तरुण

मैत्री एक अनमोल ऋणानुबंध

– सुनीता सांगळे

जीवने यथा मातापितृयोः स्थानं महत्त्वपूर्णमस्ति, तथा मित्रस्य स्थानमपि महत्त्वपूर्णम्।
असं संस्कृत भाषेतून मैत्रीचं महत्त्व सांगणारं वाक्य वाचनात आलं आणि मनात सहज एक प्रश्न निर्माण झाला-खरंच, आयुष्यात मैत्रीचं स्थान इतकं महत्त्वाचं असतं का? विचार केला आणि मनाने उत्तर दिलं-होय! नक्कीच!
मानवी जीवन हे नात्यांनी विणलेलं असतं. जन्माला आल्यापासून माणूस अनेक नात्यांनी जोडला जातो. आई-वडील, भाऊ-बहीण, आजी-आजोबा आणि इतर नाती ही आपल्याला जन्मतःच मिळतात. या नात्यांना आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असतं. मात्र, या सर्व नात्यांव्यतिरिक्त आयुष्याच्या प्रवासात आपण स्वतःच्या इच्छेने, विचारांनी आणि भावनांनी जोडलेलं एक नातं असतं-ते म्हणजे मैत्रीचं नातं.
मैत्री हे असं नातं आहे, जे रक्ताचं नसतं; पण रक्ताच्या नात्यांइतकंच, कधी कधी त्याहूनही अधिक जिव्हाळ्याचं असतं. हे नातं जन्मतः मिळत नाही, ते आपण आपल्या आयुष्यात कमवतो. एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाशी आपले विचार जुळतात, तिच्या सहवासात आपल्याला आपलेपणा जाणवतो, तिच्यासमोर मन मोकळं करता येतं आणि तिच्यावर मनापासून विश्वास ठेवता येतो-तेव्हा मैत्रीचा अंकुर मनात रुजतो.
फक्त एखाद्याच्या सोबत असणं म्हणजे मैत्री नव्हे. सहवास आणि मैत्री या दोन भिन्न गोष्टी आहेत. सहवासामुळे मैत्रीची सुरुवात होऊ शकते; पण सहवास संपला म्हणून मैत्री संपतेच असं नाही. खर्‍या मैत्रीला अंतराची, वेळेची किंवा परिस्थितीची बंधनं नसतात. शरीराने दूर असले तरी मनाने जवळ असणं, हीच तर खरी मैत्री!
म्हणूनच आपल्या बालपणीच्या मैत्रिणी, शालेय जीवनातील मित्रमैत्रिणी आणि त्यांच्यासोबत घालवलेले दिवस आयुष्यभर संस्मरणीय राहतात. त्या काळात कदाचित आपल्याला मैत्री म्हणजे नेमकं काय, हेही माहीत नसतं. तरीही कोणीतरी आपल्यासाठी खास असतं. एकत्र खेळणं, एकत्र अभ्यास करणं, छोट्या छोट्या गोष्टींवर हसणं, रुसणं, भांडणं आणि पुन्हा क्षणात एकत्र येणं-या सगळ्यातून मैत्री नकळत आकार घेत असते.
बालपणीच्या मैत्रीत स्वार्थ नसतो. कोण मोठं, कोण छोटं, कोण श्रीमंत, कोण गरीब याचा विचार नसतो. फक्त मन जुळतं आणि मैत्री होते. म्हणूनच कदाचित बालपणीच्या मैत्रीच्या आठवणी मनाच्या एका कोपर्‍यात कायमच्या जपल्या जातात.
मैत्रीमध्ये प्रत्येक गोष्ट शब्दांत सांगावीच लागते असं नाही. बोलण्यासाठी शब्दांची गरज असते; पण काही भावना शब्दांच्या पलीकडे असतात. काही गोष्टी आपण प्रत्येकाशी बोलू शकत नाही. मनातील दुःख, भीती, चिंता किंवा एखादा आनंद प्रत्येकासमोर व्यक्त करता येत नाही. पण खर्‍या मित्रासमोर मात्र मन सहज उघडतं.
कधी कधी मैत्रीत शब्दांपेक्षा शांतताच अधिक बोलकी असते.
एखादी नजर पुरेशी असते. एखादा साधा प्रश्न-काय झालं?-मनातील अनेक भावनांना वाट करून देतो. आणि कधी कधी तर काहीही न बोलता समोरचा आपलं मन ओळखतो. मला वाटतं, इथूनच खरी मैत्री सुरू होते.
खर्‍या मैत्रीचा पाया हा विश्वासावर उभा असतो. विश्वास असेल तर गैरसमजही दूर करता येतात; पण विश्वास नसेल तर जवळीक असूनही नातं टिकत नाही. मैत्रीत एकमेकांच्या चुका समजून घेणं, गरजेच्या वेळी योग्य सल्ला देणं आणि चुकीच्या मार्गावर जात असताना थांबवणंही तितकंच महत्त्वाचं असतं. कारण खरा मित्र तोच, जो फक्त आपल्या चांगल्या काळात टाळ्या वाजवत नाही; तर आपल्या कठीण काळात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा राहतो.
मैत्रीचा अर्थ फक्त एकत्र हसणं नाही, तर एकत्र रडण्याचीही तयारी असणं आहे. आनंदाच्या क्षणी आपल्या आनंदात सहभागी होणारे अनेकजण भेटतात; पण दुःखाच्या वेळी न सांगता जवळ येणारा मित्र फार मौल्यवान असतो. म्हणूनच म्हणावंसं वाटतं-
आनंद वाटला की वाढतो आणि दुःख वाटलं की कमी होतं; या दोन्ही गोष्टींचा खरा अर्थ मैत्रीतच अनुभवायला मिळतो.आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसं भेटतात. काही जण काही काळासाठी येतात आणि निघून जातात. काही जण आपल्या आयुष्यातील एखाद्या टप्प्यापुरतेच सोबत असतात. तर काही जण काळाच्या ओघात दूर गेले तरी त्यांच्या आठवणी मात्र मनात कायम राहतात. प्रत्येक मैत्री आयुष्यभर टिकेलच असं नाही; पण प्रत्येक खरी मैत्री आपल्याला काहीतरी शिकवून जाते.कधी कधी परिस्थितीमुळे मित्रमैत्रिणी दूर जातात. शिक्षण, नोकरी, लग्न किंवा जीवनातील इतर जबाबदार्‍यांमुळे भेटी कमी होतात. पूर्वीसारख्या गप्पा होत नाहीत. संपर्क राहत नाही. पण मनातला जिव्हाळा तसाच राहतो. वर्षानुवर्षे भेट झाली नाही तरी भेटल्यावर पुन्हा जुन्याच आठवणी जाग्या होतात आणि असं वाटतं की, काळ जणू तिथेच थांबला होता.

