माय मराठीच्या अहिराणी, मावची, भिली, लेवा पाटीदार, कातोडी, सामवेदी, माडिया, गोंडी, पावरा, देहवाली, कोरकू, आंध, कातकरी, कोथडी, बंजारा, तडवी, डांगी, पारधी, वडारी अशा राज्याच्या कानाकोपर्यांत बोलल्या जाणार्या मराठीच्या बोलीभाषांतील शब्द, म्हणी, वाक्प्रचार, सण-उत्सवांच्या प्रसंगांतील गाणी यावर अभ्यासकांनी बोली अभ्यासक कार्यशाळेत संशोधनांचे सादरीकरण केले. प्रत्येक बोलीची शब्दसंपत्ती, शब्दसौंदर्य, लाघवीपणा, संस्कृती, निसर्गस्नेह, बोलीतून व्यक्त होणारा विविध समुदायांचा स्वाभिमान, उपजत शहाणपण यातील वैविध्यतेचे वैभव सर्वांना थक्क करणारे ठरले.
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर, अमरावती यांच्यातर्फे नाशिकरोड येथील मित्राच्या सभागृहात आयोजित तीन दिवसीय बोली अभ्यासक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या मराठीच्या राज्यभरातील बोलीभाषांच्या वैविध्याचा हा जागर अनुभवायला मिळाला. या कार्यशाळेत राज्यभरातील जवळपास शंभरहून अधिक बोली अभ्यासक जमले होते. ही कार्यशाळा बोलीभाषांचे आणि संवर्धनासाठी जतन, नवसंजीवनी ठरणार असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले. डॉ. रमेश आवलगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बोली ः संशोधनाच्या दिशा आणि संशोधन प्रकल्प या विषयावर डॉ. नेहा सावंत, डॉ. विनोद कुमरे, डॉ. राजकुमार मुसने यांनी अनुभव मांडले.
संत निरंकारी मिशनतर्फे सत्संग :
संत निरंकारी मिशनतर्फे बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त समर्पण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा येथे सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या सान्निध्यात भावपूर्ण संत समागमाचे आयोजन करण्यात आले होते. देश-विदेशातील लाखो श्रद्धाळूंनी उपस्थित राहून सदगुरूंच्या विचारांतून आत्मिक शांती, आनंद आणि प्रेरणेचा अनुभव घेतला. गोविंदनगरसह शहरातील विविध भागांतही सत्संग सोहळे पार पडले. समर्पण दिनानिमित्त गोविंदनगर येथील सत्संग भवन, पंचवटी, जेलरोड आणि सातपूर येथेही सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते.
सबनीस यांच्या सहा पुस्तकांचे प्रकाशन ः
लेखक, प्रकाशक सुभाष सबनीस यांच्या सहा पुस्तकांचे प्रकाशन सनदी लेखापाल डॉ. विनायक गोविलकर यांच्या हस्ते सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात आयोजित करण्यात आले होते. नाशिक कवी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब मगर, ज्योती स्टोअर्सचे संचालक वसंत खैरनार, विवेक उगलमुगले, प्रा. सुनील हिंगणे, सचिन जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सबनीस यांच्या येथे माणसे विकली जातात, पिंकीची फजिती, पिंकोना, खुन्नस, म्युच्युअल फंड, महाराष्ट्रीयन एज्युकेशनिस्ट (इंग्रजी) या सहा पुस्तकांचे प्रकाशन सभागृहातील सर्व उपस्थितांच्या हातात पुस्तकाचे मुखपृष्ठ देत आगळ्या पद्धतीने करण्यात आले. यावेळी मगर म्हणाले की, अस्वस्थ करणार्या सध्याच्या परिस्थितीत ही पुस्तके म्हणजे शीतल वार्याची झुळूक आहे.
खेबुडकर यांचा गीतप्रवास उलगडला :
गोल्डन मेमरीजतर्फे रंगली जीवनगाणे मैफल प्रेमगीतांपासून ते लावणीपर्यंत आणि भूपाळी-भारूडापासून ते भावगीतापर्यंत अनेक लोकप्रिय गाणी लीलया लिहिणारे प्रख्यात गीतकार जगदीश खेबुडकर यांचा प्रवास त्यांच्याच गीतांतून तरलतेने उलगडला. निमित्त होते, पुणे येथील गोल्डन मेमरीज् प्रस्तुत जीवनगाणे या कार्यक्रमाचे. शंकराचार्य संकुल येथे ही आगळी मैफल रंगली. जगदीश खेबुडकर यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त खास आयोजित या कार्यक्रमातून निवेदन व गीतांतून खेबुडकर यांचे चरित्र, लेखन, स्वभावातील पैलू, किस्से-प्रसंग उलगडले. कार्यक्रमाची निर्मिती, संकल्पना चैत्राली अभ्यंकर यांची होती.
डॉ. सुजाता शेणई यांनी लेखन केले. सत्य शिवाहून सुंदर या गीताने मैफलीला सुरुवात झाली. अमित दाते व चैत्राली अभ्यंकर यांनी निवेदनातून खेबुडकर यांचा प्रवास रेखाटला. शशांक दिवेकर, रसिका नातू यांनी गायन केले.
भीष्मराज बाम स्मृती व्याख्यानमाला :
भीष्मराज बाम स्मृती व्याख्यानमालेच्या नवव्या वर्षाचे पुष्प गुंफताना ते मर्यादांना आव्हान देताना या विषयावर दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुवेंद्र महाजन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर भरत केळकर व विवेक कुलकर्णी उपस्थित होते. महाजन म्हणाले, की माणूस लोक काय म्हणतील या रोगामुळे अधिक दबलेला असतो. आपण समाजाची प्रतिमा ओझे म्हणून वाहतो. पण जो आत्मविश्वास पुन्हा मिळवतो व प्रतिमा बदलतो, तोच इतिहास घडवू शकतो. इतिहासाने दखल घ्यावी, असे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी शून्यातून सुरुवात करावी लागते. भीष्मराज बाम सरांसारखे प्रेरणादायी आयुष्य जगता आले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
सतारवादन मैफलीने श्रोते मंत्रमुग्ध :
प्रौढ मित्रमंडळ विरंगुळा केंद्रातर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेचा समारोप मंडळाच्या सभागृहात पार पडला. या सांगता समारंभाप्रसंगी डॉ. स्मिता कापडणीस यांच्या सतारवादनाची विशेष मैफल रंगली, ज्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. डॉ. कापडणीस यांनी आपल्या सतारवादनातून भक्तिसंगीत, भजन, उपशास्त्रीय आणि चित्रपट संगीत अशा विविध शैलींचे सादरीकरण केले. मैफलीत श्रीरामचंद्र कृपालू भज मन हे भजन सादर करण्यात आले. त्यानंतर अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान या गीताने कार्यक्रमात चैतन्य भरले. चीक मोत्याची माळ आणि ए मालिक तेरे बंदे हम या गीतांनी उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात है अपना दिल आवारा यांसारख्या सदाबहार गाण्यांच्या सादरीकरणाने मैफलीची सांगता झाली.
भारत-जपान नृत्यसंध्या ः
भाव, ताल, लय यांचा सुरेख संगम असलेल्या भरतनाट्यम व ओडिसी नृत्याविष्काराने नाशिककर रसिकांना आगळी अनुभूती दिली. या कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षण असलेल्या जपानी नृत्यांगना काओरी नाका यांच्या ओडिसी नृत्य सादर केले. भारत-जपान आदानप्रदान सांस्कृतिक उपक्रमांतर्गत शिवालय नृत्यकला मंदिर व विश्व शैक्षणिक-सांस्कृतिक केंद्राच्या वतीने भारत-जपान नृत्यसंध्या रंगली.
कापडपेठेतील श्री बालाजी मंदिरात हा कार्यक्रम झाला. जपान येथील प्रसिद्ध संतूरवादक ताकाहिरी आराई यांच्या हस्ते कार्यक्रमाला प्रारंभ झाला. प्रारंभी गुरू प्रा. दीपक मगरे यांच्या शिष्यांनी शास्त्रशुद्ध भरतनाट्यम नृत्य सादर केले. दूर्वांकुर नृत्यसंस्थेच्या प्राजक्ता भट व विद्यार्थिनींनी श्री गणेशवंदना सादर केली. श्वेता पांडे यांनी युरोपियन संगीतावर भरतनाट्यम नृत्य सादर केले. त्यांनी चंद्रचूड शिवशंकर पार्वती या रचनेवर नृत्य पेश केले. कीर्ती भवाळकर व त्यांच्या शिष्यांनी दमदार पदन्यास व तालबद्ध हालचालींनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
Awakening of dialects with My Marathi; A unique book release ceremony
पश्चिम बंगाल निवडणुकांच्या काळात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीविषयी चिंता व्यक्त केली…
गेल्या आठवड्यात नातेवाइकाच्या लग्नाला गेलो होतो. खरेतर लग्न कसले, फक्त वैताग. जावे लागते म्हणून लोक…
सवलत पाससाठी जादा पैसे उकळल्याचा ज्येष्ठ नागरिकाचा आरोप मनमाड : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या…
एकीकडे महाग झालेले शिक्षण, त्यातच शिक्षणाचा घसरलेला दर्जा आणि झालेला बट्ट्याबोळ, त्यात भर पडत आहे…
केंद्रशासित पुद्दुचेरीसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे सुवेंदू अधिकारी, आसाममध्ये भाजपाचेच…
बारागाव पिंप्री रोडवर दोन ट्रक पकडले; एक आरोपी अटकेत, दुसरा फरार सिन्नर : प्रतिनिधी महाराष्ट्रात…