नाशिक : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना काटकसरीचे आवाहन केल्यामुळे सोने-चांदीसह सर्वच क्षेत्रांत संभ्रमाचे वातावरण आहे. सोने-चांदीवरील आयातशुल्क वाढविल्याने सोने-चांदी दराने उच्चांक गाठला आहे.
सोने प्रतिदहा ग्रॅम एक लाख 65 हजार 500 रुपये, तर चांदी तीन लाख रुपये प्रतिकिलो या नव्या उच्चांकी दरावर पोहोचले आहे.
सोने-चांदी दरात विक्रमी वाढ झाली असून, सोने आठ हजार रुपयांनी वाढले. चांदी 15 हजारांनी महागली आहे. चांदीचे दर दोन लाख 98 हजारांवर
पोहोचले आहेत.
मोेदींच्या आवाहनानंतर सराफ व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, कारागिरांवर संक्रांत आली आहे. या दरवाढीमुळे करचोरीचीही भीती सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
भारतीयांचे सोनेप्रेम जगजाहीर आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सोन्याची गरज कायम लागते. कधी हौस म्हणून, तर कधी गरज, तर कधी गुंतवणूक म्हणून सोने खरेदी केले जाते. परंतु, गेल्या काही वर्षांत सोने दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे लग्नसराई किंवा सण, मुहूर्त यानिमित्ताने सुवर्णखरेदी केली जाते. पण, त्यावर मर्यादा आल्या आहेत. औद्योगिक क्षेत्रात चांदीचा वापर वाढल्याने चांदीचेही दर कमालीचे वाढले आहेत.
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर सोने-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती. पण, आयातशुल्क वाढविल्यामुळे त्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे.
केंद्र सरकारकडून वाढवण्यात आलेले आयातशुल्क आणि त्याच पार्श्वभूमीवर झालेली सोने खरेदीसंदर्भातील वक्तव्ये यामुळे उत्तर महाराष्ट्रातील लहान सराफ व्यावसायिक आणि पारंपरिक कारागिरांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. आधीच वाढती महागाई, कमी होत चाललेली ग्राहक खरेदी क्षमता आणि ऑनलाइन स्पर्धेमुळे छोटा व्यवसाय दबावाखाली आहे. अशा निर्णयांचा थेट परिणाम ग्रामीण व निमशहरी भागातील हजारो कारागिरांच्या रोजगारावर होऊ शकतो. – चेतन राजापूरकर, अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र आयबीजेए
एकीकडे सरकार लोकल फॉर व्होकल नारा देते अणि सोने दागिने बनवणारे कारागीर, जे भारतीय हस्तकला अणि निर्यातीसाठी एमएसएमई कर्ज घेऊन काम करण्याची तयारी दाखवून होत़े हेे कारागीर काम नसल्याने रस्त्यावर येतील. असा निर्णय घेणे कितपत योग्य आहे? हे समजत नाही. अशा प्रकारे एक इंडस्ट्री पूर्ण संपून जाऊ शकते. आयातशुल्क 15 टक्के वाढल्याने लग्नसराईत जे सोने 1,50,000 तोळा घेतले ते आज एक लाख 64 हजार झाले. म्हणजे त्याची गुंतवणूक 15 हजार रुपये नफा मिळाला. इतर देश अणि आपल्या देशात भावात फरक पडल्यास करचोरी वाढेल, कारण पूर्वापार भारतीय सामान्य जनता सरकार किंवा कोणापेक्षा सोन्यावर विश्वास ठेवते, ते दिवसेंदिवस खरे होताना दिसतेय.
– मेहुल यशवंत थोरात, उपाध्यक्ष, दि नाशिक सराफ असोसिएशनसरकारने सोने-चांदीवरील आयातशुल्क वाढवणे हा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि फायदेशीर निर्णय आहे. सध्याच्या जागतिक अस्थिरतेमुळे इंधनासारख्या अत्यावश्यक आयातीसाठी भारताला मोठ्या प्रमाणावर परकीय चलनाची गरज आहे. आयातशुल्क वाढविल्याने सोन्याची आयात नियंत्रणात राहील. त्यामुळे देशाचे परकीय चलन वाचेल. चालू खाते तूट कमी होईल आणि भारतीय रुपयाला भक्कम आधार मिळेल.
पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी किमान एक वर्ष भौतिक सोन्याची खरेदी टाळावी किंवा कमी करावी. त्याऐवजी सॉव्हरिन गोल्ड बाँड्ससारख्या डिजिटल पर्यायांमध्ये गुंतवणूक करावी. यामुळे देशाबाहेर जाणारा पैसा थांबेल आणि या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताचे आर्थिक स्थैर्य टिकवून ठेवण्यास मोठी मदत होईल. – सागर नागरे, जेमॉलॉजिस्ट आणि सराफ व्यावसायिक
सीमाशुल्कात मोठी वाढ
केंद्र सरकारने सोने-चांदीवरील सीमाशुल्क (कस्टम ड्यूटी) दरात मोठी वाढ केली आहे. 13 मेपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल यांनी याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे.
नव्या दरानुसार सोने आणि चांदीवरील बेसिक कस्टम ड्यूटी 5 वरून थेट 10 टक्के करण्यात आली आहे. अॅग्री इन्फ्रा डेव्हलपमेंट सेस 1 वरून 5 टक्के करण्यात आला आहे. सोशल वेल्फेअर सरचार्जमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सोने-चांदीवरील एकूण सीमाशुल्क 6 वरून 15 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारात सोने-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
असे आहेत दर
सोने (24 कॅरेट) : प्रति 10 गॅ्रम 1,58,100 रुपये
सोने (22 कॅरेट) : प्रति 10 गॅ्रम 1,57,000 रुपये
चांदी : 2,67,000 रुपये प्रतिकिलो जीएसटीसह.
‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…
अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…
बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…
पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…
109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…
1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…