Friendship: A Priceless Bond

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मोगरा फुलला

- प्रणाली देशमुख ए ऐक ना! बघ मी काय आणलंय, पळसाच्या पानाला बांधलेला धागा उकलत…

11 hours ago

समावेशित शिक्षणातून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाची नवी दिशा

- विजया अवचार प्रत्येक मुलाच्या डोळ्यांत एक स्वप्न असते-शिकण्याचे, घडण्याचे आणि आयुष्यात स्वावलंबी होण्याचे. काही…

11 hours ago

रस्त्यांची चाळण, नागरिकांचे हाल

- जगन घाणेकर  यंदाचा पावसाळा सुरू होण्यास विलंब झाला असला तरी जेव्हापासून त्याचे आगमन झाले…

11 hours ago

बंडाळी चव्हाट्यावर!

तीन राज्यांतील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांची चर्चा सर्वत्र होत आहे. भाजपाला दोन…

12 hours ago

जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेकडून कर्जावरील व्याजदरात अर्धा टक्का कपात

नीलेश देशमुख : ऑगस्ट 2026 पासून निर्णय लागू; चार हजार कर्जदारांना लाभ नाशिक : प्रतिनिधी…

12 hours ago

वैद्यकीय सुविधेचा स्थायी सदस्यांकडून पंचनामा

समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक : सभापती सानप नाशिक : प्रतिनिधी शहरातील महापालिकेच्या बिटको रुग्णालयासह डॉ.…

12 hours ago