लोकहितवादी मंडळाचा अमृतमहोत्सवी सोहळा

– मुकुंद बाविस्कर
नाशिकची सांस्कृतिक आणि कलात्मक चळवळ ही नेहमीच संतांच्या विचारांनी, साहित्यिक ठेव्याने आणि शास्त्रीय कलांच्या साधनेने समृद्ध राहिली आहे. या समृद्ध वारशाला अधिक दीपमान करणार्‍या नाशिकच्या काही महत्त्वपूर्ण सांस्कृतिक घडामोडी, संस्था आणि व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा गौरव करणे, हे प्रत्येक नाशिककरांचे कर्तव्यच आहे. हे कार्य लोकहितवादी मंडळाने केले, ही निश्चितच गौरवाची बाब म्हणावी लागेल.
कविवर्य कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या प्रेरणेने दि. 25 जून 1950 रोजी स्थापन झालेल्या ‘लोकहितवादी मंडळ, नाशिक’ या प्रतिष्ठित संस्थेने नुकतेच आपले अमृतमहोत्सवी वर्ष पूर्ण केले आहे. यानिमित्ताने नाशिकच्या परशुराम साईखेडकर नाट्यगृहात एका पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या गुणवंतांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल कुसुम बुरकुले यांना सन्मानित करण्यात आले. शिक्षण क्षेत्रासाठी हेमलता बीडकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्कृत भाषा संवर्धन आणि ज्येष्ठ नागरिक सेवाकार्यासाठी सरिता देशमुख (मरणोत्तर) व रमेश देशमुख या आदर्श दाम्पत्याला संयुक्तपणे गौरविण्यात आले. शास्त्रीय संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल गुरू पं. शंकरराव वैरागकर यांना सन्मानित करण्यात आले. कथक नृत्यातील योगदानाबद्दल गुरू रेखा नाडगौडा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या मंडळाचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, कार्याध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील व पदाधिकार्‍यांच्या परिश्रमातून हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. मात्र, नाशिकच्या संस्कृतीचा हा वारसा पुढे नेण्यासाठी अशा संस्थांना आणि व्यक्तींना महापालिका, तसेच दानशूर व्यक्तींच्या मदतीची नितांत गरज आहे जेणेकरून नाशिकची सांस्कृतिक चळवळ अधिक जोमाने पुढे जाऊ शकेल.
कीर्ती कलामंदिर संस्थेचा
सुवर्णमय प्रवास :
नाशिकच्या कलाविश्वात गुरू रेखा नाडगौडा आणि त्यांनी स्थापन केलेल्या कीर्ती कलामंदिर या संस्थेचे कार्य सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे आहे. कलेची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना वयाच्या दहाव्या वर्षी नृत्यप्रवास सुरू करणार्‍या रेखाताईंनी मुंबईत जाऊन पंडित गोपीकृष्ण आणि पंडिता शमा भाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कलेला समृद्ध केले. दि. 23 फेब्रुवारी 1976 रोजी स्थापन झालेल्या या संस्थेने पन्नास वर्षांची देदीप्यमान वाटचाल पूर्ण केली आहे. आज या संस्थेचा विस्तार लंडन आणि यूएसएपर्यंत पोहोचला असून, त्यांची कन्या गुरू अदिती पानसे हा वारसा पुढे नेत आहेत.

सर्जनशील निर्मिती व ऐतिहासिक विक्रम :

सुवर्णरेखा, रुद्र, भस्मासुर मोहिनी, रसयात्रा यांसारख्या अनेक बॅले आणि नृत्यनाटिका त्यांनी सादर केल्या. 1984 मध्ये सलग 16 हाउसफुल प्रयोग झालेले रामायण नृत्यनाट्य असो वा कुसुमाग्रजांच्या कवितांवर आधारित रसयात्रेची हॅटट्रिक या सर्व गोष्टींनी नाशिकचा मान जागतिक पातळीवर उंचावला आहे. आजच्या काळात ग्लॅमर आणि पैशाच्या मागे धावताना कलेतील खरी साधना मागे पडत चालली आहे, अशी मार्मिक खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

संगीताचे चालतेबोलते विद्यापीठ- पं. शंकरराव वैरागकर :

शहरातील झगमगाट बाजूला सारून खेडोपाड्यांत संगीताचा यज्ञ तेवणारे पंडित शंकरराव वैरागकर खर्‍या अर्थाने संगीताचे ऋषी आहेत. साधारण 1980-81 च्या सुमारास त्यांनी गावागावांत भटकंती करून गरीब, शेतकरी कुटुंबातील मुलांना सोप्या लिपीत अभंग, गौळणी आणि भजनांच्या माध्यमातून रागांची ओळख करून दिली. ख्याल गायन, ठुमरीसोबतच वारकरी संतांचे अभंग आणि गवळणी शास्त्रीय ढंगात गाण्यासाठी ते विशेष प्रसिद्ध आहेत. रूप पाहता लोचनी व सुंदर ते ध्यान ही त्यांनी गायलेली भजने लोकांच्या मनात घर करून आहेत.
संस्थात्मक कार्य ः गेल्या 35 वर्षांहून अधिक काळ चालणारा गुरुवंदना हा उपक्रम असो किंवा गुरुवर्य पं. शंकरराव वैरागकर संगीत सेवा मंडळ व स्वर-सुधा राज्यस्तरीय संगीत स्पर्धा, त्यांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना संगीताचे धडे मिळाले आहेत.

संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी जीवन समर्पित करणारे आदर्श देशमुख दाम्पत्य :
नाशिकच्या शैक्षणिक वर्तुळात संस्कृत भाषेचा सुगंध दरवळत ठेवण्यात पेठे विद्यालयाचे माजी प्राचार्य रमेश देशमुख आणि स्व. सरिता देशमुख या दाम्पत्याचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. संस्कृत भाषा सभा : या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व स्पर्धा, पाठांतर स्पर्धा आणि शिबिरांच्या माध्यमातून संस्कृतची गोडी निर्माण केली. दिवंगत सरिता देशमुख यांनी मराठी-संस्कृत शब्दकोश, रामनगरी ते अलकानगरी-मेघदूत परिचय हे पुस्तक आणि भगवदगीतेच्या श्लोकांच्या ऑडिओ कॅसेटची निर्मिती करून संस्कृत अभ्यासकांंचे मार्ग सुकर केले. दि. 16 सप्टेंबर 2026 रोजी त्यांच्या निधनाने संस्कृत संवर्धन चळवळीची कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
डांंग सेवा मंडळ- आदिवासींच्या उत्थानाचे दीपस्तंभ :
राज्यातील दुर्गम भागातील वंचितांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पोहोचवणारी डांग सेवा मंडळ ही एक ऐतिहासिक संस्था आहे. थोर स्वातंत्र्यसेनानी आणि गांधीवादी विचारसरणीचे कर्मवीर दादासाहेब बीडकर यांनी 23 जून 1937 रोजी मुल्हेर (ता. कळवण, जि. नाशिक) येथे या संस्थेची स्थापना केली. अंधश्रद्धा निर्मूलन, आरोग्य, व्यसनमुक्ती, जंगल कामगार सोसायट्या आणि शेतकर्‍यांसाठी धान्यकोठार (ग्रेन बँक) यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे अहोरात्र कार्य या संस्थेने केले आहे. तिसर्‍या पिढीचे नेतृत्व : कर्मवीर दादासाहेबांनंतर स्व. डॉ. विजय बीडकर, विद्यमान अध्यक्षा हेमलता बीडकर आणि सचिव अ‍ॅड. मृणाल जोशी ही तिसरी पिढी या विचारांची पताका डिजिटल वर्ग व ई-लर्निंगच्या माध्यमातून अत्यंत यशस्वीपणे पुढे नेत आहे.

Lokhitwadi Mandal’s Amrit Mahotsav Celebration

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *