(भाग 1)
प्रत्येक अंधश्रद्धेशी निगडित जनमानसातल्या पुरातन काळातल्या श्रद्धा निश्चितच आहेत… आई उवाच… मांजर आडवे जाणे, कावळा ओरडणे, कुत्र्याचे रडणे, गायबैल आदी जित्राबांचे हंबरणे किंवा निसर्गातल्या असंख्य घडणार्या घटनांशी शुभाशुभ संकेतांची जुळवणी आहेच. लेख लिहिण्याचा उद्देश अंधश्रद्धांना खतपाणी घालण्याचा निश्चितच नाही. पण प्रत्येक अंधश्रद्धेमागचे शास्त्र समजावून घेऊन सध्याच्या आधुनिक युगात अंधश्रद्धांमागील कारणे समजावून घेऊन त्याविषयी समाजाला विचार करायला भाग पाडण्याचा तर्क निश्चितच आहे. निर्मुलन आपोआपच होईल.
खूप पूर्वी माणूस जंगलात रहायचा. जंगलात एकतर मधोमध त्याची वस्ती असायची वा जंगलाच्या चहूबाजूंनी माणूस वसाहत करून राहायचा. नदीच्या किंवा मोठ्या गोड्या पाण्याच्या जलाशयाच्या साधारण सपाट भूमीवर नागरी वसाहत होती. माणसाच्या जगण्याची संसाधने एकतर शेती आणि जंगलातली फळे, कंदमुळे, बी, लता, वेली, लाकुडफाटा, औषधी वनस्पती, इत्यादी होती. जंगल विपुल होते. त्यामुळे वन्यजीवही साहजिकच अमाप असणार. मांजर, कावळे किंवा माकडे मानववस्तीच्या सहवासात किंवा सान्निध्यात, जवळपास राहणारे जीव आहेत. ज्या वेळेला एखादा हिंस्त्र प्राणी मनुष्यवस्तीत शिरकाव करायचा. त्यावेळेला साहजिकच मांजर त्याच्या भयावह म्यांवकोलाहलासहित सैरावैरा पळायचे, कुत्रे अचानक जोरात भयावह भुंकायचे, कावळा कर्कश्श प्राण कंठाशी आल्यासारखा काव-काव करायचा तर माकडे झाडांवर भयानक किचकिचाट करायचे. वस्तीतील लोकांना समजायचे की नक्कीच हिंस्त्र प्राण्याचा शिरकाव झाला आहे. एकतर ते कामाला बाहेर पडायचेच नाही. जर कोणी बाहेर शेतात कामानिमित्त गेले असतील तर एकतर घरी येण्याची शाश्वती नाही. आले तरी सुखरूप, धडधाकट येतीलच याची हमी नाही. म्हणून या सर्वच जीवांचे विशिष्ट भयावह आवाज अशुभाचे संकेत मानले गेले. आजच्या भव्यदिव्य महानगरात मात्र हे संकेत अंधश्रद्धा म्हणून फोफावले, हे सत्य आहे.
जंगलांच्या मुळावर माणूस पूर्वीपासूनच उठलेला आहे. पांडवांनी इंद्रप्रस्थ नगरी खांडववनाची तोड करूनच वसवली होती. त्यावेळेला झाडे मुळासकट उपटणे किंवा जंगलाला आग लावुन नष्ट करणे असे उपाय त्याकाळातील माणूस योजत असावा. जंगलात राहणार्या वनवासींनी त्या काळात विरोध केला म्हणून युद्ध सुद्धा झाले आणि अनेक वनवासी धारातीर्थी पडले. म्हणून आजही झाडोर्याला गावाबाहेर कुठे आगीचे लोळ दिसले तर भयशंकेची पाल भावुक सज्जन मनात चुकचुकते. वनवा पेटल्यास वन्यजीव जंगलाबाहेर मनुष्यवस्तीकडे पळ काढणे साहजिकच असते. म्हणूनही अजाणतेपणीही निर्मनुष्य दुरवर लागलेल्या आगीस सगळे घाबरतातच.
