नाशिक

उघड्या डीपीच्या धक्क्याने गायीचा मृत्यू

महावितरणचा निष्काळजीपणा निष्पापांच्या जीवावर

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
शहरातील उघड्या विद्युत वितरण पेट्या (डीपी) नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचे आणखी एक गंभीर आणि धक्कादायक उदाहरण सोमवारी सकाळी जेलरोडवरील श्रीरामनगर परिसरात समोर आले. हॉली फ्लॉवर शाळेजवळ असलेल्या एका उघड्या विद्युत डीपीचा तीव्र झटका बसून गायीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली, तरी महावितरणच्या या मनमानी कारभारामुळे परिसरात अत्यंत भीतीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीरामनगर परिसरातील हॉली फ्लॉवर शाळेजवळ असलेली ही विद्युत डीपी गेल्या अनेक दिवसांपासून उघड्या अवस्थेत होती. सोमवारी सकाळी एक गाय या डीपीजवळ गेली असता, तिचे शिंग थेट उघड्या पेटीत अडकले. क्षणार्धात हाय-व्होल्टेज विद्युत प्रवाह शरीरात उतरल्याने गाय जोरात खाली कोसळली व काही मिनिटांतच तिने प्राण सोडले. ही बातमी परिसरात वार्‍यासारखी पसरताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी करत महावितरणच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला.
घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर रोज मोठा भाजीपाला बाजार भरतो. अनेक विक्रेते थेट या उघड्या डीपीला टेकूनच व्यवसाय करतात. तसेच लगतच हॉली फ्लॉवर शाळा असल्याने सकाळ-सायंकाळ शेकडो विद्यार्थी व पालकांची या मार्गावर मोठी वर्दळ असते. शहरात यापूर्वीही असे अपघात घडले आहेत. नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही विद्युत विभागाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी महावितरण प्रशासनाला धारेवर धरले आहे. शहरात जिथे जिथे अशा उघड्या डीपी आहेत, त्यांचे तातडीने सर्वेक्षण करून सुरक्षित कव्हर (झाकणे) बसवण्यात यावीत. तसेच या निष्काळजी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. महावितरणने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.

शाळेजवळ अशी उघडी विद्युत डीपी असणे म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. दररोज शेकडो लहान मुले या रस्त्याने ये-जा करतात. आज एका निष्पाप प्राण्याला जीव गमवावा लागला, उद्या एखाद्या विद्यार्थ्यासोबत अशी दुर्घटना घडली तर जबाबदार कोण? महावितरणने तातडीने सर्व उघड्या डीपींची पाहणी करून या डीपीला कव्हर लावावे.
– सुदीप देब, सेक्रेटरी, हॉली फ्लॉवर स्कूल

Cow dies from electric shock from exposed transformer (DP)

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

18 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

18 hours ago