– राजेश शिरभाते
पैशांचा पाऊस पाडून देतो, असे सांगून फसवणूक करणार्या भामट्याला नाशिकमधून अटक करण्यात आली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने फसवणूक झालेल्यांना मदत केल्याने हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याच ठिकाणी खरातसारख्या भामट्याचे प्रकरण ताजे असताना लोक या प्रलोभनांना बळी कसे काय पडतात, हा एक मोठा सामाजिक प्रश्न झालेला आहे. सद्सदविवेक बुद्धी असलेली कोणतीही व्यक्ती अशा प्रकारच्या प्रलोभनांना बळी पडणे शक्य नाही. समाजात अशा प्रकाच्या भामट्यांचा सध्या सुळसुळाट झाला आहे. त्याच्या विरोधात एक व्यापक जनजागृती करुन, एक सशक्त, आत्मनिर्भर आणि चांगला समाज निर्माण करणे, हे समाजापुढील एक मोठे आव्हान झाले आहे. आजच्या तांत्रिक प्रगतीच्या काळात आणि आपल्या अवतीभवती विज्ञानाने साधलेली प्रगती आपण पाहत असताना हे समज दूर होणे एक मोठे आव्हान आहे.
कष्टाने आर्थिक प्रगती साधणे, हा प्रत्येकाचा हक्क आहे. अधिकार आहे. त्यासाठी व्यक्ती अगदी विद्यार्थिदशेतूनच आपल्या योजनेला आणि कष्टाला सुरुवात करत असतो. आपल्या आवडीच्या आणि समाजमान्य अशा क्षेत्रात प्रतिष्ठित व्यवसायासाठीचे कौशल्य आणि शिक्षण तो आत्मसात करून घेतो. सातत्यपूर्ण मेहनत, बुद्धिमत्ता आणि अनुभव याच्या जोरावर तो आपली इच्छित प्रगती साधतो. आर्थिक प्रगती साधण्याचा हा राजमार्ग आहे. प्रत्येक व्यवसायात काही ना काही मेहनत आहे. कोणत्याही कष्टाशिवाय या जगात काहीही मिळत नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. गंमतीने म्हणायचे तर अगदी चोरालाही मेहनत करावी लागते. कष्ट आणि मेहनतीचे गोडवे गाणारी, कर्माला महत्त्व देणारी या देशाची विचारसरणी असताना ही बांडगुळे येतात कुठून हाही एक प्रश्न निर्माण होतो. ज्याप्रमाणे फसवणारा दोषी आहे त्याचप्रमाणे फसवून घेणाराही तितकाच दोषी आहे. कोणीतरी कोणाला जेव्हा फसवत असतो, तेव्हा तो त्याच्यासमोर एक आमिष तयार करतो. माणसे या प्रलोभनाच्या जाळ्यात अडकत जातात. आपल्याला काहीतरी भाग्याने किंवा सहज मिळेल असा एक मोठा गैरसमज लोकांनी पाळून ठेवला आहे. त्याला अमुक एका व्यक्तीला अमुक एका गोष्टीने यश मिळाले अशा कथा पसरवल्या जातात. त्यालाही अनेक जण बळी पडतात. इतर राज्यांमध्ये अनेक अंधश्रद्धा आहेत मात्र, महाराष्ट्रात ती कशी काय फोफावत आहे याचाही विचार एकदा सजग नागरिक म्हणून करायला हवा. या राज्याला गेल्या हजार एक वर्षांची ज्ञात संतपरंपरा आहे. या राज्यात वारकरी संप्रदायासारखी खर्या श्रद्धेवर आधारित एक प्रणाली आहे. त्यात देव आहे. त्याचे स्वरूप आहे. त्याचबरोबर तो देव सगळ्यांच्या ठायी आहे याचाही विश्वास आहे. त्यात कोणी लहानथोर नाही. सर्वच जण माउली आहेत. इतरही अनेक पंथही अशाच प्रकारची उच्चतम जीवन मार्ग दाखवणारे आहेत. आपल्याला कोणीतरी पैसे देऊ शकतो यावर विश्वास ठेवताना माणसे काही मूलभूत गोष्टी विसरतात. देव हा प्राचीन काळातील आहे असे मानले तरी पैसे हे आधुनिक आणि विज्ञानाची देण आहे. नोटांवर आधारित अर्थव्यवस्था तयार करण्यासाठी जगभरातील अनेक अर्थतज्ज्ञांनी मोठा अभ्यास केला आहे. त्यात निरंतर बदल केले आहेत. कोणती तरी शक्ती ही वैज्ञानिक गोष्ट दुप्पट करू शकते यावर विश्वास कसा बसणार? प्रत्यक्ष देव आहे असे मानले तरी तो फारफार तर त्याने निर्माण केलेल्या गोष्टींमध्ये बदल करू शकेल. जी गोष्ट त्याच्या काळात नव्हती त्यात तो कसा करणार?
