नाशिक

बिटको रुग्णालयात आरोग्य सेवांचा बोजवारा; प्रभाग सभापतींची अचानक पाहणी

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
महापालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (बिटको) रुग्णालयातील आरोग्य सेवांबाबत सातत्याने येणार्‍या तक्रारींची दखल घेत प्रभाग सभापती रमेश धोंगडे यांनी बुधवारी रुग्णालयाची अचानक पाहणी केली. या पाहणीत वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याचे, सोनोग्राफी तपासणीसाठी रुग्णांना तब्बल महिनाभर प्रतीक्षा करावी लागत असल्याचे तसेच स्वच्छतेसह अनेक मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याचे
समोर आले.
पाहणीदरम्यान क्षयरोग (टीबी) कक्ष जनरल लॅबमध्येच सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे इतर रुग्णांनाही संसर्गाचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. रुग्णालयातील शौचालये व स्नानगृहांची अत्यंत अस्वच्छ अवस्था, कर्मचारी व मनुष्यबळाची कमतरता तसेच काही खासगी कंत्राटदारांकडून मनमानी कारभार होत असल्याच्या तक्रारीही धोंगडे यांच्या निदर्शनास आल्या. औषध वितरण व्यवस्थेतील अनियमिततेबाबतही रुग्णांनी नाराजी व्यक्त केली. काही रुग्णांकडून औषधांसाठी पैसे घेतले जात असून, त्याबदल्यात अधिकृत पावती दिली जात नसल्याची गंभीर तक्रार यावेळी करण्यात आली. धोंगडे यांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांशी संवाद साधून विविध समस्या जाणून घेतल्या. रुग्णालयातील सर्व त्रुटी तातडीने दूर करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. तसेच आगामी महासभेत लक्षवेधीद्वारे हा विषय उपस्थित करून संबंधित अधिकार्‍यांकडून स्पष्टीकरण मागितले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नगरसेवक कैलास मुदलियार, सतीश निकम तसेच सामाजिक कार्यकर्ते श्याम गोहाड आणि प्रशांत बारगळ उपस्थित होते. नागरिकांना दर्जेदार, पारदर्शक व वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, आरोग्य सेवेत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही रमेश धोंगडे यांनी दिला.

‘बिटको’त 45 रुग्णांचा भार एका परिचारिकेवर

मनपाच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (बिटको) रुग्णालयात परिचारिकांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णसेवा करताना परिचारिकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. हे करत असताना रुग्णसेवेच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
बिटको रुग्णालयात महापालिका कार्यक्षेत्रासह ग्रामीण भागातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. या ठिकाणी दिवसभर रुग्णांची रेलचेल दिसून येते, मात्र येथील दाखल रुग्णांना उपचाराअभावी त्यांची हेळसांड होते. या रुग्णालयातील मेल सर्जिकल विभागात तब्बल 45 खाटा आहेत. या खाटांवरील रुग्णांना केवळ एक परिचारिका सेवा देताना दमछाक होत आहे. शासनाच्या निकषांनुसार परिचारिकांची संख्या असणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात एका परिचारिकेवर 45 रुग्णसेवेचा भार पडत असल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
बिटको रुग्णालयात मनुष्यबळाच्या कमतरतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 200 हून अधिक खाटांचे हे महापालिकेचे प्रमुख रुग्णालय असतानाही मेल सर्जिकल वॉर्डमधील 45 खाटांसाठी फक्त एकच परिचारिका कार्यरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे औषधोपचार, इंजेक्शन, रुग्णांचे निरीक्षण, नातेवाइकांशी समन्वय आणि इतर दैनंदिन कामांचा प्रचंड ताण एका परिचारिकेवर येत असल्याची चर्चा आहे. वैद्यकीय तज्ज्ञ उपचाराची दिशा ठरवत असले तरी रुग्णांची प्रत्यक्ष सेवा आणि देखभाल ही परिचारिकांवरच अवलंबून असते. अशा परिस्थितीत एका परिचारिकेकडून 45 रुग्णांना
दर्जेदार सेवा मिळणे शक्य आहे का, असा सवाल रुग्ण व नातेवाईक उपस्थित करत आहेत. रुग्णालयात नुकतेच शिशु कक्ष व रक्तपेढीचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, नवीन सुविधा सुरू करताना त्या सुरळीत चालविण्यासाठी आवश्यक कर्मचारी उपलब्ध आहेत का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. रुग्णालयातील मनुष्यबळ वाढविण्याची मागणी अनेक सामाजिक संघटना व नागरिकांनी वरिष्ठांकडे केली असल्याचे सांगितले जाते. परिचारिकांना रुग्णसेवेसोबत नोंदी वही भरणे, इन्व्हेंटरी, रुग्णांच्या तक्रारींचे निराकरण, पोलिस प्रकरणांमध्ये समन्वय अशा अनेक प्रशासकीय जबाबदार्‍याही पार पाडाव्या लागतात.

प्रशासनाची रुग्णांबाबतची स्पष्ट उदासीनता दिसून येत आहे. मनपाच्या हॉस्पिटलवर वारेमाफ खर्च केला जातो, मात्र रुग्णांना खर्‍या अर्थाने सेवा देणार्‍या परिचारिका कर्मचारी यांच्यावर खर्चाचे लक्ष केंद्रित केले तर चांगल्या पद्धतीने रुग्णांना सेवा देता येईल. मनपा आयुक्तांनी कर्मचारी भरतीकडे लक्ष द्यावे, अन्यथा ‘उबाठा’च्या वतीने आंदोलन करू.
– योगेश गाडेकर, नाशिकरोड

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

17 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

17 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

17 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

18 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

18 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

18 hours ago