नांगरलेल्या शेतीत उंदीर किंवा चिचुंद्रया सैरावैरा पळत असतील तर बळीराजा घाबरतोच पण बैल, गाय इ. जनावरेदेखील मागचे खुर उधळून उड्या मारतात. उंदरांचे असे पळणे अशुभाचा संकेत असला तरी शेतात साप विशेषतः विषारी सापांचे अस्तित्व किंवा हिंस्त्र प्राण्याचा शिरकाव याची शक्यता जास्त असते पण त्यासोबतच जर मुंगुस दिसला तर तो मात्र शुभसंकेत असतो. कारण साप आणि मुंगसाचे हाडवैर प्रत्येकालाच चांगलेच माहिती आहे. पण नांगरलेल्या शेतीत मात्र वाणी, पैसा इत्यादी छोटे सरीसृप बघितले तर शेतीची नांगरणी चांगली झाली आहे आणि पीक पण अमाप येईल या अंदेशानेच बळीराजा सुखावतो आणि वाणी पैसा गांडुळ यांना लक्ष्मीचे रूप मानतो. पूर्वी घोड्यांच्या टापांचे आवाज ऐकले तर माणसे घरात दडत. कारण घोडेस्वार एकतर शत्रुपक्षाचे असायचे जे संपत्ती तसेच मुली-बायका, लहान मुले पळवण्यासाठी येत असत किंवा राजाचे सैनिक करवसुलीसाठी येत. त्यामुळेही घोड्यांच्या टापांचा आवाज अशुभ मानला जात असे. कुत्र्यांचे घ्राणेंद्रिय आत्यंतिक तीक्ष्ण असते. हे तर सर्वमान्य आहे. पूर्वी युद्धात मरण पावलेल्या सैनिकांचे किंवा इतर कारणांनी मरण पावलेल्यांचे शव जेव्हा घरी आणले जायचे त्यावेळेला गोठलेल्या रक्ताचा वास सहन न होऊन कुत्र्यांच्या डोळ्यातून पाणी यायचे आणि ते घशातून रडण्यासारखा आवाजही काढायचे म्हणून कुत्र्यांचे रडणे हे आजही अत्यंत अशुभ मानले जाते. रवंथ करणार्या प्राण्यांची त्वचा अतिशय संवेदनशील असते. छोटा खडा जरी मारला तरी ती थरथरते. याबाबतीत अकबर बिरबलाची कथाही सर्वश्रुत आहे. भूगर्भात होणार्या हालचाली, किंवा वातावरणातले बदल त्यांची त्वचा ताबडतोब टिपते. त्यामुळे भूकंप, वादळ, चक्रीवादळ इ. अनेक बदल त्यांच्या लक्षात येतात. बळीराजाला त्यांच्या हालचालींवरून आगामी संकटाची चाहूल लागते. किनार्यावर येणार्या विशिष्ट माशांच्या संख्येवरून कोळी समुद्री वादळ किंवा त्सुनामीचा अंदाज लावतात. आजूबाजूला साप किंवा हिंस्त्र प्राण्याचे अस्तित्व केवळ त्यांच्या डोळ्यांच्या हालचालींवरून बळीराजाला समजत असते. अंधश्रद्धांमागील श्रद्धा जर जाणून घ्यायच्या असतील तर निसर्गाच्या शाळेत शिकलेल्या शेतकर्याचे किंवा रानावनात राहणार्या सुशिक्षित वनवासींचे मार्गदर्शन घ्यायला हरकत नाही. नव्वदच्या दशकात मुंबईच्या एका उपनगरातील सोसायटीबाहेर दर्शनार्थींची मोठी रांग लागली होती.
(क्रमश:)
From Faith to Superstition
आजकाल प्रत्येक घरात संध्याकाळी एक दृश्य अगदी सर्रास पाहायला मिळतं-कामानिमित्त बाहेर गेलेली माणसं घरी परततात,…
ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा; ‘विकासाच्या केवळ गप्पा नकोत‘ सुरगाणा : प्रतिनिधी तालुक्यातील उंबरदे गावातील स्मशानभूमीची…
ताणतणाव,जीवनशैली आणि होमिओपॅथीची भूमिका. सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत मग प्रेग्नन्सी का होत नाही? फर्टिलिटी क्लिनिकमध्ये…
पचनसंस्थेचे अधिक अचूक निदान एन्डोस्कोपिक अल्ट्रासाउंड (ईयूएस) हे एन्डोस्कोपी आणि अल्ट्रासाउंड तंत्रज्ञानाचे संयोजन असलेले आधुनिक…
भाग 2 विमानाचा पायलट निवडताना त्याच्या शिक्षणाचा आणि प्रशिक्षणाचा निकष न लावता जो इच्छुक असेल…
भाजपाच्या नेतृत्वाखालील नॅशनल डेमॉक्रॅटिक अलायन्स (एनडीए) म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता असलेल्या 21 राज्यांमध्ये 2029…