पूर्वीची विवाहपद्धती ही साधी-सरळ दारापुढे मांडव व ऐपतीप्रमाणे ज्याचे त्याचे आई-वडील कुवतीप्रमाणे विवाह करून देत असत व कुवतीप्रमाणे अन्नदान करत असत. त्यात सर्व नातेवाईक मंडळी आधीच लग्नघरी येत असे. त्यात सर्व नातेवाईक त्या लग्नघरी पिठलं-भाकर, वड्याची भाजी, लोणचे, पापड, चार-चार वेळेस चहा अशा प्रकारे सरळ सर्वसाधारण गरीब, श्रीमंत यांच्यात सारखीच लग्नपद्धती होती. त्या लग्नपद्धतीत डोक्यावर कंदिलाचे दिवे, बॅण्ड, ताशा, पिपाणी अशा ग्रामीण व शहरी वाद्यांना जोड देऊन वाजविली जात. नातेवाईक आपुलकीने येत असा पूर्वीच्या लग्नाचा काळ वेगळाच आनंद देत असे. आज विवाहपद्धती पूर्णपणे बदलली आहे. नातेवाईक कार्यालयात येतात, पाहुण्यांना जेवण बाहेरून येते. भारतीय बैठकीऐवजी खुर्चीला मान आला. खुर्चीवरून बसून मोठमोठ्या कार्यालयांत विवाह साजरे करतात. कुणालाच वेळ राहिला नाही. कुणीच कोणासाठी थांबायला तयार नाही. प्रेम-जिव्हाळा संपला आहे. आताच्या विवाहपद्धतीचा व्यापार झाला आहे. वर्हाडी मंडळी, नातेवाईक मुलीकडील अथवा मुलाकडील माणसे 20-20 वेळा बोलावूनसुद्धा वाहतुकीच्या साधनांत बसत नाहीत. फार कामाचा आविर्भाव आणून कार्यालयात येऊन मुखदर्शन देऊन आजचा समाज माघारी फिरू लागला आहे.
आजच्या कार्यालयीन विवाहपद्धतीमुळे फक्त कार्यालयीन मालकाचे भले झाले. सामान्य माणसाला बेगडी कृतीवर समाधान मानावे लागले. कार्यालयाची लग्ने दोन-चार लाख रुपयांना ठरतात. कार्यालयीन लग्नात भावनांचा ओलावा दिसून येत नाही. कार्यालयात लग्नाच्या वेळी बेगडी, प्लास्टिक, पुष्पगुच्छ, खोटी चलचित्र दाखवून कार्य करणार्याला खोटा आनंद मिळवावा लागतो. कार्यालयीन जेवणात फक्त भावनेचा अभाव असतो. कार्यालयीन जेवणात फक्त जेवण दिल्याचा आनंद मिळतो. परंतु, लग्नाच्या भाऊगर्दीत खर्च करूनही मिष्टान्न भोजनाचा खरोखरचा आनंद मिळतो का? अन्न चविष्ट आहे की बेचव आहे, याचा विचार कुणालाच नसतो. कार्यालयवाल्यांना इतकी घाई असते की, वेळेच्या आधी कार्यालय मोकळे करून द्यावे लागते. हा सर्व प्रकार थोडक्यात तीन तासांच्या चित्रपटासारखा झालेला आहे. कार्य करणार्या सदस्याचे मानपानासाठी उधार-उसनवारी करून खोट्या श्रीमंतीचा आव आणून ऐपत नसताना बेसुमार फटाके, मॅरेज इव्हेंट, वेगवेगळ्या प्रकारचे फोटोग्राफर कारण नसताना दिखाव्यासाठी उभे करावे लागतात. पूर्वीच्या काळी विवाहात सनई-चौघडे वाजत, मंगल वाद्यांच्या आनंदी वातावरणाची निर्मिती होत असे. परंतु, काळ तोच आहे, वेळही तोच आहे. फक्त कालचक्रात बदल झाला नाही. परंतु, माणसे त्यांचे स्वतःचे अस्तित्व सोडून नको त्या समस्या स्वतः वाढवून घेत आहेत. आता लग्नात सनई-चौघडे जाऊन सनई-चौघड्यांची जागा कर्कश डीजेच्या 200 डेसिबल अशा कर्कश वाद्यांनी घेतली आहे. तासन्तास कर्कश आवाजात बेधुंद होऊन त्या डीजेपुढे, ढोल-ताशापुढे नाचत आहे. त्यातून आताची पिढी व्यसनांच्या अधीन होऊन बर्बाद होत आहे. खरंच गरज आहे का डीजेची? त्यातून संस्कार घडतात का? याचे उत्तर नाही असेच आहे. कोणताही विवाह वेळेवर न लावणे आता फॅशन झाली आहे. तासन्तास वर्हाडी मंडळीला मोठेपणाच्या आतषबाजीमध्ये लोंबकळत ठेवले जात आहे. ही मोठ्या आवाजाची साधने, त्यामुळे दूषित होणारे वातावरण, कानाला सहन न होणारा आवाज, बेधुंद नाचणं, फोटोग्राफर खरंच गरजेचे आहेत का? यातून संस्कार घडतील का, हा मोठा विचाराचा प्रश्न आहे. विनाकारण माणसे, वर-वधू, पालक कर्जाच्या ओझ्याखाली दबत आहेत. खरंच या गोष्टीची गरज आहे का? याचे उत्तर मुळीच नाही, लग्नकार्यात सनई-चौघडे याव्यतिरिक्त इतर खर्चिक व शारीरिक, मानसिक होणारे वाद्य वाजविणे गरजेचे आहे का? ते मुळीच नाही. केवळ खोट्या श्रीमंतीचा आव आणून समाज कर्जाच्या खाईत लोटला आहे. असो. काळानुरूप माणसे बदलत आहेत तसेच विवाहपद्धतीसुद्धा बदलत आहे.
आता विवाहपद्धतीत नवीन सुधारणा झाली आहे. 1) सकाळी वैदिक पद्धत, 2) दुसरी पद्धत आपण त्याला टाळी मानतो ती पद्धत. संध्याकाळी एकाच दिवशी नवरदेव-नवरीचे दोनदा विवाह लावला जातो. यात खर्च, वेळ, संस्कार असे भासविले जाते. खरोखरच एका नवरी-नवर्याचे एकाच दिवशी दोनदा विवाह कोणत्या पद्धती आहे. शास्त्रातसुद्धा याचा बोध होत नाही. त्यामुळे काही सामान्य व्यक्ती मुला-मुलीचा विवाह एकदाच लावतात. दुपारी किंवा संध्याकाळी. आताच्या काळानुसार सकाळी वैदिक व सायंकाळी साधी पद्धत हे खरंच योग्य आहे का? हे दोन विवाह खरंच संस्काराचा भाग आहे की हौसेचा भाग आहे याचा बोध होत नाही. त्यामुळे माणसाच्या विचारात अविचार वाढण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्य माणसाला असे वाटते की, आपण तर आपल्या मुलीचा विवाह एकदाच केला. शेजार्याला वाटते की,
आपल्या मुलाचा विवाह दोनदा केला. आपले काही चुकले नाही ना, संस्कार मोडले नाही ना, खरे मुलीचे सुख एका विवाहात आहे की दोन विवाहात, यामुळे कोणाचे जास्त हित आहे, गुरुजींचे की सामान्य माणसाचे? यात घरोघरी बुद्धिमान माणसाला सदर शंका योग्य वाटल्यास कोणताही विवाह एका दिवसात करणे गरजेचे आहे की, दोनदा विवाह करणे गरजेचे आहे?
Changing marriage practices that are breaking the backs of the common man