अडीच लाख शिधापत्रिकाधारकांचे रेशन बंद

‘मिशन सुधार’चा फटका; लाभार्थी हवालदिल

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यात एकीकडे दुष्काळाचे संकट गडद होत असताना, दुसरीकडे ‘मिशन सुधार’ योजनेंतर्गत सुमारे 2 लाख 40 हजार शिधापत्रिका अपात्र ठरविण्यात आल्याने स्वस्त धान्याचा लाभ घेणार्‍या कुटुंबांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. स्वस्त धान्य दुकानांवर धान्य घेण्यासाठी गेलेल्या लाभार्थ्यांना शिधापत्रिकेवरील धान्याचा लाभ बंद झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे नियमित मिळणारे धान्य अचानक बंद झाल्याने लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण
झाला आहे.
रेशन बंद झाल्यानंतर बीपीएल, अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील काही लाभार्थ्यांनी तालुका पातळीवरील पुरवठा विभागाशी संपर्क साधला. त्यावेळी संबंधित शिधापत्रिका अपात्र ठरविण्यात आल्याचे आणि नव्याने शिधापत्रिका काढण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. नव्याने शिधापत्रिका काढण्याच्या प्रक्रियेला काही महिने लागू शकतात, अशी माहिती मिळाल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून मिळणारे स्वस्त धान्य हे अनेक कुटुंबांसाठी महत्त्वाचे आधार आहे. अचानक धान्याचा लाभ बंद झाल्याने बाजारभावाने धान्य खरेदी करण्याची वेळ येत असल्याच्या तक्रारी लाभार्थ्यांकडून होत आहेत.
दरम्यान, कोणत्या निकषांच्या आधारे शिधापत्रिका अपात्र ठरविण्यात आल्या, संबंधित लाभार्थ्यांना पूर्वसूचना देण्यात आली होती का आणि पात्र लाभार्थ्यांचा धान्यपुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी कोणती प्रक्रिया आहे, याबाबत प्रशासनाकडून स्पष्टता देण्याची मागणी होत आहे.

एकाच गावातील 20 शिधापत्रिका रद्द
इगतपुरी तालुक्यातील जानोरी गावातील तब्बल 20 शिधापत्रिका एकाचवेळी रद्द झाल्याची बाब समोर आली आहे. संबंधित कुटुंबांना याबाबत पूर्वसूचना मिळाली नसल्याचा दावा करण्यात येत आहे. एकाच गावातील अनेक शिधापत्रिकांवर एकाचवेळी कारवाई झाल्याने त्यामागील कारणांबाबत लाभार्थ्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मिशन सुधारअंतर्गत अपात्रतेची संभाव्य कारणे
♦ मयत लाभार्थ्यांची नावे कायम असणे
♦ दुबार शिधापत्रिका किंवा दुबार नोंद
♦ लाभार्थ्यांचे स्थलांतर
♦ शिधापत्रिकेवरील पत्ता व प्रत्यक्ष वास्तव्यात तफावत
♦ ई-केवायसी अपूर्ण असणे
♦ आधार क्रमांकातील विसंगती
♦ कुटुंबातील सदस्यांची दुबार नोंद
♦ दीर्घकाळ धान्य न उचलणे

केंद्र शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार जिल्ह्यात सुमारे दोन लाख 40 हजार शिधापत्रिका अपात्र ठरविण्यात आल्या असून, त्यांची यादी प्राप्त झाली आहे. यापैकी सुमारे 1 लाख 30 हजार शिधापत्रिकांवर कारवाई झाली असून, उर्वरित शिधापत्रिकांवरील कारवाई सुरू आहे. नवीन लाभार्थ्यांना शिधापत्रिका काढण्याची प्रक्रिया ऑनलाइन असून, त्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नाही. लाभार्थ्यांनी थेट ऑनलाइन अर्ज करावा. गत पंधरवड्यात सुमारे 4 हजार 900 नवीन शिधापत्रिका वितरित करण्यात आल्या आहेत.
– रमेश गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी

Ration supply stopped for 2.5 lakh ration cardholders.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *