सिन्नर : प्रतिनिधी
घरच्या लक्ष्मीचे मंगळसूत्र चक्क गोठ्यातल्या ‘लक्ष्मी’ने गिळले आणि अखेरीस पशुवैद्यकांच्या शस्त्रक्रियेनंतर ते सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याची आगळीवेगळी घटना सिन्नर तालुक्यातील दापूर येथे घडली. चोरांच्या भीतीपोटी घरच्या लक्ष्मीने गायींच्या खाद्याच्या गोणीत हे मंगळसूत्र सुरक्षित ठेवले होते. मात्र, तेच गायीच्या पोटात गेल्याने काही काळ कुटुंबीयांची धाकधूक वाढली होती.
दापूर येथील शेतकरी अर्जुन संतू हळकुंडे यांचा बुवाजी बाबा मंदिराशेजारी गायींचा गोठा आहे. परिसरात चोरीच्या घटना वाढल्याने त्यांच्या पत्नीने सुमारे तीन तोळ्यांची सोन्याची पोत रात्रीच्या वेळी गायींच्या खाद्याच्या गोणीत ठेवली. मात्र, दुसर्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे अर्जुन हळकुंडे यांनी त्याच गोणीतून खाद्य काढून गायींना दिले. नकळत त्या खाद्यासोबत सोन्याची पोतही गायीच्या पोटात गेली. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांची चिंता वाढली.
गायीच्या शेणातून पोत बाहेर येईल, अशी आशा त्यांनी धरली. मात्र, तीन-चार दिवस उलटूनही तसे न झाल्याने त्यांनी नांदूर शिंगोटे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय थोरात आणि डॉ. ऋषिकेश शेळके यांच्याशी संपर्क साधला.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांनी गायीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. सुमारे एक तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर गायीच्या पोटातून तीन तोळ्यांची सोन्याची पोत सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे गायीचा जीवही वाचला आणि साडेचार लाख रुपये किमतीचे मंगळसूत्रही शेतकर्यांच्या हाती परत आले.
पोत सुरक्षित मिळाल्याने हळकुंडे कुटुंबाच्या चेहर्यावर पुन्हा हास्य फुलले. गायीलाही जीवदान मिळाल्याने गावकर्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. दापूर परिसरात ‘घरच्या लक्ष्मीचे मंगळसूत्र गोठ्यातल्या लक्ष्मीने गिळले’ ही घटना मात्र सध्या चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे.
Cow swallows three tola mangalsutra; safely removed after surgery
लासलगाव : वार्ताहर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवार (दि. 19) आणि शुक्रवार (दि. 20)…
कार्तिकी एकादशी जिला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी…
सिंहस्थासाठी साधुग्राममध्ये पंधराशे एकरमध्ये काम होणार नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील साधुग्राममध्ये विविध…
अतिरिक्त भाडेही नाही; सिटीलिंकची माहिती नाशिक : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत नाशिकसाठी 50 इलेक्ट्रिक बसेस…
महासभेत घोषणा; दुसरी जागा ठाकरे गटाने मिळवलीच नाशिक : प्रतिनिधी संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या…