तरुण

व्हायब्रेट मोडमधी रिमझिम

मोबाइल व्हायब्रेट झाला तेव्हा रात्रीचे साडेदहा वाजले होते. जूनचा पहिला पाऊस शहरावर मनसोक्त बरसत होता. खिडकीच्या काचांवर थेंबांची अखंड टपटप सुरू होती. अधूनमधून आकाशात वीज चमकत होती आणि क्षणभर सगळं जग उजळून निघत होतं.
पावसाच्या रात्रींमध्ये एक वेगळीच जादू असते. त्या माणसाला त्याच्या जवळच्या लोकांची आठवण करून देतात. काही जुन्या आठवणी नकळत ओल्या होतात. काही चेहरे पुन्हा डोळ्यांसमोर येतात. विवेक खिडकीजवळ बसून पाऊस पाहत होता.
हातात गरम चहाचा कप होता आणि समोर टेबलावर मोबाइल पडला होता. आज काही विशेष नव्हतं. तरीही मन अस्वस्थ होतं. काही दिवसांपासून त्याचं असंच होत होतं. कारण त्याच्या आयुष्यात कुणीतरी आलेलं होतं. अजून त्याने तिला प्रेम व्यक्त केलं नव्हतं. तिनेही काही स्पष्ट सांगितलं नव्हतं.
पण दोघांच्या गप्पांमध्ये आता एक वेगळी ऊब आली होती.
दिवसभरात कितीही लोकांशी बोललं तरी रात्री तिच्याशी बोलल्याशिवाय दिवस पूर्ण होत नव्हता. पहिलं प्रेम असंच असतं बहुतेक. सुरुवातीला ते प्रेम आहे हेही कळत नाही.
फक्त त्या व्यक्तीची सवय लागते.. तिचा मेसेज दिसला की चेहर्‍यावर हसू येतं.
तिने रिप्लाय करायला उशीर लावला की, मनात काळजी दाटून येते अन् ती Take care.  म्हणाली की संपूर्ण दिवस सुंदर वाटतो.
बाहेर अचानक कडकडाट झाला. आकाशात मोठी वीज चमकली. त्याच क्षणी टेबलावर पडलेला मोबाइल हलकेच व्हायब्रेट झाला. विवेकचं हृदय नकळत धडधडलं. त्याने घाईघाईने मोबाइल उचलला. स्क्रीनवर तिचं नाव झळकत होतं, सोबत..
Online…
आणि खाली तिचा मेसेज.
खूप पाऊस पडतोय ना?
बस्स… इतकंच..
पण त्या एका वाक्याने त्याच्या मनात जणू हजारो काजवे उजळले. आजच्या प्रेमात गंमत अशी असते की, समोरची व्यक्ती साधा प्रश्न विचारत असते, पण तरीही समोरच्याला त्यामध्ये काळजी दिसते. आपुलकी दिसते. आपण तिच्या आठवणीत आहोत, याचा आनंद दिसतो.
त्याने रिप्लाय केला.
हो… आणि खूप छान वाटतंय.
तिचं Typing सुरू झालं.
तो स्क्रीनकडे बघत राहिला.
असेही आजकाल तोंड कमी बोलतं.. बोटं Typing जास्त बोलतात..
काही सेकंदांनी तिचा मेसेज आला.
मला पाऊस खूप आवडतो…
विवेक हसला. मग सुरू झाल्या पावसावरच्या गप्पा.
तिला ओल्या मातीचा सुगंध आवडायचा. त्याला खिडकीत बसून पाऊस बघायला आवडायचं. तिला गरम भजी आवडायची. त्याला चहा.
किती साध्या गोष्टी होत्या त्या. पण प्रेम मोठ्या गोष्टींमध्ये नसतंच कधी.
ते अशाच छोट्या छोट्या आवडीनिवडींमध्ये वाढत जातं. पाऊस बाहेर कोसळत होता. तर मोबाइलमधून गप्पा वाहत होत्या. मध्येच पुन्हा एकदा आकाशात वीज चमकली आणि त्याच वेळी तिचा आणखी एक मेसेज आला.
भीती वाटते रे विजांची…
तो काही क्षण स्क्रीनकडे पाहत राहिला. एवढ्याशा वाक्यात किती विश्वास दडलेला होता.
माणूस ज्याच्याजवळ स्वतःची भीती सांगतो…
तिथे कुठेतरी मन जाऊन पोहोचलेलं असतं.
विवेकने लिहिलं…
काळजी करू नकोस… मी आहे ना…
मेसेज पाठवल्यानंतर त्यालाच हसू आलं. तो तिच्यापासून कित्येक किलोमीटर दूर होता.
तरीही मी आहे ना, म्हणताना त्याला खरंच वाटलं होतं की तो तिच्यासोबत आहे.
प्रेमाचं गणित कधीच अंतरावर चालत नाही. ते फक्त भावनांवर चालतं.
रात्रीचे साडेअकरा वाजले… मग बारा.. पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता.. अन् त्यांच्या गप्पाही.. कधी शाळेच्या आठवणी. कधी कॉलेज. कधी आवडती गाणी. कधी भविष्यातली स्वप्नं तर कधी नकळत आलेली शांतता आणि त्या शांततेतही एकमेकांची सोबत.. कधी कधी पहिलं प्रेम व्यक्त होत नाही.. ते फक्त जगलं जातं. त्या रात्रीही तसंच झालं. कोणीI Love You म्हटलं नाही. कोणतीही वचनं दिली नाहीत. फक्त पाऊस पडत राहिला. मोबाइल अधूनमधून व्हायब्रेट होत राहिला आणि दोन मनं एकमेकांच्या थोडी अजून जवळ येत राहिली. रात्री झोपण्याआधी तिचा शेवटचा मेसेज आला.
आजची रात्र खूप छान होती…
विवेकने स्क्रीनकडे पाहिलं. बाहेर अजूनही पावसाची रिमझिम सुरू होती. त्याने हळूच मोबाइल उशाजवळ ठेवला. चेहर्‍यावर एक हसू होतं. मनात एक नवी धडधड होती आणि पावसाचे थेंब अजूनही खिडकीवर पडत होते.
आजही अनेकांना त्यांचं पहिलं प्रेम आठवतं, ते एखाद्या फोटोमुळे नाही… एखाद्या जुन्या चॅटमुळेही नाही.. तर अशाच एखाद्या पावसाळी रात्रीमुळे. जिथे विजा चमकत होत्या… मोबाइल व्हायब्रेट होत होता… आणि कुणीतरी पहिल्यांदा मनात घर करत होतं…

Drizzle in vibrate mode.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

19 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

19 hours ago