वावी पोलिसांचा अनोखा उपक्रम; 327 तरुण मध्यरात्री 12 ते पहाटे 4.30 पर्यंत घालतात गस्त
सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये चोरी आणि घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी वावी पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने ग्रामरक्षक दल सक्रिय केले आहे. वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 33 गावांमधील 327 तरुण पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेत सहभागी झाले आहेत. मध्यरात्री 12 ते पहाटे 4.30 या वेळेत गटागटाने गावातील रस्ते, चौक, वस्त्या आणि प्रवेशद्वारांवर पहारा दिला जात आहे. पोलिसांच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील सुरक्षेला बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त
होत आहे.
तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या काही दिवसांत घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतातील माल, साठवलेला चारा आणि दुभत्या जनावरांच्या चोरीची भीतीही ग्रामस्थांना सतावत आहे. वावी पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र विस्तीर्ण असल्याने प्रत्येक गावात रात्रभर पोलीस गस्त ठेवणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी ग्रामरक्षक दल पुन्हा सक्रिय करण्याचा निर्णय घेतला.
सरपंच आणि पोलीसपाटील यांच्या माध्यमातून गावोगावी बैठका घेऊन तरुणांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निर्व्यसनी तसेच पोलीस आणि सैन्य भरतीची तयारी करणार्या 327 तरुणांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला आहे.
गावातील महत्त्वाचे चौक, वस्त्या आणि प्रवेशद्वारांवर तरुणांचे गट पहारा देत आहेत. अनोळखी व्यक्ती किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास पोलिसांना तत्काळ माहिती देण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. पोलिसांकडून तरुणांना लाठी, शिट्टी आणि टॉर्च उपलब्ध करून देण्यात आले असून, लवकरच त्यांना ओळखपत्रेही दिली जाणार आहेत.
दुष्काळी परिस्थितीत शेतकर्यांकडे असलेला चारा, शेतीमाल आणि पशुधन महत्त्वाचे आहे. रात्रीच्या वेळी होणार्या चोर्यांना प्रतिबंध करण्यासाठी ग्रामरक्षक दलाची गस्त उपयुक्त ठरेल. गावातील तरुणांनी एकत्र येऊन सुरक्षेची जबाबदारी घेतल्याने ग्रामस्थांमध्येही समाधान व्यक्त होत आहे, असे स्थानिक ग्रामस्थ मच्छिंद्र चिने यांनी सांगितले.
पोलीस-जनता समन्वयावर भर
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला एस. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामरक्षक दल कार्यरत करण्यात आले आहे. पोलीस आणि नागरिकांमधील समन्वय वाढविणे, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे आणि चोरीच्या घटनांना प्रतिबंध करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी सांगितले.
गावनिहाय ग्रामरक्षक दलातील तरुणांची संख्या
मिठसागरे 20, फुलेनगर 10, मर्हाळ खुर्द 10, दोडी खुर्द 5, शहा 10, भरतपूर/विघनवाडी 10, मळढोण 10, कोळगावमाळ 10, लक्ष्मणपूर 15, धारगाव 10, गुलापूर 5, घोटेवाडी 10, पिंपरवाडी 4, फत्तेपूर 10, कणकोरी 10, सायाळे 10, चापडगाव 10, दुसंगवाडी 10, वारेगाव 10, चास 12, गोंदे 15, खंबाळे 5, मिरगाव 10, पाथरे खुर्द 10, खोपडी खुर्द 10, कहांडळवाडी 10, दापूर 10, मानोरे 10, रामपूर 6, निर्हाळे 10, पांगरी बुद्रुक 10, पाथरे बुद्रुक 10.
The responsibility for village security rests on the shoulders of the youth; ‘Village Guard Squads’ (Gram Rakshak Dal) are keeping watch across 33 villages!