अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील इन्फोसिस थिएटर येथे एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी 29 ऑगस्ट 2026 रोजी केलेल्या भाषणावर देशभर चर्चा सुरू आहे. विविधतेमध्ये एकता हे भारताच्या डीएनएमध्येच आहे. ही विविधतेतील एकता जपली गेली पाहिजे, साजरी केली गेली पाहिजे, या एकतेचा आदर केला गेला पाहिजे आणि हे ऐक्य जपले गेले पाहिजे, यावर भागवतांनी जोर देऊन भारतीय परंपरा समजावून सांगितली. त्याचबरोबर त्यांनी हिंदू-मुस्लिम मुद्द्यावरही भाष्य केले. भारतात एकही मुस्लिम व्यक्ती असू नये, असे जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल, तर ती व्यक्ती स्वतःला हिंदू म्हणवू शकत नाही, असे विधान त्यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणातून एकता, विविधता आणि मानवतेचा संदेश दिला. सर्व धर्म वेगवेगळे असले तरी मानवता एक आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. सर्व धर्म एकाच सत्याकडे घेऊन जातात, ही हिंदू विचारसरणीची मूलभूत धारणा आहे. त्यामुळे माणसांमध्ये कोणताही भेदभाव असू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीचा आदर हाच मानवतेचा खरा पाया आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या मूलभूत रचनेत एकता आणि विविधता असल्याचेही भागवत यांनी नमूद केले. अमेरिकेच्या संदर्भात बहुविधता हा शब्द वापरला जातो, तर भारतासाठी विविधतेतील एकता ही संकल्पना महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. भारतात विविध धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहतात, हेच त्यांना अधोरेखित करायचे होते. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांशी साजेसे भाषण भागवत यांनी केले. भागवत यांनी मानवतेचा विचार मांडला. हिंदू धर्मातील अर्थात, भारताच्या मानवतेचा विचार त्यांनी मांडला. हिंदुत्व हा संघाचा पाया असला, तरी भागवतांनी मांडलेले
विचार पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष अर्थात, भारतीय राज्यघटनेतील तत्त्वांना अनुसरून आहेत, याविषयी शंका नाही. त्यांनी मांडलेल्या विचारांना एक वेगळी पार्श्वभूमी आहे. संघ, हिंदुत्ववादी संघटनांना विरोध करणार्‍यांना भारतीय परंपरा आणि हिंदूंची सहिष्णुता समजावून सांगायची होती. भागवत यांच्या अमेरिका भेटीला अमेरिकेतीलच काही संस्था-संघटनांनी विरोध केला होता, हे लक्षात घेऊन भागवतांनी विरोधकांना भारतीय व हिंदू परंपरा समजावून सांगत आपण सर्व एक असल्याचा संदेश दिला. भागवत यांच्या न्यूयॉर्कमधील नियोजित कार्यक्रमावरून अमेरिकेत राजकीय आणि सामाजिक वाद उफाळून आला होता. न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्यासह अमेरिकेतील काही हिंदू, आंतरधर्मीय आणि नागरी हक्क संघटनांनी भागवत यांच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवला होता. अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग या मंचाच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा उद्देश हिंदू-अमेरिकन समुदायाला एकत्र आणणे, सांस्कृतिक वारसा आणि विविध समुदायांमधील संवादाला प्रोत्साहन देणे, हा आहे, असा आयोजकांनी दावा केला होता. आयोजकांनी या कार्यक्रमासाठी अमेरिकेतील दोनशेहून अधिक हिंदू-अमेरिकन संघटनांचा सहभाग असल्याचे म्हटले होते. मात्र, कार्यक्रमाला विरोध करणार्‍या संघटनांनी संघाच्या विचारसरणीवर आक्षेप घेतला होता. हिंदूज फॉर ह्यूमन राइट्स इंडियन अमेरिकन मुस्लिम कौन्सिल आणि इंटरफेथ सेंटर ऑफ न्यूयॉर्क यांसह विविध संघटनांनी कार्यक्रमाला विरोध केला होता. संघ हिंदू समाजाचे प्रतिनिधित्व करत नसल्याचा दावाही काही संघटनांनी केला होता. भारतात जन्मलेले न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनीही कार्यक्रमाला पाठिंबा दिला नव्हता. भारताच्या बहुविध आणि धर्मनिरपेक्ष स्वरूपाच्या कल्पनेशी आपण जोडलेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. खासगी कार्यक्रम असल्याने तो रद्द करण्याचा अधिकार शहर प्रशासनाकडे आहे की नाही, याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित करून काहीशी तटस्थता दाखवली होती. कार्यक्रमाच्या समर्थनार्थ आणि विरोधात दोन्ही बाजूंनी भूमिका मांडल्या गेल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर भागवत यांनी आपल्या भाषणात विविधता, एकता, मानवता, सहिष्णुता अशा मुद्द्यांवर जोर देऊन वसुधैव कुटुम्बकम् म्हणजे संपूर्ण पृथ्वी हेच एक कुटुंब हा विचार मांडला. त्यांनी सर्वधर्मीयांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. भागवत यांनी जे विचार मांडले, ते भारतातही मांडले पाहिजे होते, असे मत विरोधकांनी व्यक्त केले. भारतात अल्पसंख्याकांवर यापूर्वी अनेकदा हल्ले झाले, हिंदू-मुस्लिम वाद निर्माण झाले. त्यात संघाशी संबंधित विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांसारख्या आक्रमक संघटना आहेत. याशिवाय भाजपही आहे. भागवतांनी न्यूयॉर्कमध्ये जे मौलिक विचार मांडले, ते स्वागतार्हच आहेत; परंतु आपल्या अमेरिका भेटीला विरोध झाल्यावर त्यांनी भाषणात कोणतीही टिप्पणी केली नाही. त्यांच्या विचारानुसार संघ व संघाशी संबंधित संघटनांनी भारतातील विविधता स्वीकारली, तर धार्मिक प्रश्न उपस्थित होणार नाहीत. त्यांच्या मौलिक विचारांचे अनुकरण स्वयंसेवकांसह पक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केले, तरच या
भाषणाला अर्थ प्राप्त होईल.

Bhagwat Katha

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

15 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

15 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

15 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

15 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

16 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

16 hours ago