सातपूर-त्र्यंबक रस्त्यावरील पपया नर्सरी परिसरातील घटना; सलग दोन दिवसांत दोन अपघाती मृत्यू
सिडको/सातपूर : प्रतिनिधी
सातपूर-त्र्यंबक रस्त्यावरील पपया नर्सरी परिसरात रस्त्याच्या कडेला साचलेली चिखलमाती आणि खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराचा ताबा सुटून खासगी बसची दुचाकीला पाठीमागून धडक बसल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या 27 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. प्रतीक्षा रामचंद्र आवारी (रा. कोपुर्ली बुद्रुक, ता. पेठ) असे मृत महिलेचे नाव आहे.
रक्षाबंधनानिमित्त भावाला राखी बांधण्यासाठी पतीसोबत नाशिकला आलेल्या प्रतीक्षा बुधवारी सकाळी दुचाकीवरून पतीसोबत त्र्यंबकेश्वरच्या दिशेने जात होत्या. सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास पपया नर्सरी परिसरातील पेट्रोल पंपासमोर त्यांच्या दुचाकीला संदीप युनिव्हर्सिटीच्या खासगी बसने (एमएच 15-एचएन 6071) पाठीमागून धडक दिली. या अपघातात प्रतीक्षा बसच्या चाकाखाली आल्याने त्यांच्या डोक्याला आणि दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. सणाच्या दिवशीच बहिणीचा अपघाती मृत्यू झाल्याने इंपाळ कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याप्रकरणी शामवेल कांशीराम इंपाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील तपास सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गोरख डिगे करीत आहेत.
औद्योगिक परिसरातून अवजड वाहने तसेच खासगी बसची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. त्यामुळे या मार्गावर वेगमर्यादेचे पालन, वाहतूक शिस्त आणि धोकादायक ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. अपघात झाल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी नियमित गस्त, वाहनांची तपासणी आणि वाहतूक नियमनावर भर द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
खासगी बसची फिटनेस तपासणी, चालकांची पात्रता आणि वाहतूक नियमांचे पालन याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाने अधिक प्रभावीपणे तपासणी करण्याची आवश्यकता आहे. धोकादायक पद्धतीने वाहतूक करणार्या वाहनांवर अपघात होण्यापूर्वीच कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
सातपूर-त्र्यंबक रस्त्यासह औद्योगिक परिसरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचण्याबरोबरच रस्त्याच्या कडेला चिखलमाती साचत असल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. खड्डे बुजवण्याची कामे तात्पुरती न करता दर्जेदार पद्धतीने करण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. मात्र, या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
सलग दोन दिवसांत दोन बळी
सातपूर औद्योगिक वसाहतीतील निलय कंपनीजवळ झालेल्या अपघातात सुजित गायकवाड यांचा मृत्यू होऊन 24 तासही उलटले नसताना पुन्हा एका महिलेचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सातपूर, अंबड औद्योगिक वसाहत आणि परिसरातील रस्त्यांवर खड्डे, वाहतूक नियोजनाचा अभाव, तसेच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणातील वर्दळ यामुळे अपघातांचा धोका वाढल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
खासगी बसची तपासणी आवश्यक
खासगी शैक्षणिक आणि प्रवासी बसचालकांकडून वाहतूक नियमांचे पालन होते की नाही, याची नियमित तपासणी होणे आवश्यक आहे. चालकांची पात्रता, वेगमर्यादेचे पालन, वाहनाची यांत्रिक स्थिती आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी काटेकोरपणे करण्याची गरज आहे. निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी कठोर भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Bus hits two-wheeler due to pothole; woman dies.
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…