तीस पथकांकडून तपासणी सुरू
नाशिक : प्रतिनिधी
शहरातील रुग्णालयांसह सोनोग्राफी सेंटर व गर्भपात सेंटरची तपासणी नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने हाती घेतली आहे. आतापर्यर्ंत 424 सोनोग्राफी सेंटरपैकी 58 सेंटरची व 181 पैकी 120 गर्भपात सेंटरची तपासणी झाली आहे. तपासणीत अनधिकृत बाबी आढळल्यास संबंधित सेंटरवर कारवाई केली जाणार आहे.
सहाही विभागांत विभागीय वैद्यकीय अधिकार्याच्या उपस्थितीत तपासण्या सुरू असून, तीस पथकांची नियुक्ती याकरिता केली आहे. पथकात वैद्यकीय अधिकार्यासह दोन डॉक्टर व एक परिचारिकेचा समावेश आहे. सेंटरबरोबरच रुग्णालयांचीही तपासणी सुरू आहे. महाराष्ट्र नर्सिंग होम अॅक्टनुसार नियमांचे कुठे उल्लंघन होत आहे का? हे तपासले जात आहे. वर्षातून दोनदा ही मोहीम हाती घेतली जाते. पहिल्या टप्प्यात जानेवारी ते जूनदरम्यान, तर दुसर्या टप्प्यात ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत तपासणी होते. वैद्यकीय विभाग रुग्णालये, सोनोग्राफी सेंटर, गर्भपात केंद्रांची तपासणी करत असताना दुसरीकडे आयव्हीएफ सेंटरकडेही लक्ष दिले असून, त्यांचीही तपासणी सुरू आहे. शहरात एकूण 43 आयव्हीएफ सेंटर असून, त्यांपैकी 20 सेंटरची तपासणी पूर्ण झाली आहे. बदलापूर (जि. ठाणे) येथे झालेल्या स्त्रीबीज तस्करी प्रकरणात मुंबई नाका येथील मालती आयव्हीएफ सेंटरवर महापालिकेने कारवाई करत त्याचा परवाना रद्द करून ते सील केले होते.
फायर सेफ्टीसाठी 674 रुग्णालयांना नोटिसा
राज्यात ठिकठिकाणी होत असलेल्या आगीच्या दुर्घटना पाहता वैद्यकीय विभागाने शहरातील 674 रुग्णालयांना नोटिसा देत फायर सेफ्टीची पूर्तता करण्यास सांगितले आहे.
नोव्हेंबरपर्यंत शहरातील सर्व रुग्णालये, सोनोग्राफी सेंटर, गर्भपात सेंटर व आयव्हीएफ सेंटर तपासणीचे काम हाती घेतले आहे. यासाठी तीस पथकांची नियुक्ती केली असून, त्यांच्यामार्फत काम सुरू आहे.
– डॉ. प्रशांत शेटे, आरोग्य अधिकारी, मनपा
अशी होते तपासणी
♦ रजिस्टर तपासणी
♦ बेडची संख्या
♦ फायर सेफ्टी प्रमाणपत्र
♦ नगररचना प्रमाणपत्र
♦ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र
Abortion centers with sonography facilities under scrutiny