सिडको : प्रतिनिधी
प्रस्तावित नाशिक रिंगरोडसाठी गौळाणे आणि आंबेबहुला परिसरातील शेतजमिनी बाधित होत असल्याने प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी सोमवारी मुंबईतील एमएसआयडीसी कार्यालयात धडक देत अधिकार्यांसमोर आपल्या विविध मागण्या मांडल्या. भूसंपादन प्रक्रियेत उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन झाले नसल्याचा आरोप शेतकर्यांनी यावेळी केला.
प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली बाधित शेतकर्यांनी मुंबईतील बक्तावर बिल्डिंग, नरिमन पॉईंट येथील एमएसआयडीसी कार्यालयात मुख्य अभियंता रणजीत हांडे आणि सहव्यवस्थापक गिरीश जोशी यांची भेट घेतली. रिंगरोड प्रकल्पासंदर्भात वरिष्ठ अधिकार्यांसोबत बैठक घेऊन शेतकर्यांच्या अडचणी व प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
सन 2013 च्या भूसंपादन कायद्यानुसार प्रक्रिया राबवावी, उच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करावी, रिंगरोडशी संबंधित सर्व कागदपत्रे बाधित शेतकर्यांना उपलब्ध करून द्यावीत, तसेच प्रकल्पाच्या तांत्रिक बाबींबाबत सविस्तर माहिती द्यावी, अशा मागण्या शेतकर्यांनी केल्या. यावेळी एसआयटी अहवालाबाबतही अधिकार्यांकडे विचारणा करण्यात आली. हा अहवाल जिल्हा प्रशासनाशी संबंधित असल्याचे अधिकार्यांकडून सांगण्यात आल्याचे शेतकर्यांनी नमूद केले. भूसंपादन प्रक्रिया, रिंगरोडची तांत्रिक माहिती आणि उपलब्ध कागदपत्रांवरही बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर काही कागदपत्रे शेतकर्यांना देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, वारंवार मागणी करूनही बैठकीसाठी वेळ दिला जात नसल्याची तक्रार शेतकर्यांनी केली. बैठकीनंतरही समाधान झाले नसल्याचे सांगत रिंगरोड प्रकल्पाला विरोध कायम ठेवण्याचा निर्धार शेतकर्यांनी व्यक्त केला. मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करण्याचा इशारा एमएसआयडीसी अधिकार्यांना देण्यात आला. या आंदोलनात दौलत चुंबळे, संजय चुंबळे, संतोष शहाणे, दत्तू थापेकर, सुरेश देशमुख, रमेश गडकरी, त्र्यंबक चुंबळे, राजाराम चुंबळे, ओमकार देशमुख, संजय चव्हाण यांच्यासह गौळाणे व आंबेबहुला परिसरातील बाधित शेतकरी सहभागी झाले होते.
चर्चेनंतरही शेतकर्यांचे समाधान नाही
एमएसआयडीसी अधिकार्यांसोबत झालेल्या चर्चेत अनेक मुद्दे मांडले. मात्र, या चर्चेतून आमचे समाधान झालेले नाही. त्यामुळे मागण्यांची दखल न घेतल्यास पुढील आंदोलन दिल्लीतील जंतर-मंतर येथे करण्यात येईल.
– साहेबराव दातीर, अध्यक्ष, प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना
Farmers affected by the Ring Road project hold a meeting with MSIDC officials in Mumbai.
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…