नाशिक

संततधार पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत

नाशिक : प्रतिनिधी
गेल्या तीन दिवसांपासून नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीला हंगामातील दुसरा पूर बुधवारी (दि.23) आला असून, शहरातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत
झाले आहे.
गंगापूर धरणातून वाढीव पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. रामकुंड, गोदाघाट परिसरातील अनेक लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली असून, पुराचे मापक मानल्या जाणार्‍या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले आहे. नदीकाठच्या नागरिकांना, व्यावसायिकांना व भाविकांना सतर्कतेचा इशारा देत प्रशासनाने सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवल्या आहेत.
मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून, बुधवारी दिवसभर आणि गुरुवारीही संततधार कायम राहिली. गेल्या 48 तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. अनेक सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.
गोदाघाट परिसरात पूरस्थिती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. रामकुंड परिसर, घाटावरील अनेक लहान-मोठी मंदिरे, पायर्‍या आणि नदीकाठचा भाग पाण्याखाली गेला आहे. नदीपात्रातील पाण्याचा वेग वाढल्याने सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस, महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आले असून, नागरिकांना नदीकाठी जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सततच्या पावसाचा सर्वाधिक फटका शहरातील वाहतुकीला बसला. सिंहस्थाच्या विविध विकासकामांमुळे अनेक प्रमुख रस्त्यांवर गाळयुक्त चिखल साचल्याने वाहनचालकांची मोठी तारांबळ उडाली. द्वारका, मुंबई नाका, निमाणी, सीबीएस, शरणपूर रोड, गंगापूर रोड तसेच इतर प्रमुख मार्गांवर खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली. अनेक ठिकाणी वाहतूक संथ झाल्याने लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आणि वाहतूक कोंडी निर्माण झाली.
पावसामुळे नोकरदार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. सार्वजनिक वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला. अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनांचा वेग मंदावला, तर काही ठिकाणी दुचाकी घसरून किरकोळ अपघात घडल्याच्या घटना समोर आल्या.
शहर व उपनगरांमध्ये झाडे कोसळण्याच्या वाहनधारक घसरल्याने अपघाताच्या घटनाही घडल्या.
गोदाकाठावरील व्यापारी आणि व्यावसायिकांनी वाढत्या पाणीपातळीचा अंदाज घेत दुकाने व स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलविले असून, वाढत्या विसर्गामुळे नदीकाठच्या काही भागात पाणी शिरण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने गोदाकाठावरील सराफ बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात उतरू नये आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, आवश्यक त्या उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला असून, पुढील काही तासही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
संततधारेमुळे गंगापूर धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढून धरण सुमारे 97 टक्के भरले आहे. परिणामी, धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. या वाढीव विसर्गामुळे गोदावरी नदीला हंगामातील दुसरा पूर आला असून, नदीपात्रातील पाणी वेगाने वाढत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

शालेय व्हॅन खड्ड्यात
नवीन नाशिक सह्याद्रीनगर येथील दुपारच्या वेळी शाळेची व्हॅन रस्त्यातील खड्ड्यात अडकली होती. खोदकामावर बंदी असतानाही केलेल्या खोदकामामुळे खड्डे तयार झाले होते. या खड्ड्यांंमध्ये पाणी साचल्याने खड्डा असल्याचे स्कूल व्हॅनचालकाला समजले नाही. परिणामी, व्हॅन खड्ड्यात अडकली होती. या घटनेने व्हॅनचे नुकसान झाले. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडथळा निर्माण झाला.

Incessant rain disrupts normal life in the city.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

20 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

20 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

20 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

20 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

20 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

21 hours ago