नाशिक

नाशकात सायबर ठगांचा 45 कोटींवर ‘डल्ला’

अकरा महिन्यांत 93 गुन्हे; शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने सर्वाधिक लूट

नाशिक : देवयानी सोनार
तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि डिजिटल व्यवहारांच्या विस्तारासोबत सायबर गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत असल्याचे नाशिक शहरातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. 1 जानेवारी ते 25 नोव्हेंबर 2026 या अकरा महिन्यांच्या कालावधीत नाशिक शहरात सायबर फसवणुकीचे 93 गुन्हे दाखल झाले असून, या माध्यमातून नागरिकांना तब्बल 45 कोटी 2 लाख 51 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घालण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या एकूण फसवणुकीपैकी सुमारे 63 टक्के रक्कम केवळ शेअर मार्केट ट्रेडिंगच्या आमिषातून लुबाडण्यात आली आहे.

मोबाइल, सोशल मीडियाच्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली असून, ज्येष्ठांसह विद्यार्थी नोकरदार, महिलांनाही याचा फटका बसला आहे.
सायबर गुन्ह्यांमध्ये स्टॉक मार्केट आणि शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली झालेली फसवणूक सर्वाधिक आहे. या प्रकारातील 22 गुन्ह्यांमध्ये तब्बल 28 कोटी 24 लाख 74 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. बनावट ट्रेडिंग अ‍ॅप, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि अधिक परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले जाते. सुरुवातीला नफा दाखवून विश्वास संपादन केला जातो आणि त्यानंतर मोठी रक्कम गुंतवल्यावर ती परत मिळविण्यात अडथळे निर्माण केले जातात.
दुसर्‍या क्रमांकावर हाउस अरेस्टच्या नावाखाली होणार्‍या फसवणुकीचा समावेश आहे. या प्रकारातील 11 गुन्ह्यांत 5 कोटी 47 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. पोलीस, सीबीआय किंवा अन्य तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना फोन केला जातो. मनी लॉन्ड्रिंग किंवा अन्य गुन्ह्यात सहभाग असल्याची भीती दाखवून त्यांना व्हिडिओ कॉलवर ठेवले जाते. चौकशीच्या नावाखाली बँक खात्यातील रक्कम हस्तांतरित करण्यास भाग पाडले जाते. शेअर ट्रेडिंग आणि हाउस अरेस्ट या दोन प्रकारांत मिळून 33 गुन्ह्यांमध्ये सुमारे 33 कोटी 72 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.
क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीच्या केवळ दोन गुन्ह्यांत 2 कोटी 16 लाख रुपये लुबाडण्यात आले आहेत. वेबसाइट, जाहिराती आणि बनावट ईमेलद्वारे सात गुन्ह्यांत 2 कोटी 40 लाख रुपये, तर पॉलिसी परतावा आणि गुंतवणुकीच्या आमिषातून तीन गुन्ह्यांत एक कोटी 48 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. जॉब फ्रॉड आणि टेलिग्रामच्या माध्यमातून सहा गुन्ह्यांत एक कोटी 26 लाख रुपये गमवावे लागले आहेत. याशिवाय बनावट ई-मेल, म्युल अकाउंट, ओटीपी, रिमोट क्सेस अ‍ॅप, क्रेडिट-डेबिट कार्ड आणि ऑनलाइन खरेदीच्या माध्यमातूनही फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत.
आर्थिक फसवणुकीव्यतिरिक्त सोशल मीडियाशी संबंधित 13, डेटा चोरीचे दोन आणि ऑनलाइन जुगाराचा एक गुन्हा दाखल झाला आहे. या 16 गुन्ह्यांमध्ये आर्थिक नुकसानीची नोंद करण्यात आलेली नाही. पोलिसांकडून सायबर गुन्हे होऊ नये यासाठी शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

ऑनलाइन फ्रॉडचा प्रकार                                                संख्या
फ्रॉड कॉल                                                                                            03
डिजिटल अरेस्ट                                                                                   11
एमएलजीएल/ आरटीओ चलन/एपीके फाईल                                       05
क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड                                                                        03
क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक आमिष                                                          02
इन्व्हेस्टमेट फ्रॉड                                                                                03
फ्रॉड ई-मेल                                                                                         06
ओटीपी/एनी डेस्क अ‍ॅप/रिमोट अ‍ॅक्सेस                                                04
बनावट ई-मेल                                                                                     07
जॉब फ्रॉड/ टेलिग्राम                                                                            06
ऑनलाइन खरेदी                                                                                 02
शेअर मार्केट ट्रेडिंग                                                                               22
सोशल मीडिया                                                                                     13

 

येथे साधा संपर्क
अनपेक्षितरीत्या मिळणारे अधिक नफ्याचे आमिष, अनोळखी लिंक, बनावट सरकारी अधिकारी किंवा कुरिअर कंपनीच्या नावाने येणारे फोन आणि संशयास्पद अ‍ॅप्स यापासून नागरिकांनी सावध राहणे आवश्यक आहे. कोणतीही तपास यंत्रणा फोन किंवा व्हिडीओ कॉलद्वारे अटक अथवा डिजिटल अरेस्ट करू शकत नाही. आर्थिक फसवणूक झाल्यास वेळ न दवडता तातडीने 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

 

डिजिटल अरेस्ट, अनोळखी लिंक व एपीके फाइल यापासून नागरिकांनी सावध राहावे. पोलीस कधीही व्हिडीओ कॉलवर अटक करत नाहीत किंवा पैसे मागत नाहीत. कोणालाही बँक तपशील देऊ नका. फसवणूक झाल्यास तत्काळ 1930 वर किंवा http://cybercrime.gov.in वर तक्रार करा.
– सुशीला कोल्हे, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन, नाशिक शहर

Cyber ​​fraudsters swindle over ₹45 crore in Nashik

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

रोज चालण्याचे महत्त्व

लिपिड प्रोफाइल आणि निरोगी हृदयाचे गुपित सध्याच्या बैठ्या आणि धावपळीच्या जीवनशैलीत हृदयविकाराचा धोका झपाट्याने वाढत…

3 hours ago

हेमंत ऋतू आणि आयुर्वेद

गुलाबी थंडीची चाहूल लागली की, निसर्गासोबतच मानवी शरीरातही अनेक बदल घडू लागतात. आयुर्वेदाने वर्षाची सहा…

3 hours ago

भारताचे संविधान : लोकशाहीचा आत्मा

भूमीत माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळतो, त्या भूमीचा खरा आधार तिचे संविधान असते. डॉ.…

3 hours ago

अक्करमाशी

दरवर्षी भरणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे महाराष्ट्राचा सर्वांत मोठा सांस्कृतिक उत्सव. महाराष्ट्राची सांस्कृतिक…

3 hours ago

थंडीचा कडाका वाढताच ऑनलाइन योग वर्गार्ंची क्रेझ

घरबसल्या नागरिकांकडून आरोग्याची काळजी नाशिक : प्रतिनिधी शहरात थंडीचा कडाका वाढू लागल्याने सकाळी लवकर घराबाहेर…

4 hours ago

सिंहस्थात डिजिटल ट्विन तंत्रज्ञानाचा वापर

15 डिसेंबरपर्यंत सर्व विभागांना कृती आराखडे सादर करण्याच्या सूचना नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्यातील संभाव्य…

4 hours ago