नाशिक ः प्रतिनिधी
साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्यासाठी बाजारपेठा सजल्या आहेत.मुहूर्तावर नवीन वस्तु घेण्याकडे नागरिकांचा मोठा कल असतो. त्यामुळे नवीन वस्तु खरेदीस प्राधान्य दिले जाते. गुढीपाडव्यालाच मराठी नववर्षाची सुरूवात होत असल्याने दारात गुढी उभारून मंगल तोरणे लावून मराठी नववर्षाचे स्वागतही केले जात असल्याने बाजारात गुढीपाडव्यासाठी छोट्या आकाराच्या गुढ्या दाखल झाल्या आहेत.
शहरातील शॉपिंग मॉल्स्, दुकाने,सराफी पेढ्या पाडव्यासाठी सज्ज झाल्या आहेत. अनेक बांधकाम साईटस्गृह,शॉप्स्,फ्लॅटस आदींवर अनेक आकर्षक ऑफर्स गुढीपाडव्याच्या निमित्ताने देण्यात आल्या आहेत.
महागाईने कळस गाठला असला तरी हौसेला मोल नाही या उक्तीप्रमाणे आणि आपल्या ऐपतीप्रमाणे नवीन वस्तु,फर्निचर ,इलेक्ट्रॉनिक्स,सोने, दुचाकी,चारचाकी वाहने, गृहखरेदी,मोबाइल,स्वयंपाकघरातील उपकरणे आदीं खरेदी केली जाते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कॅशबॅक,एकावर एक फ्री आदी ऑफर्समुळे ग्राहकांना निवडीला वाव मिळत आहे.
इलेक्ट्रॉनिक्स्मध्ये वॉशिंग मशीन,फ्रीज,लॅपटॉप,मोबाइल,एलइडी टि.व्ही.आदींवर ङ्गायनान्स उपलब्ध असल्याने ग्राहकांनाही सोयीचे ठरत असल्याने मुहुर्तावर खरेदी केली जाणार असल्याचे दुकांनदारांनी सांगितले.
मुहुर्तावर दुचाकी,चारचाकी वाहने घेण्याकडेही कल असल्याने यंदा सीएनजी,किंवा इलेक्ट्रॉनिक्स दुचाकी आणि चारचाकी वाहनांची चौकशी केली जात आहे.तर काहींनी आगाऊ नोंदणी करून गुढीपाडव्याला घरी आणण्यास पसंती दिली आहे.
सोन्यानेही उच्चांकी दर गाठल्याने केवळ मुहुर्तासाठी,लग्नसराईसाठी गरजेचे दागिने घेण्यास प्राधान्य दिल्याचे ग्राहकांनी सांगितले.सोन्याच्या दराने पन्नास हजारांचा टप्पा पार केल्यामुळे खरेदीवर परिणाम दिसून येत आहे. भाव कमी होण्याची प्रतीक्षा ग्राहकांना आहे.
गेल्या दोन वर्षात कोरोना संकटामुळे सर्वत्र क्षेत्रात मंदी आली होती. कोरोना संपुंष्टात आला असल्याने निर्बध शिथिल करण्यात आले आहे. परिणामी बाजारात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे.एकीकडे रशिया युक्रेन युद्धामुळे इंधन दरात वाढ झाल्याने सर्वच गोष्टींवर परिणाम होत आहे. बांधकाम साहित्य महागल्याने घरांच्या किमतीतही वाढ झाली आहे. युद्धामुळे बांधकाम साहित्य दरात वाढ होत असल्याने घरांच्या किमतीतही वाढ होत असल्याने अनेकांनी घराच्या स्वप्नांसाठी काही काळासाठी मुरड घातल्याचे बोलले जात आहे. अनेकांनी जीएसटी,ऍमिनिटीज,पझेशन,हप्त्यात सूट आदी ऑङ्गर्स देवून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.