पंढरपूरच्या धर्तीवर सर्वसामान्य भक्ताला महापूजेचा मान
सप्तशृंगगड : प्रतिनिधी
शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसर्या दिवशी आदिमायेचे परमशांतीपूर्ण व तपस्वी रूप असलेल्या माँ ब्रह्मचारिणीच्या पूजनानिमित्त श्री सप्तशृंगगडावर भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. हजारो भाविकांच्या उपस्थितीत सप्तशृंगगडावर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
यंदा गडावर एक अनोखी आणि भावनिक परंपरा सुरू झाली आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या धर्तीवर यंदा गडावर सर्वसामान्य भाविकाला थेट देवीच्या महापूजेचा मान देण्याची अभिनव परंपरा सुरू करण्यात आली आहे. त्याबद्दल भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
सोमवारी (दि. 12) गडावर भगवतीची पंचामृत महापूजा कळवण-सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांच्या हस्ते झाली. मात्र. यावेळी हा मान स्वतःपुरता न ठेवता आमदार पवार यांनी दर्शनासाठी गडावर आलेल्या चाळीसगाव येथील विजय पाटील या सर्वसामान्य दाम्पत्याला सोबत घेत सपत्नीक महापूजेचा मान दिला. आमदार पवार, जयश्री पवार यांच्यासोबत महापूजेचा मान मिळालेले चाळीसगाव येथील विजय पाटील दाम्पत्याने समाधान व्यक्त केले.
अलंकारांची सवाद्य मिरवणूक
दुसर्या माळेला देवीला पांढर्या रंगाचे भरजरी महावस्त्र, तसेच मंगळसूत्र, पुतळ्यांचे गाठले, कोयरीहार, नथ, चांदीचा मुकुट व कमरपट्टा असे अलंकार परिधान करण्यात आले. सकाळी देवीच्या अलंकारांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तहसीलदार रोहिदास वारुळे, ट्रस्ट पदाधिकारी, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, श्याम पवार उपस्थित होते. नवरात्र काळात मंदिर 24 तास खुले आहे. महाप्रसाद व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Crowd of devotees at the second tier of Saptashrunggad.