मनपा आयुक्तांचे निर्देश
नाशिक : प्रतिनिधी
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी मंगळवारी (दि. 8) परिपत्रक काढत मिरवणूक मार्गावरील प्रमुख रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करून रस्ते खड्डेमुक्त करावेत, असे निर्देश दिले. त्याबाबतचे परिपत्रकच त्यांनी काढले आहे.
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने महापालिकेच्या विविध विभागांनी तातडीने त्यांच्या अखत्यारीतील कामे वेळेत पूर्ण करून एकमेकांशी समन्वय ठेवून कामकाज करावे, असे निर्देश मनपा आयुक्त खत्री यांनी परिपत्रकाद्वारे विभागप्रमुखांना दिले आहेत. आयुक्तांनी संबंधित विभागप्रमुखांशी व्हिसीद्वारे संपर्क साधत गणेशोत्सवाच्या अनुषंगाने केल्या जाणार्या कामांचा आढावा घेतला. गणेश मंडळांना मागणीनुसार मंडप उभारण्यासाठी प्राप्त अर्जानुसार एक खिडकीद्वारे तातडीने परवानगी देण्याची सूचना विभागीय अधिकारी, जाहिरात व परवाने विभागाला दिली आहे. शहरातील प्रमुख चौक, मुख्य रस्ते, बाजारपेठा, तसेच मिरवणूक मार्गावरील सर्व खड्डे तातडीने बुजवावेत. रस्ते दुभाजक व वाहतूक बेटे स्वच्छ करून शहरात कोठेही रस्त्यावर पाणी तुंबल्याने वा ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचनाही केली आहे. मिरवणूक मार्गावरील वाहतुकीस अडथळा ठरणार्या वीजतारा व अन्य केबल्स काढून घेणे, तसेच उत्सवाच्या काळात सर्व भागातील वीजपुरवठा अखंडित होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश आयुक्तांनी विद्युत विभाग, तसेच अतिक्रमण विभागाला दिले आहेत. उत्सवकाळात संपूर्ण शहरात पाणीपुरवठा सुरळीत व मुबलक राहील यादृष्टीने दक्षता घेणे, तसेच कोणत्याही भागातून दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी आल्यास तातडीने निराकरण करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
उत्सवकाळात सर्व विभागीय अधिकार्यांनी त्यांच्या भागात दररोज पाहणी दौरा करून तेथील स्वच्छता, अतिक्रमणे, पथदीप व इतर व्यवस्थेचा आढावा घेणे, तसेच सर्व प्राप्त तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. संपूर्ण यंत्रणा 24 तास कार्यान्वित राहील याबाबतचे नियोजन करण्याची सूचना अग्निशमन विभागाला करण्यात आली आहे.
Fill the potholes on the procession route.