संपादकीय

आर्थिक उदारीकरणाचे जनक : पी. व्ही. नरसिंह राव

भारताचे माजी पंतप्रधान, नवीन आर्थिक धोरणाची सुरुवात करणारे, विद्वान व्यक्तिमत्त्व पी. व्ही. नरसिंह राव यांची आज पुण्यतिथी. 28 जून 1921 रोजी आंध्र प्रदेशातील करीमनगर जिल्ह्यातील वंगारा या गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण उस्मानिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठ येथे झाले. मातृभाषा तेलुगूबरोबरच हिंदी, इंग्रजी, मराठी, कन्नड यांसारख्या दहा भाषांसह सहा विदेशी भाषादेखील त्यांना अवगत होत्या. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात आणि हैदराबाद मुक्तिसंग्रामात त्यांनी भाग घेतला.
1935 मध्ये हैदराबादच्या निजामाने विद्यापीठात वंदे मातरम् हे गीत गाण्यास बंदी घालून निजामाचे गौरव करणारे गीत गाण्याचा आदेश दिला होता, तेव्हा विद्यार्थिदशेतील नरसिंह राव यांनी त्याला कडाडून विरोध केला होता. 1962 मध्ये ते पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री बनले. 1971 पर्यंत ते केंद्रात मंत्री होते. यादरम्यान त्यांनी गृह, परराष्ट्र आणि संरक्षण यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली. 1971 ते 1973 या काळात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात भूमी सुधारणा लागू करणारे आंध्र प्रदेश हे भारतातले पहिले राज्य बनले. 1977 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले, पण नरसिंह राव विजयी झाले. 1984 व 1989 ची लोकसभा निवडणूक त्यांनी महाराष्ट्रातील रामटेक मतदारसंघातून लढवली व जिंकली. 1991 मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येनंतर ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर त्यांची पंतप्रधान म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. पंतप्रधान बनल्यावर देशाची विस्कटलेली आर्थिक घडी सांभाळण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांची अर्थमंत्री म्हणून नेमणूक केली. मनमोहन सिंग निष्णात अर्थतज्ज्ञ होते. नरसिंह राव, डॉ. मनमोहन सिंग या जोडीने आधीच्या सरकारचे सर्व निर्णय बाजूला ठेवून आर्थिक उदारीकरणाचा मार्ग स्वीकारला. ज्यावेळी अतिशय गंभीर आर्थिक संकटातून देश सावरला त्यावेळी नरसिंह राव यांना फादर ऑफ इंडियन इकॉनॉमिक रिफॉर्म्स असे म्हटले जाऊ लागले. यासाठी 1994 साली डॉ. मनमोहन सिंग यांना युरोमनीने सर्वोत्तम अर्थमंत्र्यांच्या पुरस्काराने गौरविण्यात आले तेव्हा त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, याचे खरे श्रेय नरसिंह राव यांना दिले गेले पाहिजे. नरसिंह राव सरकारने 1992 सालच्या अर्थसंकल्पात परकीय गुंतवणुकीला पोषक धोरण आणले. त्यामुळे शेअर बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले. मोठ्या प्रमाणावर तोट्यात असलेल्या सरकारी संस्थांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी खाजगीकरणाची सुरुवात नरसिंह राव यांनी केली. सेबी अर्थात, सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजची सुरुवातदेखील त्यांनीच केली. देशाच्या विकासाला गती देण्यासाठी त्यांनी खासदार निधीची सुरुवात केली.
सत्तेवर आल्यावर त्यांनी पंजाबमध्ये निवडणुका घेतल्या या निवडणुकीनंतर बियांत सिंग पंजाबचे मुख्यमंत्री बनले. त्या सरकारने दहशतवादाविरुद्ध कठोर पावले उचलून राज्यात शांतता प्रस्थापित केली. पंजाबमधील दहशतवादाचे उच्चाटन करण्यात व फुटीरतावादी चळवळीला क्षीण करण्यात नरसिंह राव यांनी त्यांच्या खंबीर निर्धाराचे दर्शन घडवले. नरसिंह राव म्हणायचे, जग बदलले आहे. देशातही बदल झाले पाहिजेत. आपल्या याच सिद्धांताला सोबत घेऊन भारताच्या परराष्ट्र धोरणाला नवा आकार देत त्यांनी आग्नेय आशियायी देशांसोबत मैत्रीचा प्रारंभ लूक ईस्ट या धोरणाने केला.
सत्तेवर असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने 1998 च्या निवडणुकीत काँग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारली.त्यामुळे त्यांनी राजकारण संन्यास घेतला. त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप न्यायालयात सिद्ध होऊ
शकले नाहीत. 23 डिसेंबर 2004 ला त्यांचे निधन झाले. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन!

Father of Economic Liberalization: P. V. Narasimha Rao
 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू झाले की, घरोघरी…

6 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

15 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

27 minutes ago

पाथरे खुर्दमध्ये सशस्त्र दरोडा

शेतकर्‍याला मारहाण करून 12 लाखांचा ऐवज लुटला ♦ किचनचा दरवाजा तोडून चौघांचा बंगल्यात प्रवेश ♦…

34 minutes ago

मोहदरी घाटात कंटेनर उलटला; नाशिक-पुणे महामार्ग ठप्प!

समोरील टायर फुटल्याने अपघात सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी…

40 minutes ago