पद्मश्री पुरस्कारानिमित्त रघुवीर खेडकरांचा सिन्नरमध्ये नागरी सत्कार
सिन्नर : प्रतिनिधी
अमेरिका भारतावर ‘किसान बॉम्ब’ टाकत आहे. भारतीय व्यवस्थाच शेतकर्यांसाठी मारक ठरत आहे. जिल्हा परिषदेसारख्या संस्थांमध्ये भारतीय जनता पक्ष कसा येतो, याचा विचार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले. दिव्यांगांच्या हक्कांसाठी आंदोलन करावे लागणे ही प्रशासनाची लाजिरवाणी बाब असल्याचा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्राचे भूषण ज्येष्ठ लोककलावंत रघुवीर खेडकर यांना भारत सरकारतर्फे जाहीर झालेल्या ‘पद्मश्री’ पुरस्कारानिमित्त संजीवनी फाउंडेशनने सिन्नर शहरातील अण्णा भाऊ साठे नाट्यमंदिर येथे नागरी सत्कार आयोजित केला होता. यावेळी बच्चू कडू बोलत होते. भाजपाचे युवानेते उदय सांगळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर, पद्मश्री रघुवीर खेडकर, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, वंचित आघाडीच्या नेत्या उत्कर्षाताई रूपवते, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख आदींसह मान्यवर उपस्थित होते.
सत्ताधारी जाती-जातींमध्ये भांडणे लावून स्वतःची पोळी भाजत आहेत; मात्र जाती-धर्मापेक्षा समानतेचा धर्म मोठा असून, तोच टिकला पाहिजे, असे सडेतोड बोल बच्चू कडू यांनी सुनावले.
भाषणात त्यांनी अजित पवार यांचे ‘कामाचा माणूस’ म्हणून कौतुक केले, तर मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडत कार्यकर्त्यांना नेत्यांमागे न धावता व्यवस्थेविरोधात लढण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक ज्ञानेश्वर सानप यांनी केले. सत्कार स्वीकारताना खेडकर यांनी हा सन्मान संपूर्ण लोककलावंतांचा असल्याचे सांगत परंपरा जपण्यासाठी तरुणांनी पुढे यावे, असे आवाहन केले.
उदय सांगळे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून बोलताना संजीवनी फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी ज्ञानेश्वर सानप यांनी महाराष्ट्र युवा परिषदेची सिन्नरमध्ये स्थापना करून हुतात्मा चौकात संजीवनी फाउंडेशनने युवाशक्तीची मशाल पेटवली.
America’s ‘farmer bomb’ on India; Bitter attack on those in power