खंडणीसाठी चाकूचा धाक दाखवून व्यावसायिकाला लुटले

सिडको : प्रतिनिधी
चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत ब्रोकर व चालकाकडून तब्बल दोन लाख 20 हजार रुपये खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात सद्दाम बाबू शेख याच्यासह त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध आणि ‘मामू’ नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश महेश झाल्टे (39, रा. साईनगर, अमृतधाम, पंचवटी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सप्टेंबर 2024 च्या दुसर्‍या आठवड्यापासून ऑगस्ट 2026 च्या पहिल्या आठवड्यापर्यंत ट्रॅक्टर हाउस आणि खडकाळी सिग्नल परिसरात हा प्रकार घडला.
झाल्टे कामानिमित्त ट्रॅक्टर हाउस येथून रामकुंडकडे जात असताना संशयितांनी त्यांची गाडी अडवली. चाकूचा धाक दाखवून ‘आमच्या गँगला दरमहा 20 हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, अन्यथा तुला येथेच जीवे मारू,’ अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांच्याकडून एक लाख 20 हजार रुपये खंडणीच्या स्वरूपात वसूल करण्यात आली. तसेच त्यांना सुमारे दोन तास जबरदस्तीने रोखून ठेवण्यात आले.
यानंतर ‘मामू’ नावाच्या व्यक्तीमार्फत 22 डिसेंबर 2003 रोजीचे साठेखत मागवून घेण्यात आले. चाकूचा धाक दाखवून त्या साठेखतावर फिर्यादीच्या वडिलांचे नाव साक्षीदार म्हणून टाकण्यास सांगत, फिर्यादीची जबरदस्तीने सही घेण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. फिर्यादीने हप्ता देणे बंद केल्यानंतर ऑगस्ट 2026 च्या पहिल्या आठवड्यात खडकाळी सिग्नल येथे पुन्हा संशयितांनी त्यांना गाठले. आरोपी आणि त्याचा एक साथीदार बीएमडब्ल्यू मोटारीतून तेथे आले. त्यांनी झाल्टे यांना जबरदस्तीने मोटारीत बसवून त्यांच्या पोटाला चाकू लावला. शिवीगाळ व मारहाण करून झाल्टे तसेच त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडून आणखी एक लाख रुपये खंडणी उकळल्याचा आरोप आहे. अशा प्रकारे आतापर्यंत दोन लाख 20 हजार रुपये खंडणीच्या स्वरूपात वसूल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Businessman robbed at knifepoint for extortion.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *