‘त्या’ बोअरवेलच्या पाण्यात 1 हजार पट कर्करोगकारक क्रोमियम

अहवालातील धक्कादायक निष्कर्ष

नाशिक :
सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण तोंडावर आले असताना गोदावरीच्या प्रदूषणाचा मुद्दा अंबड औद्योगिक वसाहतीलगतच्या रहिवासी भागातील बोअरवेलच्या विषारी पाण्यामुळे ऐरणीवर आला आहे. दत्तनगर, मारुती संकुल, तुळजाभवानीनगर परिसरातील बोअरवेलचे पाणी पिवळे पडून तेथील रहिवाशांना त्वचेवर जखमा आणि व्रण आल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे त्या परिसरातील बोअरवेलच्या पाण्याची मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासणी केली असता तब्बल 50.5 मिलिग्रॅम प्रतिलिटर एकूण क्रोमियम आढळले आहे. भारतीय मानकांनुसार पिण्याच्या पाण्यासाठी दिलेल्या 0.05 मिलिग्रॅम प्रतिलिटर मर्यादेपेक्षा हे प्रमाण 1,010 पट अधिक आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर हे रसायन मानवी कर्करोगास कारणीभूत ठरणारे मानले जाते.
या पाण्याविषयी तक्रार आल्यानंतर पर्यावरण कार्यकर्ते रोशन केदार, राजेश पंडित आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर साउथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर्स अँड पीपल अर्थात ‘एसएएनडीआरपी’च्या परिणीता दांडेकर यांनी परिसराची पाहणी करून 3 ऑक्टोबरला त्या पाण्याचा नमुना तपासणीसाठी दिला. अश्वमेध इंजिनिअर्स अँड कन्सल्टंट्स लॅबोरेटरी सर्व्हिसेसच्या 7 ऑक्टोबरच्या अहवालात वरील निष्कर्ष काढण्यात आला. त्यानुसार, या पाण्यात प्रतिलिटर 50.5 मिलिग्रॅम क्रोमियम आढळले असून, त्यापैकी 50.3 मिग्रॅ/लिटर हे अत्यंत घातक हेक्साव्हॅलेंट क्रोमियम आहे. जगातील हिकली, कॅलिफोर्निया येथील प्रदूषणाच्या पातळीपेक्षाही अंबडमधील क्रोमियमचे प्रमाण अधिक आहे. तामिळनाडूतील राणीपेट (तामिळनाडू) आणि कानपूरच्या रानिया येथे प्रक्रिया न केलेल्या क्रोमियम कचर्‍यामुळे संपूर्ण भूजल कायमस्वरूपी निकामी झाले होते, तशीच भीषण स्थिती अंबडमध्ये निर्माण झाली आहे, असे दांडेकर यांचे म्हणणे आहे.
‘एसएएनडीआरपी’ने म्हटले आहे की, नाशिक महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा कमी आणि अनियमित असल्याने, येथील कुटुंबे नाइलाजाने कपडे धुणे, भांडी घासणे आणि आंघोळीसाठी या दूषित भूजलाचा वापर करत आहेत. परिणामी, नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागत असून, खाज आणि पाण्याच्या थेट संपर्कामुळे त्वचा जळून त्यावर खोल व्रण पडत आहेत. अनेक लहान मुलांच्या पाठीवर आणि अंगावर असे गंभीर व्रण आले आहेत. प्रभावित वस्तीतील दोन महिलांचा गर्भपात झाल्याची नोंद झाली आहे. हा आकडा अधिक असण्याची शक्यता असून, या रासायनिक प्रदूषणाशी असलेला संबंध तपासणे अत्यावश्यक आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 30 सप्टेंबर 2026 रोजी केवळ एकाच कंपनीला जुजबी कारणे दाखवा नोटीस बजावल्याचा आक्षेप संस्थेने
घेतला आहे.
प्रशासनाने त्वरित सर्व दूषित बोअरवेल सील कराव्यात आणि परिसरात दैनंदिन वापरासाठी टँकरद्वारे सुरक्षित पाण्याचा पुरवठा तातडीने सुरू करावा. तसेच त्वचारोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञांचे पथक पाठवून नागरिकांची मोफत तपासणी करावी व जखमांवर विशेष औषधोपचार पुरवावेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्व चाचणी अहवाल जाहीर करावेत; तसेच या परिसरातील सर्व इलेक्ट्रोप्लेटिंग, मेटल फिनिशिंग, पेंट व संबंधित कारखान्यांची कठोर तपासणी करून विषारी सांडपाण्याची बेकायदेशीर विल्हेवाट बंद करावी. प्रदूषण करणार्‍यानेच भरपाई द्यावी, या तत्त्वानुसार दंडात्मक कारवाई आणि नागरिकांच्या आरोग्याचा संपूर्ण खर्च यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत, अशा मागण्याही ‘एसएएनडीआरपी’ने केल्या आहेत.

‘ही मोठी पर्यावरणीय आपत्ती’
हा प्रश्न केवळ अंबड परिसरातील भूजलापुरता मर्यादित न राहता नाल्यांमधून हे दूषित पाणी गोदावरीपर्यंत पोहोचत असल्याचा दावा ‘एसएएनडीआरपी’ने केला असून, आगामी 31 ऑक्टोबर 2026 रोजी सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होत असताना, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गोदावरी नदीत असे कर्करोगजन्य रसायन मिसळणे ही मोठी पर्यावरणीय आपत्ती असून, भाविक आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ मांडणारा प्रकार आहे, अशी टीकाही या संस्थेने केली आहे.

Carcinogenic chromium levels in ‘that’ borewell water 1,000 times higher than the limit.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *