जून-जुलै महिना सुरू झाला की, निसर्गासोबतच मनही नव्या उत्साहाने बहरून येतं. रिमझिम पावसाच्या सरी, ओल्या मातीचा दरवळणारा सुगंध आणि शाळा सुरू होण्याची लागलेली उत्सुकता या सगळ्यांची एक वेगळीच जादू असते. पाऊस आणि शाळा यांचं नातं इतकं घट्ट आहे की, पावसाच्या पहिल्याच सरींसोबत बालपणातील शाळेच्या असंख्य आठवणी मनात अलगद जाग्या होतात.
ये रे ये रे पावसा,
तुला देतो पैसा,
पैसा झाला खोटा,
पाऊस आला मोठा…
हे गाणं गुणगुणत पावसात चिंब भिजत शाळेत जाण्याचा आनंद वेगळाच आहे.
शाळा सुरू होण्यापूर्वीची तयारी हा एक छोटासा उत्सवच असायचा. नवीन पुस्तके, वह्या, दप्तर, छत्री, घोंगडी यांची खरेदी, नवीन पुस्तकांचा दरवळणारा सुगंध आणि पहिल्या दिवसाची उत्सुकता आजही मनाला तितकीच आनंदी करून जाते.
शाळेत जाण्यासाठी आमचा मैत्रिणींचा एक छान गट होता. आजसारख्या शाळेच्या बस नव्हत्या. आम्ही वेगवेगळ्या मळ्यांतून एकमेकींना घेत, गप्पा मारत शाळेकडे निघायचो. आमचा चिवचिवाट अगदी चिमण्यांच्या थव्याप्रमाणे असायचा. वाटेत कुणाला हाक मारायची, कुणाला सोबत घ्यायचं आणि पाहता पाहता आमचा मोठा ग्रुप तयार व्हायचा. त्या गप्पा, ते निरागस हास्य आणि मैत्रीची ऊब आजही मनात ताजी आहे.
पाऊस सुरू झाला की मनात एकच प्रश्न यायचा-
सांग सांग भोलानाथ,
पाऊस पडेल का?
शाळेभोवती तळे साचून
सुट्टी मिळेल का?
सुट्टी मिळण्याची कल्पनाच चेहर्यावर आनंद फुलवून जायची.
या आठवणींमध्ये एक प्रसंग मात्र कायमचा मनात कोरला गेला आहे. मी चौथीत शिकत होते. त्या काळी बहुतेक मुलं कापडी पिशवी घेऊन शाळेत जायची. पण, आमच्या वर्गातील एका शिक्षकाच्या मुलीकडे सुंदर स्कूल बॅग होती. ती पाहून मलाही तशीच बॅग हवी होती. मी दादांकडे हट्ट धरला आणि दुसर्याच दिवशी त्यांनी मला ती बॅग आणून दिली. त्या क्षणी झालेला आनंद आजही आठवला की, चेहर्यावर नकळत हास्य उमटतं.
कधी सायकलने, तर कधी पायी शाळेत जाणं, वाटेत पावसात भिजणं आणि मैत्रिणींसोबत केलेली धमाल हे सारे क्षण आयुष्याची अमूल्य ठेव बनून राहिले आहेत. त्या काळी पाऊस म्हणजे त्रास नव्हता; तो तर आनंदाचा उत्सव होता.
शाळेतील मित्र-मैत्रिणी, वर्गातील खोड्या, मधल्या सुट्टीतील गप्पा आणि शिक्षकांचं प्रेमळ मार्गदर्शन यांनी प्रत्येक दिवस संस्मरणीय केला.
आज शाळेच्या व्हॅनमधून जाणार्या मुलांचा गोंगाट, सायकलवरून जाणार्या विद्यार्थ्यांच्या गप्पा आणि त्यांच्या चेहर्यावरचं निरागस हास्य पाहिलं की, नकळत आपले शाळेचे दिवस डोळ्यांसमोर
उभे राहतात.
पूर्वी आम्ही स्वतःच्या वेळेवर स्वतः तयार व्हायचो. आज मात्र आपल्या मुलांना शाळेसाठी तयार करताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. मुलींच्या वेण्या घालताना, आई, वेणी नीट नाही झाली! अशी हाक अनेकदा ऐकावी लागते. दुसर्या दिवशी डब्यात काय द्यायचं, याचाही विचार आधीपासून सुरू असतो. हे सगळं करताना नकळत आपल्या आईची आठवण येते आणि तिच्या प्रेमाची, संयमाची व त्यागाची नव्याने जाणीव होते.
खरंच, शाळा म्हणजे केवळ शिक्षण देणारी संस्था नाही; ती आयुष्यभर जपून ठेवाव्यात अशा सुंदर आठवणींचा खजिना आहे. काळ बदलतो, साधनं बदलतात, जीवनशैली बदलते; पण शाळेच्या आठवणी, पावसाचा सुगंध आणि त्या दिवसांचा निरागस आनंद मात्र कधीच बदलत नाही. म्हणूनच प्रत्येक पावसाळा नकळत आपल्याला पुन्हा एकदा बालपणात घेऊन जातो.
Childhood returned with the showers of rain.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…