– वाहिद बागवान
एखाद्या शहराच्या जीवनप्रवाहाची गती तिथल्या रस्त्यांवरून आणि वाहणार्या नद्यांवरून ओळखली जाते. नाशिकला गोदावरी आणि नंदिनी या दोन नद्यांचे लाभलेले नैसर्गिक वरदान शहराच्या सौंदर्यात आणि भूगोलात मोलाची भर घालणारे ठरले आहे. या नद्यांच्या दोन्ही तीरांवर उपनगरे वेगाने विस्तारली, नवीन वसाहती फुलल्या आणि नाशिक एका आधुनिक महानगराच्या दिशेने आश्वासक पावले टाकू लागले. प्रशासनानेही बाह्य रिंग रोड, समृद्धी महामार्गाशी जोडणी आणि उड्डाणपुलांच्या माध्यमातून शहराच्या विकासाची मोठी क्षितिजे खुली केली आहेत. मात्र, या भव्य विकासपर्वाचा खरा लाभ सामान्य नागरिकांच्या रोजच्या जगण्यापर्यंत पोहोचवायचा असेल, तर शहराच्या अंतर्गत भागांना जोडणार्या या नद्यांवरील अरुंद पुलांचा प्रश्न आता तितक्याच संवेदनशीलतेने आणि प्राधान्याने सोडवण्याची वेळ आली आहे.
सध्याच्या घडीला गोदावरी आणि नंदिनी नदीवरील अनेक जुने पूल वाढत्या नागरीकरणाचा आणि वाहनांचा प्रचंड भार पेलताना अत्यंत अपुरे पडत आहेत. यामध्ये सर्वात ठळक आणि चिंताजनक स्थिती म्हणजे वडाळा नाक्याला पाथर्डी फाट्याशी जोडणारा नंदिनी नदीवरील पूल. पाथर्डी, वडाळा आणि इंदिरानगर हा पट्टा आज नाशिकमधील सर्वाधिक वेगाने विकसित झालेला निवासी व व्यावसायिक परिसर आहे. मुंबई महामार्ग आणि अंबड औद्योगिक वसाहत यांच्याशी असलेल्या जवळकीमुळे हजारो कामगार, चाकरमानी, शाळा-कॉलेजांची वाहने आणि रुग्णवाहिकांची या मार्गावर 24 तास वर्दळ असते. मात्र, वडाळा-पाथर्डी दरम्यानचा नंदिनीवरील जुनाट पूल कमालीचा अरुंद असल्याने येथे दररोज सकाळी आणि संध्याकाळी वाहनांचा मोठा ’बॉटलनेक’ तयार होतो. दोन्ही बाजूंचे रस्ते रुंद झालेले असताना अचानक पुलावर येताच वाहनांची गती थबकते आणि शेकडो मीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.
नंदिनी नदीवरील हीच गुदमरवणारी कोंडी पुढे जाऊन शहराच्या अतिशय गजबजलेल्या पश्चिमेकडील पट्ट्यातही पाहायला मिळते. सातपूर-अंबड लिंक रोडवरील आयटीआय सिग्नल परिसर असो, किंवा आरडी सर्कल ते सिटी सेंटर मॉलकडे जाताना नंदिनी नदीवर लागणारा पूल असो; या संपूर्ण मार्गावर रोज वाहनांची मोठी कोंडी अनुभवायला मिळते. सिडको, सातपूर, गंगापूर रोड आणि कॉलेज रोड या शहराच्या प्रमुख भागांना जोडणारा हा सर्वांत वर्दळीचा कॉरिडॉर आहे. मॉल, नामांकित रुग्णालये, शाळा आणि व्यापारी संकुलांमुळे या रस्त्यांवर चारचाकी व दुचाकी वाहनांचा अखंड लोंढा वाहत असतो. मात्र, आरडी सर्कलवरून मॉलकडे जाताना आणि आयटीआय चौकालगतचे नदीवरील पूल अरुंद असल्याने प्रचंड वाहतुकीचा ताण एकाच वेळी या छोट्या पुलांवर येतो.
दुसरीकडे, गोदावरी नदीवरील पुलांची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. पंचवटी आणि मुख्य शहराला थेट जोडणारा रामवाडी पूल हा नाशिकच्या वाहतूक व्यवस्थेचा सर्वात संवेदनशील बिंदू बनला आहे. मखमलाबाद, म्हसरूळ आणि पंचवटीच्या दिशेने येणारी प्रचंड वाहतुक या पुलावरून गंगापूर रोड, कॉलेज रोड आणि अशोकस्तंभाकडे जाते. मात्र, पुलाची दोन पदरी जुनी रचना आजच्या वाहन संख्येशी मेळ खात नाही. एका बाजूने सिटी बस किंवा एखादे मोठे वाहन आले, की कोंडी ठरलेलीच असते. तसेच, ऐतिहासिक जुन्या शहराचा प्राण मानला जाणारा अहिल्याबाई होळकर पूल हा आजही हजारो पादचारी, दुचाकीस्वार आणि व्यापार्यांचा मुख्य वहिवाटीचा मार्ग आहे.
रविवार कारंजा आणि मेनरोडची पंचवटीशी होणारी व्यापारी देवाणघेवाण या पुलावर अवलंबून आहे; मात्र अरुंद दगडी कठडे आणि पुलावर होणारी पार्किंग यामुळे या पुलावर सुरक्षितपणे पायी चालणेही कठीण झाले आहे.
ज्या काळात हे सर्व पूल उभारले गेले, तेव्हाची शहराची लोकसंख्या आणि आज पंचवीस लाखांच्या घरात पोहोचलेले आधुनिक नाशिक यातील वाहनांच्या प्रमाणात झालेली प्रचंड वाढ स्वाभाविक आहे. त्यामुळे प्रश्न कोणावर दोषारोप करण्याचा नसून, शहराच्या बदलत्या गरजांनुसार या महत्त्वाच्या पुलांचे नव्याने नियोजन करण्याचा आहे. आगामी सिंहस्थ 2027 च्या पार्श्वभूमीवर शहरासाठी मोठे विकास आराखडे आकाराला येत असताना, गोदावरी आणि नंदिनीवरील या सर्व पुलांचे सक्षमीकरण करणे प्रशासनाला सहज शक्य आहे.
यावरचा सर्वांत व्यवहार्य आणि कायमस्वरूपी उपाय म्हणजे रामवाडी पूल, वडाळा-पाथर्डी जोडणारा पूल, तसेच आयटीआय सिग्नल व आरडी सर्कल ते सिटी सेंटर मॉल पट्ट्यातील नंदिनीवरील पुलांचा गरजेनुसार विस्तार करणे . अहिल्याबाई होळकर पुलावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पादचार्यांसाठी स्वतंत्र सुरक्षित पदपथ किंवा हलक्या वाहनांसाठी पूरक मार्ग विकसित करणे गरजेचे आहे. प्रशासनाची सकारात्मक दृष्टी आणि नाशिककरांचे सहकार्य यांची सांगड घातली, तर आगामी सिंहस्थापूर्वीच या अंतर्गत पुलांचा श्वास मोकळा होऊ शकतो. जेव्हा शहराच्या या दोन्ही नद्यांवरील दळणवळण अडथळामुक्त होईल, तेव्हाच नाशिकच्या विकासाची गाडी खर्या अर्थाने सुसाट आणि सुरक्षित धावेल.
Narrow bridge and daily traffic jams
- अफजल पठाण श्वास थांबला म्हणून कहाणी संपत नाही, कधीकधी मृत्यूच्या शांत देहातूनच सत्य बोलतं...…
- डॉ. किशोर पवार जगातील वाढती लोकसंख्या, हवामानबदल आणि पाण्याच्या असमान उपलब्धतेमुळे गोड्या पाण्याची समस्या…
- सीमाताई मराठे ‘40 पैसे दिल्याने कोणाचा जीव जात नाही...’ निती आयोगाच्या उपाध्यक्षांच्या मुखातून बाहेर…
आशियाई क्रीडा स्पर्धांत भारताची कामगिरी हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय आहे. सुरुवातीच्या काळात मर्यादित खेळांमध्ये…
युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन-युनो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या यावर्षीच्या आमसभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानसह…