फिक्कीच्या मंचावरून पंतप्रधान मोदींचे उद्योगजगताला आवाहन
नवी दिल्ली : प्रतिनिधी
पुढील 20 वर्षांत उद्योगजगताने घेतलेल्या प्रत्येक गुंतवणुकीच्या निर्णयाच्या केंद्रस्थानी देशाचे दीर्घकालीन हित असले पाहिजे. ‘इंडिया फर्स्ट’ हाच उद्योगांचा मंत्र असायला हवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे फिक्कीच्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. भारताने आयातीवरील अवलंबित्व कमी करून स्वदेशी उत्पादनाला प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
महात्मा गांधींनी 1930 मध्ये दिलेला स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेचा संदेश शतकपूर्तीच्या उंबरठ्यावरही पुन्हा सांगावा लागत आहे, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले. भारताने केवळ तयार वस्तूंचे उत्पादन करून चालणार नाही, तर त्यासाठी लागणारे सुटे भाग, कच्चा माल आणि महत्त्वाचे घटकही देशातच तयार केले पाहिजेत. भारत ही जगातील सर्वांत वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था असून, यंदा सुमारे सात टक्के आर्थिक वाढ अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. ऑक्टोबरमध्ये वस्तू आणि सेवांची निर्यात सुमारे 50 अब्ज डॉलरवर पोहोचल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
औषधनिर्मिती क्षेत्राचा विशेष उल्लेख करताना मोदी म्हणाले, भारताला ‘जगाची फार्मसी’ म्हटले जाते. मात्र, औषधांसाठी आवश्यक असलेले सक्रिय औषधी घटक (एपीआय), बल्क ड्रग्ज आणि इतर रासायनिक घटकांच्या
आयातीवर आजही अब्जावधी डॉलर खर्च होतात. हे घटक देशातच तयार करण्यासाठी उद्योगांनी पुढाकार घ्यावा. विशेष ल्युमिनियम मिश्रधातू, यंत्रसामग्रीचे सुटे भाग आणि अन्य महत्त्वाच्या उत्पादनांमधील आयात अवलंबित्व कमी करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
कृषी क्षेत्रात उद्योगांनी पुरेशी गुंतवणूक केलेली नसल्याबद्दलही मोदी यांनी नाराजी व्यक्त केली. जागतिक कृषी निर्यातीत भारताचा वाटा अवघा दोन ते अडीच टक्के आहे. कृषी प्रक्रिया, यंत्रसामग्री, आधुनिक तंत्रज्ञान आणि विश्वासार्ह खरेदी व्यवस्था उभारण्यासाठी उद्योगांनी पुढे आले पाहिजे. जागतिक बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन उत्पादन केल्यास निर्यातीच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.
विकसित भारत 2047 चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उद्योगांनी केवळ सरकारी धोरणांवर अवलंबून न राहता पुढील दोन दशकांचा स्वतंत्र आणि स्पष्ट कृती आराखडा तयार करावा, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.
उद्योगांना मोदींचा थेट सवाल!
सरकारने कॉर्पोरेट कर 30 टक्क्यांवरून 22 टक्क्यांवर आणला, 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर करसवलत दिली, उद्योगांसाठी नियमांचे पालन सुलभ केले आणि मुक्त व्यापार करारही केले. मात्र, या सवलतींच्या तुलनेत उद्योगांनी किती नव्या नोकर्या निर्माण केल्या आणि कर्मचार्यांच्या उत्पन्नात किती वाढ केली, असा थेट सवाल मोदी यांनी केला. भारतीय ग्राहकांनाही निर्यातीच्या दर्जाचीच उत्पादने मिळाली पाहिजेत. देशातील 140 कोटी ग्राहकांना गृहीत धरून चालणार नाही, असेही त्यांनी बजावले.
‘India First’ – the mantra for the next 20 years!
आरशासमोर उभं राहणं म्हणजे फक्त चेहरा बघणं नाही, तर स्वतःला समजून घेण्याचा एक खास क्षण…
भारतात कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक पौर्णिमा या कालावधीत घरोघरी तुळशी विवाह लावण्याचा प्रघात आहे.…
1,995 मतांसह ठरले शहराचे पक्षी मानचिन्ह नाशिक : प्रतिनिधी नाशिक शहराचे पक्षी मानचिन्ह निवडण्यासाठी घेण्यात…
स्थायीत सदस्यांचा संताप; मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ : सभापती नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली नागरिकांना…
दिवाळीची हंगामी भाडेवाढ न करताही विभागाच्या उत्पन्नात 1.35 कोटींची वाढ नाशिक : प्रतिनिधी यंदाच्या दिवाळी…