पैसा हे माध्यम किंवा त्याची सुरुवात नोटांच्या छपाईतून होते. देशात आजमितीस किती नोटा चलनात आहेत, याचा हिशोब रिझर्व बँकेकडे आहे. मग या दुप्पट नोटा काय आभाळातून पडणार होत्या का? असाच काहीसा प्रकार गुप्तधनाच्या लालसेने होतो. वास्तविक एखाद्या ठिकाणी काही प्राचीन गोष्ट किंवा संपत्ती सापडली तर ती संपत्ती देशाची होते. तिथे पुरातत्त्व विभागाशिवाय इतर कोणाला जाण्याची वा उत्खनन करण्याची मुभा नसते. पुरातत्त्व विभाग अनेक वैधानिक साधनांच्या सहाय्याने या प्राचीन वस्तूंचा शोध घेत असते. एखादा अशिक्षित काहीतरी पुटपुटणारा माणूस हे भांडार शोधून काढेल का? बरं जर त्याच्याकडे इतकी क्षमता आहे तर त्याने ती स्वतःसाठी का वापरली नाही? बहुतेक हे अशा प्रकारे आपल्याला काही फार येते असे सांगणारे भामटे असतात, ते भणंग असतात. त्यांच्याकडे स्वतःचे असे काहीही नसते. ते परजीवी असतात. स्वतःचा खर्च स्वतः उचलण्याचीही त्यांची लायकी नसते. त्यामुळे कोणत्याही कष्टाशिवाय ते लोकांना फसवून पैसे मिळवत असतात. ज्याच्याकडे स्वतःचे घरदार, जमीनजुमला, नोकरी किंवा व्यवसाय असेल असा माणूस दुसर्यांना फसवायला जाणार नाही. तो बिचारा आपल्याच व्यापात गुंतलेला असतो, त्याच्याकडे काही मागितल्यास तो फार फार तर देऊ शकतो. या उपर त्याला दुसर्यांच्या पैशात काही स्वारस्य नसते. हे मात्र लोकांकडे किती पैसे आहेत व ते आपल्याकडे कसे येतील याचाच विचार करत असतात. त्यांच्यापासून सावध राहणे हे सर्वसामान्य व्यक्तीचे कर्तव्य आहे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे. त्याचा मराठी अर्थ आहे, प्रत्येक गोष्टीला किमतीचे लेबल असते. कोणतीही गोष्ट कधीही फुकट मिळत नसते. जर ती मिळत असेल किंवा कोणी तसा आभास निर्माण करत असेल तर त्यापाठी काही ना काही कटकारस्थान असते. आपण आपल्या कष्टाने कमावलेला पैसा कधीही कोणाहीकडे सुपूर्द करताना दहादा विचार करायला हवा. लोकांचा आजही चमत्कारावर विश्वास आहे. जर एखादा चमत्कार घडणारा असता मग तो कोरोनाच्या काळात का घडला नाही? नेपाळ आणि आता आपल्या ओडिशामधील पूरस्थिती कोणत्याही सिद्ध वा स्वतःला दैवी समजणार्या माणसाने का थांबवली नाही? या प्रश्नांंची उत्तरे आपण शोधली पाहिजेत.
आपल्याकडे काही वर्षांपूर्वी काहीही नव्हते. टीव्ही नव्हता, मोबाइल वा इतर साधने नव्हती. ती कोणत्याही चमत्काराने तयार झालेली नाहीत. कोणत्याही संशोधकाच्या स्वप्नात येऊन कोणत्याही देवाने कधीही कोणताही फॉर्म्युला सांगितला नाही. प्रत्येकाने असंख्य प्रयोगातून आणि अभ्यासातून त्या गोष्टी तयार केला. हा देश अनेकांनी दिलेल्या योगदानामुळे मोठा झालेला आहे. ती माणसे सशक्त होती. त्यांच्यातल्या कोणी काही चमत्कार केल्याचा दावा कधीही केला नाही. मग सर्वसामान्यांवर हे चमत्काराचे संस्कार येतात कुठून? आपल्या संस्कारांप्रमाणे कोणत्याही देवाची श्रद्धेने पूजाअर्चा करणे हे गैर नाही. मात्र, जी गोष्ट प्रत्यक्ष देवानेही कधी केली नाही, ती आपल्या अवतीभवतीचा एक माणूस करेल, असा भाबडा विश्वास कसा काय ठेवायचा? जे व्याज किंवा जो परतावा बँकांना शक्य नाही तो कोणीतरी एक भणंगमाणूस आपल्याला मिळवून देईल यावर विश्वास ठेवलाच कसा जातो? एक प्रगत समाज म्हणून आपल्याला स्वतःला आता हे प्रश्न विचारावे लागतील. आपल्या मेहनतीचे पैसे आहेत. ते वाढवत असताना ते ज्याप्रमाणे चोरांच्या हातात जाणार नाहीत, याची आपण दक्षता घेतो तशाच प्रकारे ते अशा लोकांच्याही हाती जाणार नाहीत, याचीही दक्षता घेणे आवश्यक आहे.
A Shower of Money
- अफजल पठाण श्वास थांबला म्हणून कहाणी संपत नाही, कधीकधी मृत्यूच्या शांत देहातूनच सत्य बोलतं...…
- डॉ. किशोर पवार जगातील वाढती लोकसंख्या, हवामानबदल आणि पाण्याच्या असमान उपलब्धतेमुळे गोड्या पाण्याची समस्या…
- सीमाताई मराठे ‘40 पैसे दिल्याने कोणाचा जीव जात नाही...’ निती आयोगाच्या उपाध्यक्षांच्या मुखातून बाहेर…
आशियाई क्रीडा स्पर्धांत भारताची कामगिरी हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय आहे. सुरुवातीच्या काळात मर्यादित खेळांमध्ये…
युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन-युनो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या यावर्षीच्या आमसभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानसह…