प्रतिमा

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र इतकं सरळ नाही. डिझेल हा देशाच्या दळणवळणाचा आणि अर्थव्यवस्थेचा मुख्य पाठीचा कणा आहे. डिझेलचे दर वाढले की, वाहतूक खर्च थेट वाढतो. वाहतूक खर्च वाढला की, शेतातून बाजारात येणारी भाजी, कारखान्यातून निघणारे धान्य आणि अगदी रोजच्या वापराचे दूध, अंडी, औषधेही महागतात. जेव्हा इंधनाचे दर गगनाला भिडतात, तेव्हा गृहिणीच्या स्वयंपाकघरातील बजेट संपूर्णपणे कोलमडते. डाळींचे भाव ऐकून तोंडचे पाणी पळते, तेलाचा डबा खरेदी करताना हात थरथरतात आणि भाज्यांचे दर पाहून डोळ्यात पाणी येते. तेल, साखर, गॅस सिलिंडर… प्रत्येक गोष्टीवर महागाईची कुर्‍हाड कोसळली आहे. सामान्यांचा खिसा छोटा होत चालला आहे आणि महागाईचा अजस्र विळखा मात्र अधिकच घट्ट होत चालला आहे. एकीकडे उत्पन्न आहे तेवढेच आहे. किंबहुना अनेकांचे रोजगार सुटल्यामुळे किंवा पगार कपात झाल्यामुळे ते कमी झाले आहे आणि दुसरीकडे खर्च मात्र दुपटीने-तिपटीने वाढतो आहे. मध्यमवर्गीय आणि कष्टकरी माणसाची अवस्था ‘आसमान फाटलंय, तिथे ठिगळ कुठे कुठे लावणार?’ अशी झाली आहे.
बचत शून्य : भविष्यासाठी, आजारपणासाठी दोन पैशांची बचत करणे तर आता दूरचे स्वप्न वाटू लागले आहे. सुरक्षित भविष्याची जागा आता रोजच्या जगण्याच्या चिंतेने घेतली आहे.
तडजोड आणि विशेषत: आई-वडिलांच्या औषधांमध्ये कपात, मुलांचा छोट्या-छोट्या सुखांमध्ये कपात आणि सरतेशेवटी
स्वतःच्या पोटच्या भुकेमध्ये कपात! हे आजचे विदारक वास्तव आहे.शेतकरी आणि कष्टकर्‍यांची दुहेरी कोंडी. या महागाईचा सर्वांत मोठा मार जर कोणाला बसत असेल तर तो आपल्या देशाच्या अन्नदात्याला म्हणजेच शेतकर्‍याला. शेती हा आता फायद्याचा धंदा राहिला नसून, केवळ एक जुगार बनला आहे.
उत्पादन खर्चात अतोनात वाढ : ट्रॅक्टरचे भाडे वाढले आहे, कारण डिझेल महागले आहे. शेतीसाठी लागणारी खते, बियाणे, कीटकनाशके यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
नशिबाचे खेळ : एवढा खर्च करून पीक आले तर त्याला बाजारात योग्य भाव मिळत नाही. पण तेच पीक जेव्हा व्यापार्‍यांच्या हातातून ग्राहकांपर्यंत पोहोचते तेव्हा वाहतूक खर्चामुळे ते सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाते.
या दुहेरी कात्रीत शेतकरी आणि सामान्य ग्राहक दोघेही भरडले जात आहेत. मधल्या मध्ये नफा कमावणारी यंत्रणा गब्बर होत आहे आणि घाम गाळणारा कष्टकरी मात्र उपाशी राहत आहे.
पांढरपेशा वर्गाची ‘मौन’ गळचेपी : मध्यमवर्गीय आणि पांढरपेशा वर्गाची व्यथा तर आणखी वेगळी आहे. हा असा वर्ग आहे जो गरिबांसारखा रस्त्यावर येऊन रडू शकत नाही आणि श्रीमंतांसारखा पैसा उडवू शकत नाही. समाजात आपली पत आणि अब्रू राखण्याच्या नादात हा वर्ग आतल्या आत गुदमरतो आहे. वाढत्या इंधन दरामुळे दुचाकी किंवा चारचाकी वापरणे म्हणजे ‘पांढरा हत्ती’ पोसण्यासारखे झाले आहे. ऑफिसला जाण्यासाठी लोकल, बस किंवा शेअर रिक्षा पकडताना होणारी पैशांची ओढाताण या वर्गाला मानसिक तणावाच्या दरीत लोटत आहे. मरण स्वस्त आणि जगणं महाग, अशी अवस्था या वर्गाची झाली आहे.
मानवी संवेदनांची होणारी होरपळ ः संध्याकाळी बाजारात गेल्यावर पाच रुपयांची कोथिंबीर द्या ना म्हणून केविलवाणा चेहरा करणारी एखादी माउली किंवा भाजीवाल्याशी दोन-दोन रुपयांसाठी हुज्जत घालणारे पांढरपेशा वर्गातले लोक पाहिले, की काळजात चर्रर होतं. दोन पैसे वाचवण्यासाठी कडक उन्हात मैलोन्मैल पायपीट करणारे वृद्ध पाहिले, की जाणवतं महागाईने फक्त माणसाचा खिसा रिकामा केला नाही, तर त्याचे जगण्याचे आत्मबळ आणि स्वाभिमानही हिरावून घेतला आहे.
माणसाला स्वतःच्याच मूलभूत गरजांसाठी याचक बनवून सोडले आहे. मॉल्स आणि फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये हजारो रुपये उडवणारा एक नवश्रीमंत वर्ग देशात तयार होत असताना, दुसरीकडे भाजीच्या पेंढीसाठी आणि एकवेळच्या दुधासाठी पै-पैचा हिशेब करणारा अथांग गरीब भारत होरपळतो आहे. ही आर्थिक दरी सामाजिक अस्वस्थतेची ठिणगी बनत चालली आहे. चूल पेटतेय की गरिबाच्या स्वप्नांची राख होतेय?
‘उज्ज्वला’ योजनेचे आणि इतर घरगुती गॅस सिलिंडर आज अनेक मध्यमवर्गीय आणि गरीब घरांच्या कोपर्‍यात धूळ खात पडले आहेत. महागाई ही आंतरराष्ट्रीय कारणांमुळे किंवा युद्धांमुळे वाढतेय, असे जागतिक दाखले देऊन सरकार आपली मूळ जबाबदारी झटकू शकत नाही. जनतेला जागतिक अर्थशास्त्र समजत नाही. त्यांना फक्त आपल्या पोटची भूक आणि खिशाची ऐपत समजते.
सणासुदीचा बेरंग आणि हरवलेला आनंद ः आपला भारत हा सणांचा देश आहे. पण महागाईच्या या सुलतानी संकटामुळे आता सण-उत्सव साजरे करणेही सामान्यांच्या अवाक्याबाहेर गेले आहे. दिवाळी असो वा गणेशोत्सव असो, बाजारात पूर्वीसारखी रौनक उरलेली नाही. कपडे, गोडधोड आणि कंदील-लाइट्स खरेदी करताना ‘खिसे कापावे’ लागत आहेत. सणांचा आनंद आता आनंदाचा न राहता ‘खर्चाचे ओझे’ वाटू लागला आहे. वडिलांनी आपल्या लहान मुलाला खेळणे नाकारताना आणि आईने सणाला नवा कपडा न घेताना चेहर्‍यावर आणलेले ते खोटे हसू… ही महागाईने दिलेली सवार्ंंत मोठी जखम आहे. आता तरी डोळे उघडणार का?
इंधनाचा भडका उडे, खिसा मात्र आटतो आहे, कष्टाचा हा घाम आता रक्तासारखा वाटतो आहे…
विकासाच्या गप्पा सारे एसीत बसून मारतात, पण गरिबाच्या चुलीमध्ये रोज कोळसा पेटतो आहे.

Death is cheap and life is expensive.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अंबडमध्ये कचराकुंडीत नवजात अर्भक फेकले, नागरिकांत संताप

सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावातील एका शाळेजवळील कचराकुंडीत मृत अर्भक आढळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी…

3 minutes ago

सुचितानगरला घरफोडीत 36 लाख लंपास

सिडको : विशेष प्रतिनिधी येथील सुचितानगर परिसरातील बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोने, चांदी, हिर्‍यांचे…

8 minutes ago

लाच स्वीकारताना एकाच वेळी आठ जण रंगेहाथ ताब्यात

नाशिक: प्रतिनिधी सागाचे झाड तोडून त्याची विक्री करण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात 11,500 रुपयांची लाच स्वीकारताना…

12 minutes ago

कत्तलीसाठी जाणारे वाहन पकडले

गुन्हेशोध पथकाची कामगिरी; 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त पंचवटी : प्रतिनिधी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर…

17 minutes ago

मधमाशी : जीवसृष्टीतील सर्वोत्तम वरदान

आज 20 मे, जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो. अँतोन जोंसा या जगप्रसिद्ध मधुमक्षिकापालन…

22 minutes ago

शनि अमावस्येची काळरात्र

सिन्नर-नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर सुरू झालेली चर्चा थांबलेली…

26 minutes ago