सप्तशृंगगड यात्रेसाठी एसटी बसचा मार्ग बदलला

सिडको : प्रतिनिधी
सप्तशृंगगड यात्रेनिमित्त नवीन सीबीएस (ठक्कर) बसस्थानकातून सोडण्यात येणार्‍या जादा एसटी बसफेर्‍यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. 9 ते 26 ऑक्टोबरदरम्यान जादा एसटी बस वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याची अधिसूचना नाशिक शहर वाहतूक पोलिसांनी जारी केली आहे.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगगडाकडे राज्य परिवहन महामंडळाच्या 250 जादा
बसफेर्‍या सोडण्यात येणार आहेत. या बसफेर्‍यांमुळे शहरातील सारडा सर्कल, मुंबई नाका आणि द्वारका परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मार्गात बदल करण्यात आला आहे. नवीन सीबीएस (ठक्कर) बसस्थानकातून सप्तशृंगगडाकडे जाणार्‍या जादा एसटी बस मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा आणि दिंडोरी नाका मार्गे सप्तशृंगगडाकडे जातील. परतीच्या प्रवासात दिंडोरी नाका, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नल, शालिमार, खडकाळी सिग्नल आणि त्र्यंबकनाका मार्गे या बस नवीन सीबीएस बसस्थानकात दाखल होतील.
दरम्यान, सप्तशृंगगडाकडे जाणार्‍या जादा एसटी बस वगळता अन्य एसटी बसफेर्‍यांचे मार्ग पूर्वीप्रमाणेच राहणार आहेत. हा बदल 9 ऑक्टोबरपासून 26 ऑक्टोबरपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात लागू राहणार आहे. परिस्थितीनुसार या मार्गात ऐनवेळी बदल करण्याचे अधिकार वाहतूक पोलिसांनी राखून ठेवले आहेत. एसटी महामंडळाच्या नाशिक विभागासह सर्व बसचालकांनी सुधारित वाहतूक मार्गाची नोंद घेऊन त्यानुसार बसफेर्‍या चालवाव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दिशादर्शक फलक, आवश्यक सूचना आणि इतर उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सुधारित वाहतूक अधिसूचनेचे उल्लंघन करणार्‍यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.

ST bus route changed for Saptashrunggad pilgrimage.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *