नाशिक : प्रतिनिधी
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीवर आणि त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयानी हिंदी आणि मराठी चित्रपटविश्वात मोठी छाप सोडली. अशा या नटसम्राट अभिनेत्याचे नाशिक शहराशी ऋणानुबंध जोडलेले होते.
नाना पाटेकर होते नाशिकचे जावई
नाटा पाटेकर यांच्या पत्नी नीलकांती हलदुले या नाशिक येथील असून, त्यांचे माहेर गणेशवाडी परिसरात आहे. नाना पाटेकर 1977 मध्ये नाटकाच्या विविध दौर्याच्या निमित्ताने नाशकात येत असत. त्यावेळी नीलकांती यादेखील नाटकात काम करत होत्या. यादरम्यान नाना व नीलकांती यांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. 1978 मध्ये दोघे विवाहबद्ध झाले. त्यांना दूर्वास पाटेकर व मल्हार पाटेकर ही दोन मुले झाली.
मात्र, मोठा मुलगा दूर्वास याचे अडीच वर्षांचा असताना निधन झाले. नाना आणि नीलकांती पाटेकर या 35 वर्षे वेगळे राहत होते. मात्र, त्यांनी कायदेशीर घटस्फोट घेतला नाही. परस्पर संमतीने स्वतंत्रपणे आयुष्य जगण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
‘प्रतिघात’च्या चित्रीकरणाची आठवण
1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्रतिघात’ या एन. च्रंद्रा दिग्दर्शित या चित्रपटात नाना पाटेकर यांनी करमवीर या माजी पोलिस अधिकार्याची भूमिका साकारली होती. ‘प्रतिघात’ या चित्रपटाचे शूटिंग नाशिक शहर व परिसरात झाले होते. त्यानिमित्ताने नाना पाटेकर यांच्या अनेक आठवणी नाशिक शहराशी जोडल्या गेल्या.
77 व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते ‘नाना’
नाशिकच्या सांस्कृतिक इतिहासात नाना पाटेकरांच्या भेटीचा सर्वांत महत्त्वाचा टप्पा म्हणजे 1997 मधील 77वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन. या संमेलनाचे अध्यक्षपद नाना पाटेकर यांनी भूषविले होते. नाट्य क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ आणि पडद्यामागील कामगार यांच्याबद्दलची त्यांची आस्था यावेळी प्रकर्षाने जाणवली. त्या काळात ‘ऑल दि बेस्ट’ या नाटकाचे दिवसाला तीन प्रयोग होत होते.
त्यातील तरुण कलाकारांच्या आरोग्याचा विचार करत नानांनी त्यावर आक्षेप घेतला. तरुण कलाकार माणसे आहेत, यंत्रे नाहीत आणि त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण येऊ नये, अशी त्यांची
भूमिका होती.
दादासाहेब फाळके स्मारकाच्या उद्घाटनाला उपस्थिती
2000 मध्ये नाशिक शहरातील पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या फाळके स्मारकाच्या उद्घाटनाला हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आले होते. यावेळी अभिनेते नाना पाटेकर यांचीही विशेष उपस्थिती होती. नाना पाटेकर यांचे अशा अनेक प्रसंगांतून नाशिकशी ऋणानुबंध जोडल्याचे दिसून येते.
‘सावाना’च्या प्रदर्शनाला दिली होती भेट
जानेवारी 1997 मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्त सावानाच्या वतीने नाशिकचे प्रख्यात नाटककार वि. वा. शिरवाडकर आणि प्रा. वसंत कानेटकर यांच्या नाट्य व साहित्य प्रदर्शनाचे वाचनालयात आयोजन केले होते. त्यावेळी नाना पाटेकर यांनी ‘सावाना’च्या प्रदर्शनाला भेट दिली होती.
बाबाज् थिएटर्सची मुहूर्तमेढ रोवली ‘नानां’नी
नाशिक शहराच्या सांस्कृतिक चळवळीतील मोठे नाव असलेल्या बाबाज् थिएटर्स या संस्थेची मुहूर्तमेढ अभिनेते नाना पाटेकर यांनी केली होती. 17 सप्टेंबर 2000 रोजी नाशिक येथे नाना पाटेकर यांच्या ‘पुरुष’ या नाटकाचा हिंदी भाषेतील पहिला प्रयोग होता. यावेळी बाबाज् थिएटर्स या संस्थेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले होते.
कुसुमाग्रजांच्या भूमीत ‘नटसम्राट’चा मुहूर्त
नाशिक आणि नाना पाटेकर यांचे नाते अधिक घट्ट करणारा आणखी एक महत्त्वाचा प्रसंग म्हणजे ‘नटसम्राट’ चित्रपटाचा मुहूर्त. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी, 27 फेब्रुवारी 2015 रोजी कुसुमाग्रज स्मारक येथे या चित्रपटाचा मुहूर्त करण्याचे निश्चित झाले होते. कुसुमाग्रजांच्या अजरामर साहित्यकृतीवर आधारित चित्रपटात नाना पाटेकर अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका साकारली होती. त्यामुळे कुसुमाग्रजांच्या नाशिकमध्येच या चित्रपटाचा मुहूर्त होणे हा नाशिकच्या साहित्य आणि चित्रपटविश्वासाठी विशेष प्रसंग होता. कुसुमाग्रजांच्या ‘नटसम्राट’मधील भूमिका पुढे नाना पाटेकरांनी पडद्यावर अजरामर केली. त्यामुळे नाशिकच्या साहित्यभूमीशी त्यांचा हा संबंध आणखी वेगळ्या अर्थाने जोडला गेला.
शेती सन्मान सोहळ्यात नानांचा शेतकरी प्रश्नांवर आवाज
फेब्रुवारी 2016 मध्ये नाशिकमध्ये झालेल्या शेती सन्मान पुरस्कार सोहळ्यात नाना पाटेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नाना पाटेकर यांच्या हस्ते दादाजी खोब्रागडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यावेळी नानांनी शेतकरी आत्महत्यांबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या. शेतकर्यांवर आत्महत्या करण्याची वेळच येऊ नये आणि शेतीच्या संवर्धनासाठी व्यापक दृष्टिकोनातून काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रापुरते न थांबता शेतीचे प्रश्न देशपातळीवर हाताळण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.नंतर याच सामाजिक जाणिवेतून नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनच्या कार्याला व्यापक स्वरूप मिळाले.
संकटांपुढे हार न मानता जगण्याचा मार्ग निवडावा
नाना पाटेकर यांच्या नाशिक भेटींमधील अलीकडचा आणि विशेष चर्चेत राहिलेला प्रसंग म्हणजे 11वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन. 4 आणि 5 मार्च 2024 रोजी दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्म्स परिसरातील युगात्मा शरद जोशी विद्यानगरीत हे संमेलन झाले. नाना पाटेकर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. उद्घाटनावेळी नानांनी शेतकर्यांच्या वेदनांना साहित्याने ताकदीने वाचा फोडण्याचे आवाहन केले. ‘नटसम्राट’मधील ‘जगावं की मरावं’ या संवादाचा संदर्भ देत शेतकर्यांनी संकटांपुढे हार न मानता जगण्याचा मार्ग निवडावा, असे आवाहन त्यांनी केले. या भाषणात त्यांनी शेतमालाचे भाव, शेतकर्यांच्या समस्या आणि सरकारच्या भूमिकेवरही रोखठोक भाष्य केले. शेतकर्यांनी केवळ सरकारकडे मागण्या करत न बसता आपल्या मताच्या ताकदीने योग्य सरकार निवडण्याची भूमिका घ्यावी, असेही त्यांनी म्हटले.
नटसम्राट अभिनेत्याचा गोदा गौरवने सन्मान
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा गोदावरी गौरव पुरस्कार 2016 मध्ये अभिनेते नाना पाटेकर यांना मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते देण्यात आला होता. पुरस्कार सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना नाना म्हणाले, मी म्हणायचे म्हणून म्हणत नाही, पण हा खरोखरच खूप मोठा सन्मान आहे. मी जेव्हा नाट्य संमेलनाला नाशिकला आलो होतो.
तेव्हा तात्यांनी मला त्यांच्या घरी बोलवत काही गोष्टी सांगितल्या होत्या. सहवासातील माणसांनी माझं आयुष्य घडविले आहे. मी देवाला मानत नाही, अशा देवसदृश माणसांना मानतो, असे पुरस्कार स्वीकारताना नाना म्हणाले होते.
राज जे काही करतो, ते पराकोटीचं चांगलं असतं
नाशिकमधील पांडवलेणीच्या पायथ्याशी मनसेची सत्ता असताना महापालिकेच्या वतीनं बोटॅनिकल गार्डन साकारण्यात आले होते. या उद्यानाचा लोकार्पण सोहळा 27 डिसेंबर 2018 रोजी झाला. या सोहळ्यास नाना पाटेकर उपस्थित होते. यावेळी आपल्या भावना मांडताना नानांनी राज ठाकरे यांच्या अभिनव कल्पनांचं व कामाचं कौतुक केलं. माणूस म्हणून मी राज यांचा खूप आभारी आहे. नाशिकमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलंय. राज यांचा पक्ष आणखी काही शहरांत निवडून आला तर बरं होईल. तिथंही अशीच छान कामं होतील, असं नानांनी सांगितले होते. अभिनेते भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि दिग्दर्शक केदार शिंदेही यावेळी उपस्थित होते.
ज्येष्ठ अभिनेते, संवेदनशील कलाकार आणि समाजासाठी सदैव काहीतरी करण्याची तळमळ असलेले माझे जिवलग मित्र नाना पाटेकर यांच्या निधनाने मन अत्यंत व्यथित झाले आहे. नानांच्या जाण्याने केवळ मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचीच नव्हे, तर समाजाचीही मोठी हानी झाली आहे. शेतकरी, दुष्काळग्रस्त आणि गरजू माणसांच्या मदतीसाठी त्यांनी केलेले कार्य त्यांच्या संवेदनशील मनाची साक्ष देते. त्यांनी निर्माण केलेला अभिनयाचा वारसा आणि समाजासाठी केलेले कार्य पुढील पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहील.
-गिरीश महाजन, मंत्री, महाराष्ट्र राज्यशेतकर्यांच्या अडचणी, त्यांच्या संघर्षाची जाणीव आणि ग्रामीण महाराष्ट्राशी असलेली नाळ त्यांनी आपल्या कार्यातून जपली. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागातील जलसंधारण, शेतकरी आणि ग्रामीण विकासासाठी त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे. त्यामुळे नाना पाटेकर हे केवळ पडद्यावरील अभिनेते नव्हते, तर सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व होते.
– आमदार सुहास अण्णा कांदेमाझे आणि नानांचे संबंध गेल्या 48 वर्षांपासून होते. 17 सप्टेंबर 2000 रोजी बाबाज् थिएटर्स या आपल्या नाशिककरांच्या हक्काचे व्यासपीठ असलेल्या संस्थेची मुहूर्तमेढ नाशिक येथे नानांच्या हस्ते करण्यात आली आणि गेली 26 वर्षे सातत्याने त्यांच्या मार्गदर्शन आणि आशीर्वादाने संस्थेचे कार्य यशस्वी साकारण्यात येत आहे.
– प्रशांत जुन्नरे/ कैलास पाटीलअगदी महिन्याभरापूर्वी गप्पा मारलेला, सगळ्यांना फिटनेसचा मंत्र देणारा, हसरा माणूस असा अचानक जाणं हे मनाला पटतच नाही. साहित्य, संगीत, नाटक, सामाजिक भान असलेली संवेदनशील माणसं जेव्हा अचानक जातात तेव्हा जास्तच पोकळी निर्माण होते; पण कधी कधी शरीर तंदुरुस्त असतं आणि आतून काही वेगळंच सुरू असतं, ते आपल्याला कळतही नाही. ताठ कण्याचा संवेदनशील मित्राला नमस्कार अभिवादन!
– जयप्रकाश जातेगावकरज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी तसेच भारतीय कलाविश्वाची मोठी हानी झाली आहे. कसदार अभिनय, प्रभावी संवादफेक आणि भूमिकांमधील जिवंतपणामुळे त्यांनी अनेक पिढ्यांच्या मनावर ठसा उमटवला. त्यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रातील एक मोठा अध्याय संपला असून, त्यांच्या कुटुंबीय आणि असंख्य चाहत्यांच्या दुःखात सहभागी असून, या महान कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली.
– अॅड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्रनाना पाटेकर हे चित्रपटसृष्टीतील मोठे अभिनेते होते. त्यांची ती ओळख आजच्या पिढीला चित्रपट अभिनेता म्हणून असेल. ते उत्तम नाट्य अभिनेते होते, नाट्य कलावंत म्हणून खूप मोठे होते. त्यांच्या जाण्याने नाट्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
– लोकेश शेवडेआज सकाळी नाना गेले आणि आठवणी जाग्या झाल्या. सन 1985 मध्ये नाना पाटेकर यांच्या सोबत मी “आईशप्पत“ हे नाटक करत होते. तेव्हा मी अवघी 20 वर्षांची होते. उल्का इनामदार ही माझी भूमिका होती. माझ्या वडिलांची भूमिका तेव्हा नानांनी केली होती. सुरुवातीला मला खूप दडपण आलं होतं. पण जसा पहिला प्रयोग झाला तसं नानांनी केलेल्या कौतुकाने मी भारावून गेले. त्या नाटकाचे जवळपास 50 प्रयोग झाले. गेल्या वर्षी बेळगावला 40 वर्षांनंतर आमची शेवटची भेट झाली.
-विद्या करंजीकर, ज्येष्ठ अभिनेत्रीनाना पाटेकर – सहाच अक्षरे! पण सहा ऋतूंचा सोहळा असावा असे जगणे! नानांना पहिल्यांदा भेटून तब्बल 41 वर्षे लोटली. विद्याचे, त्याच्याबरोबरचे पहिले नाटक ‘आईशप्पथ’ बापलेकीच्या भावबंधाचे हळवे नाटक. नानांचा व्यक्तिमत्त्व-साचा नसलेले एकमेव नाटक. त्यानंतर नानांच्या अनेक भेटी झाल्या. नाशिकच्या नाट्यसंमेलनात अध्यक्ष होते तेव्हा, अमेरिकेत हिंदी पुरुष घेऊन आला तेव्हा, अशा अनेक आठवणी आहेत. पुढे त्यांच्यातील दिलदारपणा उमजत गेला. आता यापुढे मात्र मनाच्या पडद्यावर हे रीळसारखे दिसत राहतील. मनात रुजून राहिलेला हा मित्रपट, त्यांचे सारेच आयुष्य, मनस्वी वाटचालीमुळे भुरळ पाडणारे होते.
-दीपक करंजीकर, ज्येष्ठ अभिनेतेनानाचं जाणं जसं धक्कादायक आहे तसं अस्वस्थ करणारं, वरवर अगदी फिट वाटणारा नाना या क्षणालासुद्धा नवनवे प्लॅन करीत होता. वेंगुर्ल्याला घर बांधायचं ठरवत होता, त्याच्या मूळ मातीत जायचं ठरवत होता. सिनेमा, नाट्य, मालिका क्षेत्रात येणार्या नवागतांना मदत करण्याचा त्याचा विचार होता. गावाकडे पाणी साठवून ठेवणारे बंधारे बांधण्याचे उपक्रम गावाकडच्या लोकांना समजावून सांगण्याचे काम त्याला करायचे होते. थोडक्यात, इतक्यात आपल्या बाबतीत असे काय होईल हे त्याच्या मनातही नव्हते. आणि आज अचानक नाना गेला. त्याला “अहो जाहो“ म्हणावे इतका तो शेवटपर्यंत परका किंवा लांबचा वाटला नाही हेच त्याचं खरं व्यक्तिमत्त्व. खरं रूप. तेच त्याचं मोठेपण. असा माणूस अकाली जाणं ही काळाची हतबलता. नाना, तुझ्या असंख्य स्मृतींना आमचे अभिवादन! -अरुण म्हात्रे, ज्येष्ठ कवी
Memories linking the ‘Natsamrat’ actor to the city of Nashik.