सातपूरमधील चाकूहल्ला, आरोपीला पाच वर्षे कारावास

भांडण सोडविण्यास गेलेल्या चुलतभावाचा चाकूच्या वारात झाला होता मृत्यू

सिडको : प्रतिनिधी
किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत चाकूचा वार लागून चुलतभावाचा मृत्यू झालेल्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला पाच वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार 200 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक 4 चे न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी हा निकाल दिला. सागर तुकाराम शिंगाडे (रा. संतोषीमातानगर, सातपूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना 29 ऑगस्ट 2020 रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास सातपूर येथील सुयोग रबर एंटरप्रायझेस कंपनीसमोरील रस्त्यावर घडली होती.
या प्रकरणातील फिर्यादी किशन राजेंद्र जगताप आणि साक्षीदार राणी घुले व किरण साबळे हे कंपनीसमोरील कट्ट्यावर बसले होते. त्यावेळी आरोपी सागर शिंगाडे हा ब्ल्यूटूथ स्पीकर घेऊन जात असताना साक्षीदारांनी त्याच्याकडे गाणी ऐकण्यासाठी स्पीकर मागितला. त्यावरून आरोपीने वाद घालत शिवीगाळ आणि मारहाण केली. काही वेळाने तो पुन्हा त्याच ठिकाणी आला आणि शिवीगाळ करू लागला. त्याला विरोध केला असता वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी आरोपीने कमरेला खोचलेला चाकू काढून साक्षीदारावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी वार चुकविल्याने त्यांच्या कपाळाला किरकोळ दुखापत झाली. त्यानंतर फिर्यादीने आरोपीचा चाकू पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या उजव्या हाताला आणि कमरेला दुखापत झाली. हा वाद सोडविण्यासाठी आरोपीचा चुलतभाऊ भीमराव शिंगाडे घटनास्थळी आला. त्यावेळी आरोपीने केलेला चाकूचा वार भीमराव यांच्या पोटाच्या डाव्या बाजूला लागला. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सुखदेव जी. काळे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
न्यायालयाने साक्षीदार, पंच यांच्या साक्षी आणि तपासी अधिकार्‍यांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुरावे विचारात घेऊन आरोपीला पाच वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड, तर कलम 324 अन्वये तीन महिने सश्रम कारावास आणि 200 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सुलभा सांगळे यांनी कामकाज पाहिले. अभियोग कक्षाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, पैरवी अंमलदार मोनिका खरे आणि कोर्ट अंमलदार सहायक पोलीस उपनिरीक्षक दिनकर खैरनार यांनी खटल्याच्या कामकाजात पाठपुरावा केला.

Knife attack in Satpur; accused sentenced to five years in prison

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *