पूवर्र्वैमनस्यातून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज
पंचवटी : प्रतिनिधी
शहरातील पंचवटी परिसरात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असून, टकलेनगर येथे शुक्रवारी (दि.20) भरदुपारी एका महाविद्यालयीन युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. वेदांत संतोष काळे (वय 18) असे मृत युवकाचे नाव आहे. तो पंचवटी महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होता. जुन्या नाशिकमधील झारकरी कोट परिसरात तो वास्तव्यास होता. गजबजलेल्या परिसरात घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे टकलेनगरसह पंचवटी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
टकलेनगर येथील वैशाली अपार्टमेंटजवळ असलेल्या जिजामाता महिला व्यायामशाळेच्या प्रवेशद्वाराजवळ दुपारी सुमारे 2 ते 2.30 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वेदांत हा एका युवतीसोबत परिसरातील उद्यानात बसून गप्पा मारत असताना अचानक दुचाकींवरून सुमारे 10 ते 12 जण घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर काही हल्लेखोरांनी वेदांतवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. छातीसह पाठीवर गंभीर वार झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.हल्ला केल्यानंतर संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या वेदांतला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ऐन दुपारी घडलेल्या या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या हत्येमागे पूर्ववैमनस्य असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. गुरुवारी वेदांत आणि पीयूष लोखंडे यांच्यात वाद झाल्याची चर्चा असून, त्याच वादातून हा हल्ला झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, हत्येचे नेमके कारण पोलिस तपासातून स्पष्ट होणार आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील आणि पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
हल्लेखोरांपैकी एकाने आपली मोपेड घटनास्थळीच सोडून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तपासासाठी पोलिसांच्या हाती महत्त्वाचा धागा लागला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकसह विविध पोलिस पथकांनी संशयितांचा शोध
सुरू केला.
या शोधमोहिमेत पीयूष लोखंडे याच्यासह प्रमुख संशयित आणि अन्य चार अशा एकूण पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. उर्वरित संशयितांचा शोध सुरू असून, हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्वांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास केला जात आहे. भरदुपारी महाविद्यालयीन युवकाची अशा प्रकारे हत्या झाल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या हत्येचा कट कसा रचला गेला, हल्ल्यात नेमके किती जण सहभागी होते आणि हत्येमागील कारण काय, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.
मोपेडमुळे तपासाला महत्त्वाचा धागा!
हल्लेखोरांपैकी एकाने घटनास्थळीच मोपेड सोडून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. या मोपेडच्या आधारे पोलिसांना संशयितांपर्यंत पोहोचण्यास मदत होण्याची शक्यता आहे. गुन्हे शाखेच्या युनिट एकने तातडीने शोधमोहीम राबवत पाच संशयितांना ताब्यात घेतले असून, अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.
Brutal murder of a college youth in Panchavati
चाकूहल्ल्यात विक्रेता जखमी सिडको : प्रतिनिधी म्हसरूळ परिसरातील मेहेरधाम बसथांब्याजवळ फळविक्रीचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दोघांनी…
सर्व मंत्र्यांसोबत साडेतीन तास मंथनानंतर मोदी-शहा-नितीन नवीन यांच्यात दीड तास बैठक नवी दिल्ली । प्रतिनिधी…
रुग्णालयातून परतणार्या सहकार्यांचाही अपघात नांदगाव : प्रतिनिधी वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी येणार्या प्राध्यापकाचा हृदयविकारा-च्या तीव्र…
चार लाख भाविकांची मांदियाळी; उपमुख्यमंत्री शिंदे करणार महापूजा सोलापूर : सूर्यकांत आसबे दक्षिण काशी म्हणून…
फिक्कीतील भाषणावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल नवी दिल्ली : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…
सुनील केदार यांचा राजीनामा घेतल्याचे वृत्त; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची कारवाई; पक्षशिस्तभंगाचा ठपका नाशिक :…