विद्युत पंप, केबल व स्टार्टर चोरीच्या घटनांत वाढ
निफाड : तालुका प्रतिनिधी
तालुक्याच्या गोदाकाठ भागात विद्युत पंप, केबल आणि स्टार्टर चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मागील पाच वर्षांपासून हा भुरट्या चोरांचा सुळसुळाट सुरू असून, पोलिसांकडून केवळ ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, प्रत्यक्ष चोरटे सापडत नसल्याने चोरट्यांचे मनोधैर्य बळावले असून, पोलिसांनी तातडीने या चोरांवर वचक प्रस्थापित करण्याची मागणी संतप्त शेतकर्यांमधून होत आहे.
सप्टेंबर महिन्यातच तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना, दुसरीकडे विजेचा लपंडाव शेतकर्यांना मेटाकुटीस आणत आहे. यातच गोदाकाठच्या प्रत्येक गावात नदीकाठचे विद्युत पंप, जलपरी, केबल आणि स्टार्टर चोरीला जात असल्याने शेतकरी पुरते धास्तावले आहेत. दिवसा वीज नसते आणि रात्री पिकांना पाणी द्यावे लागते; परंतु अशा स्थितीत पिकांना पाणी द्यावे की कृषिपंपांचे राखण करावे, असा गंभीर प्रश्न शेतकर्यांसमोर उभा ठाकला
आहे.
गेल्या दोन दिवसांत सुंदरपूर शिवारातून तब्बल 20 विद्युत पंप चोरीला गेले आहेत. यात विजय बाळासाहेब सोमवंशी यांचे पाच पंप, तर राजेंद्र बाळासाहेब सोमवंशी, रावसाहेब धोंडीराम सोमवंशी, जनार्दन सोमवंशी, उत्तम संपतराव सोमवंशी, एकबाल रज्जाक शेख, अनिल आबासाहेब सोमवंशी, संतोष दिनकर सोमवंशी, संजय बबनराव सोमवंशी, विजय दत्तात्रय सोमवंशी आणि बाळासाहेब सोमवंशी यांच्यासह 20 शेतकर्यांचा समावेश आहे.
याशिवाय, इतर गावांमधील चोरीची आकडेवारी- काथरगाव : 20 पंप, कुरडगाव : 15 पंप, सायखेडा : 13 पंप, शिंगवे : 7 पंप, शिवरे व चापडगाव : प्रत्येकी 5 पंप, जळगाव व भुसे : प्रत्येकी 3 पंप, तसेच कोठुरे, चांदोरी, गोंडेगाव, मांजरगाव, तारुखेडले, तामसवाडी, करंजी खुर्द, खेडलेझुंगे, कोळगाव आणि कानळद येथीलही शेतकर्यांचे पंप चोरीला गेल्याचे समोर
आले आहे.
चोरीच्या पद्धतीत बदल अन् बिबट्याची भीती
गेल्या दोन वर्षांपर्यंत चोरटे प्रामुख्याने नदीकाठचे पंप चोरायचे; मात्र आता पाण्यातील जलपर्यादेखील चोरीला जाऊ लागल्या आहेत. चोरटे मोटारीतील तांब्याची (कॉपर) वायर काढून नेत आहेत, तर काही ठिकाणी संपूर्ण पंपच उचलून नेला जात आहे. विशेष म्हणजे, याच परिसरात बिबट्याचा वावर अधिक असल्याने रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देताना किंवा पंपाचे रक्षण करताना शेतकर्यांच्या जिवात जीव नसतो.
पाणीटंचाई अन् विजेचा लपंडाव
पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर चोरांचा लवकर बंदोबस्त करू आणि गावात ग्रामरक्षक दल स्थापन करून गस्त वाढवा, असे आश्वासन दिले जाते; परंतु प्रत्यक्षात चोरटे जेरबंद होत नसल्याने चोरांचे फावले आहे. आधीच पाणीटंचाई आणि त्यात विजेचे लपंडाव अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकर्यांना नवीन विद्युत पंप खरेदीचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत असून, नाहक मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
माझे एकट्याचे पाच विद्युत पंप चोरीला गेले आहेत. पोलिसांत तक्रार देऊनही आजपर्यंत एकही चोरटा सापडलेला नाही. दिवसा वीज नाही आणि रात्री पिकांना पाणी द्यावे की पंपाचे राखण करावे, असा मोठा प्रश्न पडला आहे. त्यातच परिसरात बिबट्याचा संचार असल्याने जीव मुठीत धरून जगावे लागत आहे. पोलिसांनी वेळीच या चोरट्यांवर कडक वचक प्रस्थापित करावा.
-विजय सोमवंशी,
शेतकरी, सुंदरपूर
Farmers in the Godavari riverbank area are in distress.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…