बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारपेठ सजली

आरास साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी

नाशिक : प्रतिनिधी
गणेशोत्सव अवघा दोन दिवसांवर आल्याने नाशिक शहरातील बाजारपेठांमध्ये गणेशभक्तांची लगबग वाढली आहे. गणेशमूर्तींचे बुकिंग यापूर्वीच केल्यानंतर आता बाप्पाच्या स्वागतासाठी मखर, आरास आणि रोषणाईचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. रविवार कारंजा, मेनरोड, जुने नाशिक, शालिमार, सातपूर, नाशिकरोडसह शहरातील विविध भागांतील दुकाने सजावटीच्या साहित्याने गजबजली आहेत.
कृत्रिम फुलांच्या माळा, फुलांच्या व घंटीच्या माळा, मोरपीस, वेलवेट, तसेच रंगीबेरंगी कापड, तयार मखर, थर्माकोलचे मखर, कृत्रिम झाडे, गवत, विद्युत समई, सजावटीचे दिवे आणि विविध प्रकारच्या लायटिंग बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. गणेशभक्तांकडून आपल्या घरातील जागा आणि बजेटनुसार साहित्याची निवड केली जात आहे.
तयार मखर घेण्याऐवजी साहित्य स्वतंत्रपणे खरेदी करून घरच्या घरी मखर तयार करण्याला यंदाही पसंती मिळत आहे. कुटुंबातील सदस्य एकत्रितपणे आरास तयार करीत असल्याने कृत्रिम फुले, माळा व सजावटीच्या कापडाला मागणी वाढली आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी आकर्षक, तसेच वेगळी सजावट करण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
गणेशोत्सवाच्या पाश्वर्र्भूमीवर घरगुती सजावटीसोबत सार्वजनिक मंडळांकडूनही देखाव्यांची तयारी सुरू आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या लायटिंग आणि सजावटीच्या वस्तूंची मागणी वाढली आहे. इलेक्ट्रिक साहित्य विक्रीच्या दुकानांत लायटिंगचे संच उपलब्ध असून, ग्राहकांकडून त्याची खरेदी केली जात आहे.

गणेशोत्सव जवळ आल्याने गेल्या दोन-तीन दिवसांपासून सजावटीच्या साहित्याची मागणी वाढली आहे. तयार मखरपेक्षा ग्राहक आपल्या आवडीनुसार साहित्य घेऊन घरच्या घरी आरास करण्यास पसंती देत आहेत. कृत्रिम फुलांच्या माळा व कापडाला विशेष मागणी आहे. शेवटच्या दोन दिवसांत खरेदी आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. – संतोष पाटील, सजावट साहित्य विक्रेता

वस्तू आणि किमती
कृत्रिम फुलांच्या माळा 50 ते 300 रुपये जोडी
सजावटीचे कापड 80 ते 300 रुपये मीटर
कृत्रिम फुले व तोरणे 40 ते 300 रुपये
तयार मखर 400 रुपयांपासून 5000 पर्यंत
लायटिंग 50 रुपयांपासून पुढे
सजावटीचे दिवे व समई 100 ते 500 रुपये
कृत्रिम झाडे व गवत 50 रुपयापासून 300 पर्यंत
थ्रीडी पडदे 150 पासून 1000 रुपयांपर्यंत

थ्रीडी पडद्यांनी वेधले लक्ष
यंदा गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी त्रिमितीय पडदे हा नवा पर्याय बाजारात दाखल झाला आहे. प्रकाशाच्या परिणामामुळे या पडद्यांवर विविध आकार, दृश्ये आणि नक्षी अधिक उठावदार दिसत असल्याने गणेशभक्तांकडून त्याबाबत उत्सुकतेने विचारणा केली जात आहे. गणपतीच्या मखरामागील भागासाठी तसेच देखाव्याला वेगळा प्रभाव देण्यासाठी त्यांचा वापर करता येतो. विशेषतः तरुणांकडून या नव्या प्रकाराला पसंती मिळत आहे. यंदाच्या सजावटीतील आकर्षण म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

The market is decked up to welcome Bappa.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *