(भाग 1)
गणेश चतुर्थी आली, आपल्या सर्वांच्या घरी गणपती बाप्पा आला. मागील अनेक वर्षांपासून सार्वजनिक स्वरूपातही आपण गणपतीची स्थापना करत आलो आहोत. आपल्या गल्लीत, चौकात, परिसरात आणि गावात गणरायांना स्थापित करतो, सजवतो, रोज पूजाअर्चा करतो आणि शेवटी अनंत चतुर्दशीला विसर्जित करतो. आपण गणेशाची मूर्ती घरी का आणतो? कधी तुम्ही याचा विचार केला आहे का? दीड, दोन, पाच, दहा दिवस घरात ठेवून ती विसर्जित करतो. त्या एक दंत तुटलेल्या हत्तीच्या डोक्याच्या देवतेला घरी आणण्याचे कारण काय आहे? याचा कधी विचार केला आहे का? कदाचित तुम्ही म्हणाल की, विघ्नहर्त्याला घरी आणल्याने आमचे सर्व विघ्नं दूर होतील, गणपती बाप्पा आमच्यावरील संकटे आणि विघ्नं दूर करतील, अशी आमची भावना आहे. म्हणून आम्ही दरवर्षी बाप्पाला घरी घेऊन येतो, स्थापना करतो, मनोभावे पूजाअर्चा करतो आणि विसर्जित करून भावनिक निरोप देतो. असे आम्ही अनेक वर्षांपासून करतोय म्हणून तर आमच्यावरील विघ्नं टळतात. बरोबर असेल तुमचे म्हणणे… थोडा वेळ मी काय म्हणतोय याचा विचार करा, बघा पटतंय का!
गणपतीला मूर्तीत बंदिस्त करण्याची आवश्यकता का भासावी? तेही इतर देवतांप्रमाणे सरळसरळ हाडामांसाच्या माणसासारखे रूप न देता, हत्तीचे डोके लावलेय, त्यात एक दंत तुटलेला आणि वाहन काय तर मूषक (उंदीर)! मंदिरात बसविण्यासाठी ही असली कुठे मूर्ती असते का? की तुमचेच एक प्रतीक आहे, म्हणून तुम्ही हे तुमचे प्रतीक प्रतिवर्षी घरी घेऊन येत असता? विचार करा! जे मूर्तीत आहे, तेच तुमच्यात आहे; परंतु ते तुम्ही आजवर ओळखू शकले नाही! तुमच्यातील जी चेतना आहे, तीच त्या मूर्तीत असते. प्राणप्रतिष्ठापणा करताना आपणच आपल्यातील चेतना त्या मूर्तीत स्थापित करतो, तेव्हाच त्या मूर्तीला देवत्व प्राप्त होते, नाही का? तुमच्यातील चेतना, तो जिवंतपणा, तुमची आत्मिक शक्ती, तुमचा जोम आणि जोश त्या मूर्तीत प्रवेश करतो. खरंतर ती मूर्ती म्हणजे तुमचेच प्रतीक असते, फक्त तुम्हाला त्याची जाणीव नाही, माहीत नाही आणि ओळखताही येत नाही. जर गणपती बाप्पा ही विद्येची, बुद्धीची, ज्ञानाची देवता आहे आणि तो विघ्नहर्ता आहे, तर त्याला असले अक्राळविक्राळ आणि विचित्र रूप का दिले असेल, याचा कधी विचार केला आहे का? हत्तीचेच डोके का, एक दात तुटलेलाच का आहे, मूषक वाहन का केले असावे? खरंतर हे आपल्यासाठी संकेत आहेत. हे संकेत समजून न घेता आपण, त्या पौराणिक आणि धार्मिक घटना आणि गोष्टींमध्ये अडकून पडतो. देवतांची भाषा ही सांकेतिक भाषा असते, ती समजून घेणे महत्त्वाचे, ज्याला ही भाषा समजली त्याला धर्म समजला. बाकी सगळे कर्मकांड आहे!
धर्माचे संकेत समजले, तर मनुष्याचा उद्धार निश्चित होतो. स्टोरीजमध्ये अडकलो तर धर्माच्या खर्या अर्थाला आणि संदेशाला मुकावे लागते. हळूहळू तो धर्म डोक्यात घुसतो आणि धर्मांधपणाकडे वाटचाल सुरू होते.
आपल्यासाठी देव त्या मूर्तीत असतो. म्हणून तर आपण त्याला देवळात बंदिस्त करतो. विशिष्ट सणांना विशिष्ट देवतांना घरी आणतो, पूजाअर्चा करतो, फुलं, हार वाहतो, सजावट करतो, पूजेची विशिष्ट मांडणी करतो, आरत्या म्हणतो, घंटा वाजवतो, प्रसाद वाहतो, वाटतो आणि प्राशन करतो. काहीतरी गोडधोड करतो, विविध पद्धतीने तो प्रसंग साजरा करतो. आपण सगळं काही करतो; परंतु ती मूर्ती, ती देवता किंवा ते स्वामी महाराज नेमकं काय संकेत देऊ इच्छितात, त्याकडे आपले लक्षच नसते. त्या देवाला काय म्हणायचे आहे, हेच मुळी आपल्याला कळत नाही. गणपती बाप्पाला आपण विघ्नहर्ता मानून आपल्या जीवनातील विघ्नं दूर करेल, या भावनेने घरी घेऊन येतो. गणेश चतुर्थी यासाठी महत्त्वाची नाही की, त्या दिवशी गणपती बाप्पा आपल्या घरात प्रवेश करतात. गणेश चतुर्थी यासाठी महत्त्वाची आहे की, यानिमित्त तुम्हाला तुमच्या
स्वतःच्या अंतर्मनात प्रवेश करण्याची संधी मिळते.
थोड्या वेळेसाठी आपले डोळे बंद करून बघा स्वतःकडे,
स्वतःच्या जीवनाकडे. कितीतरी विघ्नं असतील तुमच्या जीवनात; परंतु खरं सांगू का? या सर्व विघ्नांपैकी एकही विघ्न तुमच्या बाहेरचे नाहीये. सर्वच्या सर्व विघ्नं तुमच्याच अंतर्मनातून उत्पन्न झालेले आहेत, काहीही बाहेरून आलेले नाही.
सर्व विघ्नांचे मूळ तुमच्यातील एखाद्या गोष्टींबद्दल असलेली भीती (भय), एखाद्याबद्दल असलेला क्रोध (राग), स्वतःबद्दल असलेला अहंकार, काही गोष्टींबाबतची लालच, मनाला लागून राहिलेली चिंता, इतरांबद्दलची टीका, तक्रार, ईर्षा आणि बरोबरी, भविष्याची विनाकारण चिंता, भूतकाळाचे ओझे, ‘लोक काय म्हणतील?‘ याची चिंता, अपयशाची भीती (चिंता), टीकात्मक आणि निंदक वृत्ती… आणि सर्वांत महत्त्वाचे आणि अतिभयानक कारण…
स्वतःला ओळखण्यात अपयशी असणे. बघा, विचार करा… तुमच्या जीवनात असलेले विघ्न यापैकी एक किंवा अधिक कारणांमुळे उत्पन्न झालेले आहे. तुम्ही माझ्या मताशी सहमत नसालही कदाचित. त्याने तुमच्या जीवनातील विघ्नं मिटणार नाही; परंतु मी सांगतोय त्याला कुठेतरी सत्य मानून विचार केला तर तुम्हाला विघ्नातून मुक्त होण्याचा मार्ग दिसण्याची शक्यता निर्माण होईल.
विघ्न काय आहेत, हे माहीत करून त्याविरुद्ध लढून किंवा संघर्ष करून विघ्नं दूर करण्यात शहाणपणा नाहीये. त्यापेक्षा विघ्न आणि त्याचे कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे. गणपती बाप्पा ज्ञानाचे आणि विद्वत्तेचे प्रतीक आहे. तेही तेच सांगण्याचा प्रयत्न करताय. विघ्नांवर विचार करा, त्याचे निदान करा आणि योग्य तो मार्ग काढा.
बाप्पा सांगताय की माझ्याप्रमाणे आपली बुद्धी, विवेक, ज्ञान आणि विद्वत्तेचा वापर करा आणि आपल्या जीवनातील विघ्नं दूर करा, त्याचे समूळ उच्चाटन करा. बाप्पा हेही सांगताय की, मी समृद्धी, यश, संपत्तीचेही प्रतीक आहे. त्यामुळे तुम्हीही यशस्वी होण्यासाठी कार्य करा, समृद्धी आपोआपच आपल्या पायाशी लोळण घेईल. आणि विसरू नका, नवीन कार्याच्या सुरवातीला गणपतीचीच पूजा केली जाते, याचा अर्थ की जीवनात काहीतरी नवीन, वेगळे, कल्पक आणि हटके कार्य करा, माझे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असतील, असे बाप्पा आपल्याला कायमच सांगत असतात. फक्त आपल्याला त्यांचे म्हणणे ऐकू येत नाही. बघा ना, संकटकाळी किंवा अडचणीच्या काळात आपण वेगळे काही करण्याचे तर सोडाच, साधा विचारसुद्धा करतो का? कसा तो विघ्नहर्ता तुम्हाला अडचणीतून बाहेर काढेल, नाही का?
अडचणीतून किंवा कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचे प्रयत्न सोडून आपण काय काय करत असतो बघा? आपण त्याचेच भांडवल करतो. माझ्यावरील संकट, विघ्न किती मोठे आहे याची गिणती करत बसतो. तुमचा झालेला अपमान, तुमच्याबद्दल कुणी काही बोलले, दुसर्याचे झालेले भले, दुसर्याचे यश, कुणी तुम्हाला सोडून गेले, कुणी तुमचे नुकसान केले, कमीपणा दाखवला, तुमचे मन दुखावले असेल… अशा घटनांच्या स्टोरीज तयार करता. तुम्ही कसे पीडित आहात, हेच सिद्ध करण्यात धन्यता मानता. स्वतःला पीडित सिद्ध केल्याने तुमच्या हातात काही करण्याची शक्यता उरते का… सांगा बरं? याउलट हे समजून घ्या की, असे काही करणे, हेच तर खरे विघ्न असतात.
विरोधाभास असा आहे की, आपण असे आपल्या बाहेरून येणार्या गोष्टींना विघ्न समजून त्याविरुद्ध लढत बसतो. खरे विघ्न आपल्या बाहेर नसून आपल्या आतच असतात, हे समजून घ्या! प्रॉब्लेम हा नाही की, असले विघ्न का येतात. प्रॉब्लेम हा आहे की छोट्या छोट्या गोष्टींना आपण अति महत्त्व देऊन हे जणू हे दुःखाचे डोंगर आहेत, असे चित्र आपणच उभे करतो. जितकं अधिक महत्त्व एखाद्या गोष्टीला द्याल, तितकी अधिक भव्य ती गोष्ट तुम्हाला जाणवेल. महत्त्व दिल्याने त्याला तुम्ही ताकद देता. तर आता गणपती बाप्पाकडून आपल्याला काय शिकायचे आहे किंबहुना बाप्पा आपल्याला काय शिकवण्यासाठी आले आहे, हे पुढील लेखात जाणून घेऊया. तोपर्यंत हा लेख आवडला असेल तर पुढे पाठवा.
(क्रमशः)
Let’s have a chat about Ganpati Bappa!
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…