान करता येणार
परिणामी महिलांच्या मतदानाच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. कधीकधी त्यांच्या गोपनीयतेचे उल्लंघन झाले होते. पण यावेळी निवडणूक आयोगाने यावर उपाय शोधला आहे. त्यांनी एक स्मार्ट उपाय शोधून काढला आहे. बिहार निवडणुकीच्या घोषणेच्या वेळी निवडणूक आयुक्तांना याबद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले की, प्रत्येक बूथवर अंगणवाडीसेविका तैनात केल्या जातील. या महिला स्थानिक पातळीवर ओळखीच्या असतील. त्यांची जबाबदारी बुरखा परिधान करणार्या महिलांची ओळख पडताळण्याची असेल; परंतु जर कोणत्याही महिलेवर संशय आला तर या महिला निश्चितच त्यांचा बुरखा काढून चौकशी करतील.