– आनंदा जाधव
दरवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण 30 टक्क्यांंनी घटले आहे. यातही पाऊस काही ठिकाणी अत्यल्प, तर काही ठिकाणी जुलै महिन्यात धो-धो बरसला. त्यानंतर पावसाने फिरवलेली पाठ अद्याप कायम राहिल्याने राज्य सरकारला सप्टेंबरमध्येच कोरडा दुष्काळ जाहीर करावा लागला. आत्ताच पाणीटंचाई गंभीर बनत चालल्याने पुढे मे महिन्यात पिण्यासाठी पाणी मिळेल की नाही, याची चिंता भेडसावत आहे. त्यामुळे आहे त्या पाण्याचे योग्य नियोजन करून ते आरक्षित करणे गरजेचे असतानाच नाशिकच्या धरणांमधील पाणी थेट अहिल्यानगर जिल्ह्यात पळविण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हादेखील पाणी पळविण्यात मागे नाही. असे असतानाही नाशिकचे तीन मंत्री, आमदार, खासदार मात्र याप्रश्नी गप्प आहेत. पाणीप्रश्नावर माजी आमदार अनिल कदम यांनी आवाज उठवत पुन्हा पाणी नेण्याचा प्रयत्न केला तर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. त्यातच आता श्रीरामपूर आणि वैजापूरच्या शेतकर्यांनी पुन्हा पाण्याची मागणी केल्याने आगामी काळात पाण्यावरून होणारा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वाटते.
नाशिक जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी नगदी पिकांचे प्रमाण वाढले पाहिजे.साहजिकच त्यासाठी पाण्याची उपलब्धता झाली पाहिजे, हे हेरून येथील शेतकर्यांनी सन 1885 मध्ये धरण बांधण्यासाठी जमिनी दिल्या. सन 1906 मध्ये दगड आणि मातीचा वापर करीत एक किलोमीटर लांबीचे धरणाचे काम पूर्ण करण्यात आले. त्यावेळी या धरणात जमिनी गेलेले अनेक शेतकरी भूमिहीनदेखील झाले. जिल्ह्यातील इगतपुरी आणि दिंडोरी तालुक्यात सर्वाधिक धरणे बांधण्यात आली. नाशिक व निफाडमध्ये प्रत्येक एका धरणाची निर्मिती करण्यात आली. धरणाच्या कालव्यांचे पाणी चौफेर फिरल्याने कोरडवाहू जमीन बागायती झाली अन् नगदी पिकांचे प्रमाणदेखील वाढले. त्यातूनच अर्थकारणाला गती मिळाली. परिणामी शेतकर्यांचे जीवनमानदेखील बदलले. पावसाळ्यात पाऊसदेखील भरपूर बरसत असल्याने उन्हाळ्यातदेखील पाणी टंचाई भासत नसे. कालवे, नद्या, विहिरी अन् त्याद्वारे सिंचनाच्या योजना जसे पाइपलाइन, ठिबक सिंचन. यामुळे पिकांना पाणी देणे सुलभ झाले. धरणामुळे आणि कालव्याच्या चार्यामुळे सर्वच भागांत पाणी पोहोचत असल्याने प्रारंभी उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले अन् त्यातूनच साखर कारखानदारी उदयास आली. कारखान्यापूर्वी गुर्हाळे चालवली जात असत. पावसाळ्यात धरणे भरून नद्यांद्वारे पुराचे पाणी वाहून जात असल्याने हे पुराचे पाणी आम्हाला मिळावे, अशी मागणी त्यावेळी वैजापूर, गंगापूर तालुक्यातील शेतकर्यांनी केली. पुराचे पाणी द्यायचे म्हटल्यावर येथील शेतकर्यांनीदेखील त्यास अडकाठी केली नाही. परिणामी नांदूरमध्यमेश्वर धरणातून 1100 क्यूसेस क्षमतेच्या जलद कालव्याची निर्मिती करण्यात आली. या कालव्यासाठी शेतकर्यांनी जमिनी दिल्या. मात्र, हा कालवा करताना त्यास आतून अस्तरीकरण करण्यात आले. जेणेकरून पाण्याचा अपव्यय होऊ नये.कालवा पूर्ण होताच पुराचे पाणी कालव्याने सोडले जाऊ लागले. पुढे मात्र सरकारकडे दबाव टाकून तिकडील नेते, लोकप्रतिनिधी याच कालव्याला हिवाळ्यात आणि आता उन्हाळ्यात पाणी नेऊ लागले. परिणामी आपल्या हक्काच्या पाण्यात कपात करावी लागली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नेते उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली कारखान्यांना पाणी नेऊ लागल्याने नाशिकच्या धरणातून सोडण्यात येणार्या प्रत्येक आवर्तनात कपात करण्यात येऊ लागली. अगदी जायकवाडी धरणातदेखील ऐन उन्हाळ्यात पाणी सोडल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. नांदूरमध्यमेश्वर धरणातून उजव्या आणि डाव्या कालव्याद्वारे कोपरगाव तालुक्याला पाण्याचा पुरवठा होत असतानाही याच तालुक्यातील धरणे पाण्याने भरून घेण्यासाठी गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या गोदावरी नदीपात्रातून सलग 22 तास पाणी पळविले. त्यासाठी निफाड तालुक्यातील नदीवर असणारे खेडलेझुंगे आणि कानळद येथील बंधार्याचे गेट काढण्यात आले. परिणामी आता हे बंधारे कोरडे पडले आहेत.म्हणजेच नांदूरमध्यमेश्वर धरणातील पाणी पळविण्याबरोबरच तालुक्याच्या पूर्व भागात गोदावरी नदीवरील बंधारेदेखील कोरडेठाक केले गेले. अहिल्यानगर जिल्ह्यातील जलसंपदामंत्र्यांच्या तोंडी आदेशाने हे पाणी सोडण्यात आल्याची चर्चा आहे. हे पाणी सोडण्यात आले नसल्याचा कांगावा प्रारंभी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी केला. मात्र, किती पाणी सोडले याची आकडेवारी सांगितल्यावर चाचणीसाठी पाणी सोडल्याची कबुली दिली. एवढे सारे घडूनदेखील जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी अथवा मंत्री त्याबाबत एक अवाक्षरदेखील बोलत नाही की, पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांना याचा जाब विचारू शकले नाहीत. त्यामुळे यातच सारेकाही आले. मुळात त्या-त्या जिल्ह्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी तिकडेच धरणे बांधणे गरजेचे होते.
कारण पावसाळ्यात पडणारे पाणी या धरणात साठवले जाऊ शकले असते. इकडेदेखील पावसाच्याच पाण्यावर धरणे भरली जातात अन् त्याच पाण्याचे योग्य नियोजन केले जात. मात्र, धरण बांधायचे म्हणजे जमिनी द्याव्या लागणार! मग जमीन द्यायला नको. परिणामी धरणे होत नाहीत. मग नाशिकचे पाणी मागायचे. त्यासाठी समन्यायी पाणीवाटपाचा आधार घ्यायचा. मुळात त्या जिल्ह्यावर ही वेळ का आली, याचेही आत्मचिंतन होणे गरजेचे आहे. आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे …. ला दिली ओसरी … हातपाय पसरी! त्यातलाच हा प्रकार सध्या सुरू आहे. कधी नव्हे ते यावर्षी पाण्याचे संकट उग्र रूप धारण करणार आहे.त्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. त्यातच सिंहस्थ कुंभमेळादेखील जवळ येऊन ठेपला आहे. यामुळे पाण्याची आवश्यकता भासणार आहे. अशा परिस्थितीत एखाद्या मंत्र्याच्या तोंडी आदेशाने जर अधिकारी पाणी सोडत असतील तर अशा अधिकार्यांची कीव करावी तेवढी थोडीच आहे. कारण नाशिक जिल्ह्यातीलच येवला, नांदगाव व मालेगाव या तालुक्यांतील खरीप हंगामातील अवघ्या एका पाण्यावर आलेली पिके पाण्याअभावी जळून गेली आहेत. जनावराच्या चार्याचा प्रश्न आताच गंभीर बनल्याने अनेक पशुपालक शेळ्या-मेंढ्यांसह निफाड, दिंडोरी, नाशिक तालुक्याच्या शिवारात डेरेदाखल झाले आहेत. या तालुक्यांबरोबर चांदवड, सिन्नर, निफाड, दिंडोरी, कळवण, सटाणा, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांच्या काही भागांत पिके पाण्यावाचून वाया गेली आहेत. पेठ, सुरगाणा हे डोंगराचे तालुके. त्यामुळे येथे भात आणि खरीप हंगामाशिवाय काही पिकत नाही. त्यामुळे तेथील नागरिक पावसाळा संपताच द्राक्षशेतीच्या कामासाठी नाशिक, निफाड तालुक्यात स्थलांतर करून कुटुंबाचा चरितार्थ चालवतात.
निफाड तालुक्यातील धरणापासून सायखेड्यापर्यंत गोदावरी नदीपात्रात जे काही पाणी आहे त्या पाण्याची उचल परवानगी या शेतकर्यांनी घेतल्याने प्रसंगी रात्रीचा दिवस करत पिके जगविण्यास शेतकरी प्राधान्य देत असतानाच आता गेल्या काही वर्षांपासून गोदाकाठचे वीजपंप चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नव्याने पंप खरेदी करून पिकांना पाणी द्यावे लागत आहे. त्यातही नवा पंप चोरीला जाणार नाही याची खात्री नाही. एकाच शेतकर्याचे अनेक पंप चोरीला गेल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. एकूणच पाण्यासाठी शेतकर्याची जीवघेणी कसरत सुरू असतानाच आता मंत्र्यांच्या आशीर्वादाने आमचे हक्काचे पाणीदेखील पळविले जात आहे.
लोकप्रतिनिधी मात्र त्यावर अवाक्षर काढावयास तयार नाही. लोकप्रतिनिधींचा विचार करता निफाड तालुक्याला अडीच आमदार आहेत. त्यात निफाड विधानसभेचे दिलीप बनकर, विधान परिषदेचे गोकुळ गिते आणि निफाड तालुक्यातील पूर्व भागातील 47 गावे येवला-लासलगाव मतदारसंघाला जोडली ते नामदार छगन भुजबळ. याबरोबरच तामसवाडीचे भूमिपुत्र तथा प्रगतिशील शेतकरी मात्र सध्या नांदगावमधून निवडून आलेले सुहास कांदे. लोकप्रतिनिधींची संख्या इतकी मोठी असताना या लोकप्रतिनिधींनी ठरविले तर कुणीही पाणी पळविण्याचे धारिष्ट्य करणार नाही. एकूणच काय, तर घरच झालं थोडं अन् व्याह्यान धाडलं घोडं अशी काहीशी परिस्थिती झाली आहे. अद्याप उन्हाळा पाच महिने दूर आहे अन् अशा परिस्थितीत आत्ताच जर पाणीटंचाई जाणवू लागली तर पुढे काय परिस्थिती उद्भवेल याची कल्पना न केलेली बरी? नाशिकच्या पाण्यावरून गेल्या काही दशकांपूर्वी शाब्दिक चकमकी झडल्या. अगदी रक्ताचे पाट वाहण्यापर्यंत भाषा वापरली गेली. मात्र, तेव्हाही हे सारे विरोध झुगारून नाशिकचे पाणी बंदोबस्तात नेले गेले अन् तेव्हापासूनच बाहेरील जिल्ह्याचे धारिष्ट्य वाढले आहे. आता तर तोंडी आदेशाने मनमानेल तेव्हा पाणी न्यायचे म्हणजे हा प्रकार नाशिकच्या शेतकरी वर्गाच्या ताटातील हिसकावण्यासारखाच आहे. तेव्हा पाण्यावरून संघर्ष पेटण्यापूर्वीच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येत या घटनांचा निषेध करत अधिकार्यांना जाब विचारला पाहिजे, अन्यथा पाणी पळवापळवीची ही मालिका अशीच सुरू राहील. शेवटी पाण्याविना उजाड शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची वाट बघण्याची वेळ फार लांब राहणार नाही, हे मात्र निश्चित! कारण आजही उन्हाळ्यात तालुक्यातील अनेक गावांना टँकरने पाणी पुरवावे लागते. त्यामुळे कॅलिफोर्निया, ग्रीनलँड, द्राक्षपंढरी अशा नानाविध लावल्या गेलेल्या बिरुद्या आता कागदावरच उरल्या आहेत. एकूणच काय, तर जिल्ह्याचे पूर्वीचे भूषण म्हणजे आजचं नाव मोठं अन् लक्षण खोटं अशी काहीशी परिस्थिती झाली आहे. त्यात आता ज्या पाण्यावर शेती बहरली तेच पाणी पळविले जात आहे. हे थोड झाले की काय, आता पुन्हा श्रीरामपूर आणि वैजापूर तालुक्यातील बंधारे गोदावरी नदीच्या पाण्याने भरून द्यावेत यासाठी नाशिकच्या धरणांतून पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाला पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याच्या या संघर्षात आता जिल्ह्यातील पुढारी अन् लोकप्रतिनिधी नाही तर शेतकरी, कष्टकरी आणि जिल्ह्यातील नागरिकांना एकत्र यावे लागेल, अन्यथा पाणी पळवापळवीचे सुरू झालेले सत्र असेच सुरू राहील. तसेही पिण्यासाठी पाणी देण्याला कुणाची ना नाही. मात्र, दशकापूर्वी लातूरला दुष्काळ पडला होता. त्यावेळी रेल्वेने पाणी नेण्यात आले होते.
साहजिकच वैजापूर, श्रीरामपूरसाठी टँकरने जायकवाडी धरणातून पाणी नेण्यास कुणाची ना नाही. मात्र, तिकडील धरणे भरून घ्यायची अन् हा परिसर उजाड करावयाचा ही वृत्ती बरी नाही. तेव्हा पाटबंधारे विभागाने आत्ताच पाण्याचे नियोजन करताना धरणात असणारा पाणीसाठा, त्यात मृत पाणीसाठ्याचे प्रमाण, पाण्याचे बाष्पीभवन, पाण्याचे झिरपणे आणि नाशिक जिल्ह्याला लागणारी पाण्याची आवश्यकता, तसेच सिंहस्थ कुंभमेळा हा सारा विचार करून पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.