आई : एक न संपणारी भावना आई… हा शब्द उच्चारला की मन नकळत शांत होतं. आयुष्याच्या गर्दीत हरवलेलं माणूसपण पुन्हा सापडतं आणि डोळ्यांच्या कडा आपोआप ओलावतात. आई म्हणजे काय?
भरउन्हातली सावली, कडाक्याच्या थंडीतली ऊब, आणि काळजाला पडलेल्या जखमेवरचं, सर्वांत मऊ आणि कोमल असं मलम! आजकाल सोशल मीडियावर मदर्स डेची मोठी धूम दिसते. फोटो, स्टेटस आणि महागड्या भेटवस्तूंचा पाऊस पडतो. सगळं काही सुंदर दिसतं, पण मनात एक प्रश्न कायम टोचत राहतो – आईसाठी खरंच एकच दिवस पुरेसा असतो का? आईचे
निःस्वार्थ जगणे.
आई म्हणजे फक्त एक नातं नसतं, ती एक भावना असते जी आपल्या जन्माआधीपासून शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आपल्यासाठी जगत असते.तिच्या आयुष्यात स्वतःसाठी हा शब्दच नसतो. तिचं जग म्हणजे तिची लेकरं, त्यांचं हसू आणि त्यांचं भविष्य.
घरात सगळे झोपलेले असतानाही तिची झोप मुलांच्या काळजीत अडकलेली असते.स्वतःच्या स्वप्नांना मुरड घालून ती आपल्या स्वप्नांना आकाश देते. तिच्या हातावरचे फोड आपल्याला दिसत नाहीत, कारण ती वेदनांवर हसू लेवून जगत असते. आई म्हणजे स्वतः उपाशी राहून मुलांच्या ताटात शेवटचा घास वाढणारी व्यक्ती. आजच्या धावपळीच्या जगात आपण पैसा, प्रतिष्ठा आणि मोठी घरं कमावतो, पण नकळत आईसोबतचा वेळ हरवून बसतो. जेव्हा आई नसते, तेव्हा ते मोठं घरही रिकामं वाटू लागतं. आईच्या हातच्या भाकरीची चव कोणत्याही पंचतारांकित हॉटेलमध्ये मिळत नाही. तिच्या मायेचा स्पर्श कोणत्याही औषधात नसतो. खरा मदर्स डे कसा साजरा करावा? आज फक्त सोशल मीडियावर पोस्ट टाकू नका. त्याऐवजी वेळ द्या, थोडा वेळ आईजवळ बसा, तिच्या केसांवरून हात फिरवा. विचारपूस करा, तिला प्रेमाने विचारा- आई, तू थकली नाहीस ना? तिला महागड्या वस्तू नको असतात. तिला फक्त तुमचे दोन प्रेमाचे शब्द हवे असतात.
आईसाठी कोणताही एक स्पेशल डे असूच शकत नाही, कारण तिचा प्रत्येक दिवस त्यागाचा आणि प्रेमाचा असतो. वेळ निघून गेल्यावर फोटोसमोर उभं राहून रडण्यापेक्षा, ती सोबत असतानाच तिचं मन जपा. जगातील प्रत्येक नोकरीला, व्यवसायाला किंवा पदाला निवृत्तीचे एक वय असते. वयाची साठ-पासष्ट वर्षे झाली की, माणूस कामाच्या जबाबदारीतून मोकळा होतो. निवृत्तीनंतर तो आरामात,
स्वतःच्या छंदांमध्ये वेळ घालवू शकतो. पण आपल्या घरात एक अशी व्यक्ती असते, जिच्या नियुक्तीपत्रावर निवृत्तीची कोणतीही तारीख नसते… ती म्हणजे ‘आई’.
आईच्या कामाची सुरुवात सूर्य उगवण्यापूर्वी होते आणि घराचे दिवे मालवल्यानंतरही तिचं काम संपलेलं नसतं. सण असो, वार असो किंवा स्वतःची तब्येत ठीक नसली तरी, आईचा ‘स्वयंपाकघर’ नावाचा विभाग कधीच बंद नसतो. जगातील इतर नोकर्यांमध्ये वीकेंड असतो, ओव्हरटाइमचे पैसे मिळतात, पण आईला मात्र 365 दिवस विनामोबदला आणि विनासुट्टी काम करावं लागतं. मुले लहान असताना ती अंगणवाडी असते, मुले मोठी होतात तेव्हा ती मार्गदर्शक होते आणि मुले नोकरीला लागली की ती घर सांभाळणारी आधारस्तंभ बनते. मुलांची लग्ने झाली तरी आईची काळजी संपत नाही. उलट, आता तिला नातवंडांची जबाबदारी पेलवायची असते. वयाची सत्तरी गाठली तरी, बाळा, डबा घेतलास का? किंवा रात्री यायला उशीर का झाला? हे विचारणारी आई कधीच थकलेली दिसत नाही.
शरीर थकलं तरी आईचं मन कधीच निवृत्त होत नाही. मुलांच्या आयुष्यातील संकटे असोत किंवा आनंद, ती त्यात स्वतःला पूर्णपणे झोकून देते. स्वतःच्या दुखर्या गुडघ्यांकडे दुर्लक्ष करून ती नातवाच्या मागे धावते, कारण तिला तिच्या कर्तव्यातून रिटायरमेंट नको असते, तर आपल्या माणसांच्या सुखात गुंतवणूक करायची असते. शेवटी एवढंच.
देव दिसत नाही म्हणतात, पण आईच्या रूपात देव रोज आपल्या घरात वावरत असतो. म्हणूनच आईला जपा… कारण तिच्यासाठी प्रत्येक दिवस हा ‘मदर्स डे’ असतो.
Her love, her duty, and our world