31 वर्षांनंतर दुर्मिळ योग; सकाळी पूजन, मध्यान्ही बाप्पाची स्थापना
नाशिक : प्रतिनिधी
हरितालिकेची पूजा आणि गणरायाचे आगमन साधारणपणे दोन वेगवेगळ्या दिवशी होते. मात्र, यंदा तब्बल 31 वर्षांनंतर हरितालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येत असल्याने गणेशोत्सवाची सुरुवात विशेष ठरणार आहे. सोमवार, दि. 14 सप्टेंबर रोजी सकाळी हरितालिका पूजन केल्यानंतर त्याच दिवशी मध्यान्ह काळात गणेशमूर्तीची स्थापना करता येणार आहे.
दरवर्षी भाद्रपद तृतीयेला हरितालिका व्रत साजरे केले जाते. चतुर्थीला लाडक्या बाप्पाचे आगमन होते. यंदा अधिक मासामुळे तिथी एकाच दिवशी येत असल्याने दोन्ही सण दि. 14 सप्टेंबर रोजीच साजरे होणार आहेत. दुसर्या दिवशी ॠषीपंचमी असल्याने महिला हे व्रत करतात. त्याचाही उपवास केला जातो. त्यामुळे सलग दोन दिवस महिलांचा उपवास असेल.
पुराणकथेनुसार पार्वतीदेवीने भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. या तपश्चर्येच्या स्मरणार्थ हरितालिकेचे व्रत केले जाते. सुवासिनी महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी व आरोग्यासाठी, तर कुमारिका मनासारखा जीवनसाथी मिळावा यासाठी हे व्रत करतात.
यंदा हरितालिका पूजन सकाळी तृतीया तिथी असतानाच करणे योग्य मानले जाते. नाशिकमध्ये सूर्योदय सुमारे 6.21 वाजता असून, तृतीया सकाळी 7.07 वाजेपर्यंत असल्याने स्थानिक पंचांगानुसार सकाळच्या वेळेत हरितालिका पूजन करता येईल.
तृतीया संपल्यानंतर सकाळी सुमारे 7.07 वाजता चतुर्थी सुरू होईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी मध्यान्ह काळात गणेशमूर्तीची स्थापना व पूजा करण्याची परंपरा आहे. पंचांगानुसार गणेश पूजेचा मध्यान्ह मुहूर्त साधारण सकाळी 11.16 ते दुपारी 1.44 असा आहे. त्यामुळे यंदा महिलांना सकाळी हरितालिका पूजन आणि त्यानंतर गणेशमूर्तीच्या स्थापनेची तयारी, अशी दुहेरी लगबग पाहायला मिळणार आहे. दोन्ही पूजा एकाच दिवशी असल्या, तरी त्यांच्या तिथी व पूजेच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने त्या स्वतंत्रपणे करणे योग्य ठरेल.
31 वर्षांपूर्वीही होता असा योग
यापूर्वी 29 ऑगस्ट 1995 रोजी हरितालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आले होते. त्यानंतर आता 31 वर्षांनी पुन्हा हा योग जुळून आला आहे.
असे करावे हरितालिका पूजन
हरितालिका पूजन करताना चौरंग मांडून त्यावर वाळूची पिंडी तयार करून अगोदर गणपती पूजन करावे. नंतर महादेव पूजन करून फुले, बेल, पत्री वाहावी. फळांचा नैवेद्य अर्पण करून आरती करावी. संध्याकाळी जागरण करून भजन व कहाणी ऐकावी.
अशी करावी श्रीगणेश स्थापना
श्रीगणेश स्थापना सुशोभित जागेत करावी. मूर्ती उंच आसनावर ठेवून शेजारी कलश व पत्री वाहाव्यात. गणपतीला जानवे घालून फुलांचा हार, जास्वंदीचे फूल, शमी, दूर्वा वाहून मोदकांचा नैवेद्य अर्पण करावा. आरती करावी. मूर्ती ही गणेशाची असावी. देव, संत या रूपात नसावी. शक्यतो घरातील स्वयंपाकाचाच नैवेद्य दाखवावा.
The arrival of Lord Ganesha will take place after the Haritalika Puja.