व्यसनमुक्त, शांततापूर्ण गणेशोत्सवासाठी मंडळांनी पुढाकार घ्यावा : ना. महाजन

आदर्श गणेशोत्सव पारितोषिक वितरण

नाशिक : प्रतिनिधी
आगामी गणेशोत्सव आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी व्यसनमुक्त, शांततापूर्ण, पर्यावरणपूरक आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उत्सव साजरा करावा, असे आवाहन राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन व कुंभमेळामंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. सार्वजनिक मंडळांमध्ये दारू अथवा अमली पदार्थांचे सेवन करणार्‍या कार्यकर्त्यांना थारा देऊ नका. व्यसनमुक्त तरुण घडविणे हे राष्ट्रीय कार्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित ‘आदर्श गणेशोत्सव-2025’ पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.
यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे, मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक गणेश मंडळांचे अध्यक्ष समीर शेटे, महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिवजयंती असो किंवा धार्मिक उत्सव, तरुणांमध्ये दारू आणि अमली पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. धार्मिक उत्सव आणि थोर पुरुषांच्या जयंतींचा मूळ उद्देश समाजाला प्रेरणा देणे, हा आहे. त्यामुळे मंडळांनी उत्सवाचे पावित्र्य आणि सामाजिक उद्देश कायम ठेवावा, असे त्यांनी सांगितले. देशातील मोठ्या युवा लोकसंख्येकडे लक्ष वेधत त्यांनी व्यसनाधीनतेमुळे तरुणांचे भविष्य धोक्यात येऊ नये, यासाठी मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यसनमुक्त भारताच्या अभियानाला बळ देण्यासाठी प्रत्येक मंडळाने आपली भूमिका पार पाडावी, असेही सांगितले.
नाशिकमधील विकासकामांची कंत्राटे गुजरातमधील व्यक्तींनाच दिली जात असल्याच्या आरोपाचे त्यांनी खंडन केले. निविदा प्रक्रियेत देशभरातील कंत्राटदारांना सहभागी होता येते. आतापर्यंत केवळ एक कंत्राटदार गुजरातचा असल्याचे सांगत सर्व कामे पारदर्शक पद्धतीने होत असल्याचा दावा त्यांनी केला. काही निविदा अंदाजपत्रकीय दरापेक्षा 30 ते 42 टक्के कमी दराने मंजूर झाल्याचेही त्यांनी नमूद केले. बोगस कामे करणार्‍यांवर पोलिसांच्या मदतीने कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गणेशोत्सवातील मिरवणुकीचे मार्ग, रस्ते आणि अन्य अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. अलीकडील पावसामुळे काही ठिकाणी समस्या निर्माण झाल्या असून, रस्ते दुरुस्तीची कामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार देवयानी फरांदेंकडून रस्ते व वीज समस्यांकडे लक्ष
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि वीजपुरवठ्याशी संबंधित अडचणी आमदार देवयानी फरांदे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निदर्शनास आणून दिल्या. या समस्या प्राधान्याने सोडविण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी शाहू खैरे, विनायक पांडे आणि गजानन शेलार यांनीही गणेशोत्सव साजरा करताना सार्वजनिक गणेश मंडळांना येणार्‍या विविध अडचणी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या.

यांना मिळाला पुरस्कार

परिमंडळ 1 मधील पुरस्कारांमध्ये ♦ श्री राजे छत्रपती सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. ♦ द्वितीय क्रमांक वेलकम सहकार्य मित्रमंडळास मिळाला.♦ तृतीय क्रमांक सरदार चौक मित्रमंडळ, पंचवटी आणि जय शिव बजरंग कला, क्रीडा व सांस्कृतिक सेवाभावी संस्था, पंचवटी या दोन मंडळांना संयुक्तपणे विभागून देण्यात आला. ♦  नाशिकचा राजा सूर्यप्रकाश, नवप्रकाश कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक मित्रमंडळ, घनकर लेन आणि न्यू स्फूर्ती लोणार लेन युवक मित्रमंडळ यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला.

Mandals should take the initiative for an addiction-free, peaceful Ganeshotsav: Minister Mahajan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *