सिडको : प्रतिनिधी
राज्यात चर्चेत आलेल्या अशोक खरात प्रकरणाला गुरुवारी सहा महिने पूर्ण होत आहेत. या कालावधीत राज्यात शंभरहून अधिक भोंदूबाबांविरोधात विविध गुन्हे दाखल झाल्याचा दावा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (महा. अंनिस) केला आहे. यातील अनेक प्रकरणांमध्ये महिलांचे लैंगिक शोषण तसेच आर्थिक फसवणुकीचे आरोप असल्याचे समितीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे म्हटले आहे. नाशिक आणि पुणे जिल्ह्यांत अशा गुन्ह्यांची संख्या अधिक असल्याचेही समितीने नमूद
केले आहे.
अशोक खरात प्रकरणानंतर महा. अंनिसच्या वतीने राज्यभर बुवाबाजी संघर्ष परिषदा घेण्यात आल्या. या माध्यमातून भोंदूगिरीविरोधात जनजागृती करण्यात आली तसेच पीडितांना तक्रार दाखल करण्यासाठी पाठबळ देण्यात आल्याचे समितीचे म्हणणे आहे. काही ठिकाणी पीडितांनी स्वतःहून, तर काही ठिकाणी समितीच्या प्रयत्नांनंतर गुन्हे दाखल झाल्याची माहिती महा. अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, कृष्णा चांदगुडे, अॅड. रंजना गवांदे आणि विष्णुदास लोणारे यांनी दिली.
महा. अंनिसच्या माहितीनुसार, विविध धर्मांशी संबंधित भोंदूबाबांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील महिला आणि पुरुषांची विविध कारणांनी फसवणूक केल्याचे प्रकरणांमधून समोर आल्याचा दावा समितीने केला आहे. करणी-भानामती काढणे, भूतबाधा दूर करणे, अघोरी पूजा करणे, कौटुंबिक किंवा आर्थिक समस्या सोडविणे, आजारातून मुक्त करण्याचे आश्वासन तसेच पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची उदाहरणे असल्याचे समितीने म्हटले आहे.
भीती आणि सामाजिक प्रतिष्ठेमुळे अनेक पीडित तक्रार करण्यासाठी पुढे येत नव्हते. मात्र, खरात प्रकरणानंतर पीडित महिलांना तक्रार करण्याचा आत्मविश्वास मिळाल्याचे समितीचे म्हणणे आहे. आणखी पीडितांनीही पुढे येऊन संबंधित पोलीस ठाणे अथवा महा. अंनिसशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे.
अंधश्रद्धा आणि कथित जादूटोण्याच्या नावाखाली होणारी फसवणूक रोखण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दीर्घकाळ जनजागृती केली. त्यानंतर 2013 मध्ये ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा व त्याचे समूळ उच्चाटन अधिनियम, 2013’ हा कायदा अस्तित्वात आला. महाराष्ट्र हे असा स्वतंत्र कायदा करणारे देशातील पहिले राज्य ठरल्याचे समितीने म्हटले आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी नियम लवकर तयार करावेत तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यात या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी दक्षता अधिकार्याची नियुक्ती करावी, अशी मागणी महा. अंनिसने केली आहे. संबंधित गुन्हे जादूटोणाविरोधी कायद्यासह अन्य कायद्यांतील विविध कलमांनुसार दाखल झाल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
भोंदू कितीही प्रभावशाली असला तरी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करता येतो, याची पीडितांना शाश्वती मिळाली आहे. महा. अंनिसने त्यांना मानसिक आधार आणि पाठबळ दिले. पीडितांनी समितीशी किंवा संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृष्णा चांदगुडे यांनी केले.
Cases registered against more than a hundred fraudulent godmen in the state.
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…