आठ दिवसांत सुधारणा करण्याचे मनपा आयुक्तांचे आश्वासन
नाशिक : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळा-2027 निमित्त नाशिक महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असताना, या कामांमधील समन्वयाचा अभाव, नियोजनातील त्रुटी आणि सुरक्षेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पाश्वर्र्भूमीवर आमदार प्रा. देवयानी फरांदे व आमदार सीमा हिरे यांनी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेऊन नागरिकांच्या समस्या मांडल्या.
शहरात सुरू असलेल्या कामांत अनेक गंभीर त्रुटी आढळून येत असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. विकासकामे सुरू करताना आवश्यक असलेले माहिती फलक (बोर्ड) अनेक ठिकाणी लावले जात नसून, ठेकेदारांकडून मनमानी पद्धतीने रस्ते खोदकाम सुरू असल्याची तक्रार करण्यात आली. काँक्रीट रस्ते करताना महावितरणच्या वीजतारा भूमिगत करण्याचा समावेश नसल्यामुळे भविष्यात पुन्हा रस्ते खोदण्याची वेळ येणार आहे. त्यामुळेे सार्वजनिक निधीचा अपव्यय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
गटार, पाणीपुरवठा, एमएनजीएल व इतर विभागांत समन्वय नसल्याने एकाच रस्त्याचे वारंवार खोदकाम होत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. काही ठिकाणी सुरक्षेची योग्य उपाययोजना न केल्याने अपघात होऊन दोघांंचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटनाही समोर आली आहे.
रस्ते अचानक खोदल्यामुळे वाहतूक कोंडी, वाहनांचे नुकसान आणि नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणावर होत आहे. अनेक ठिकाणी रस्ते खोदून काम अपूर्णावस्थेत सोडून दिले जात आहे. काही ठिकाणी केवळ ठराविक वेळेतच काम केले जाते. त्यामुळे खोदकाम 24 बाय 7 पद्धतीने पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
पर्यायी रस्त्यांची व्यवस्था न करता रस्ते बंद केले जात असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. खड्डे भरताना योग्य तांत्रिक पद्धतींचे पालन न करता फक्त माती टाकल्यामुळे पावसाळ्यात रस्ते पुन्हा खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या सर्व बाबींमुळे नागरिकांचा रोष लोकप्रतिनिधींवर व्यक्त होत आहे. महापालिका प्रशासनाकडून या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली.
मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी या सर्व समस्यांची दखल घेत आठ दिवसांत आवश्यक सुधारणा करून सविस्तर सादरीकरण करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. संबंधित विभागांत समन्वय साधून कामे अधिक प्रभावीपणे करण्याचे निर्देश दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विकासकामांबाबत समन्वयाचा अभाव
नाशिक महापालिका हद्दीत सुरू असलेल्या सिंहस्थ कुंभमेळा-2027 निमित्त विविध विकासकामांमध्ये समन्वयाचा अभाव व नियंत्रणातील त्रुटींमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याबाबत नाशिक (मध्य)च्या आमदार प्रा. देवयानी सुहास फरांदे यांनी मनपा आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे.
अनेक ठिकाणी कामांचा तपशील दर्शविणारे फलक न लावता रस्ते खोदकाम सुरू आहे. काँक्रीट रस्त्यांच्या कामांमध्ये महावितरणच्या वीजतारा भूमिगत करण्याचा समावेश नसल्याने भविष्यात पुन्हा खोदकामाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गटार, पाणीपुरवठा, एमएनजीएल व इतर विभागांत समन्वय नसल्याने एकाच रस्त्याचे वारंवार खोदकाम होत असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सुरक्षा उपाययोजनांचा अभाव असल्याने अपघात घडून दोघांंचा मृत्यू झाल्याचीही बाब त्यांनी नमूद केली आहे. रस्ते खोदून दीर्घकाळ अपूर्ण ठेवणे, पर्यायी मार्गांची व्यवस्था न करणे आणि खड्डे भरताना तांत्रिक निकषांचे पालन न करणे यामुळे वाहतूक कोंडी, वाहनांचे नुकसान व नागरिकांची गैरसोय वाढली आहे.
Citizens’ anger over Kumbh Mela development works in Nashik