नाना काय रे हे!

आमचा नाना गेला, हा हा म्हणता मराठी, हिंदी करमणूक क्षेत्रावर आपला प्रभाव सोडून नाना गेला. जीवनात फार कमी लोक असे असतात की, जे मोठे असूनही लोकांना त्यांच्याविषयी एक नैसर्गिक आपलेपणा जाणवतो. सगळ्यांना म्हणजे अगदी सगळ्यांना नाना त्यांच्यातील एक होता. तो रागीट होता, तो खडूस होता मात्र तो प्रेमळ होता. त्याचे सर्वच गोष्टींवर प्रेम होते.
अगदी रंगावर, रेषांवर, कथांवर, कथेच्या मांडणीवर, दिसण्यावर, असण्यावर, व्यक्त होण्यावर, मौनावर, माणसांवर, माणसांच्या व्यथांवर, त्यांच्यासाठी काम करणार्‍या लोकांवर, ढोंगाच्या विरोधातील लोकांवर, कलाकारांवर, तंत्रज्ञांवर, यंत्रांवर, प्रत्येक माणसांवर, फुलांवर, झाडांवर, खाण्यावर या जगातील प्रत्येक गोष्टीवर नानाचे प्रेम होते. त्याचे जे काही वाद खरोखर झाले असतील तर ते केवळ या प्रेमाच्या आड येणार्‍यांबरोबरच झाले असतील.
नाना पाटेवर कलाकार म्हणून किती मोठा होता हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. तो माणूस म्हणूनही तितकाच मोठा होता. नाना प्रचंड संवेदनशील होता. ही संवेदना त्याच्या प्रत्येक गोष्टीतून दिसून यायची. त्याला व्यक्त होणे आवडत होते. त्याचप्रमाणे लोकांचेही व्यक्त होणे त्याला भावत होते. आपल्याला जीवनात किती भौतिक गोष्टींची गरज आहे, याची सीमारेषा नानाने स्वतःहून आखून घेतली होती. त्याच्याकडे असलेले पैसे हे इतरांची देणी आहेत असा तो वापरायचा. त्यातूनच मग आनंदवन असो की नाम, त्याने समाजासाठी काम केले. नानाला अवतीभवती सुरू असलेल्या प्रत्येक गोष्टीवर मत असे. ते बेधडक मांडताना त्याने कोणाचीही कधीही भिडभाड ठेवली नाही. नाना कधी कोणाचा अपमान करत नसे. अर्थात, त्याच्यासमोर अनेक जण आपोआपच खुजे दिसत असत. आपल्या सहकलाकारांवर कोणत्याही निमित्ताने आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींवर त्याचा हा प्रेमाचा वर्षाव सुरू असे. इतका प्रेमळ असूनही नानाची इमेज खडूसपणाची होती. त्याचे कदाचित त्या इमेजवरही प्रेम असेल. तो खडूस वाटायचा कारण तो खरा होता. त्याला खोटंखोटं काही करताच येत नव्हतं. नाना माणसांमध्ये केवळ रमणारा नव्हता. त्यांचा विचार करणारा होता.
नानाने नाम फाउंडेशन सुरू केले. यापुरतेच त्याचे काम मर्यादित नसेल. हे तर आपल्या सगळ्यांना माहीत असलेले काम आहे. त्याव्यतिरिक्त कितीतरी माणसांना त्याने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत केली आहे. ही संवेदना त्याच्या प्रत्येक भूमिकेतून दिसून येत असे. कोणतीही भूमिका असो त्याच्यासाठी जी काही मेहनत घ्यायची आहे, त्यासाठी तो ती घेत असे. ती कधी कधी एखाद्या नव्या मुलाच्या उत्साहानेही असे.
गेल्याच वर्षी वनवास या चित्रपटाच्या निमित्ताने नानाबरोबर प्रदीर्घ चर्चा झाली. नाना बोलत होता. भरभरून केवळ आपल्याच चित्रपटाच्या प्रसिद्धीपुरते नव्हे तर माणूस म्हणून त्याच्या अनुभवांविषयी, सभोवतालच्या परिस्थितीविषयी, इतरांच्या संवेदनांविषयी. निसर्गाकडे ज्या बेपर्वाईने आपण सर्व पाहत आहोत त्याविषयी नानाचा तीव्र आक्षेप होता. माणूस म्हणून आपल्या सभोवतालचे आपण रक्षण केले पाहिजे, असा त्याचा आग्रह होता. त्या आधी देऊळ चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्याशी भेटलो होतो. तेव्हाही श्रद्धा आणि माणुसकी या विषयांवरचे त्याचे विचार अंतर्मुख करणारे होते. नटसम्राट करताना नानाने तो अगदी आपली जीवनातील पहिलीच भूमिका आहे अशा पद्धतीने केली होती. त्यातील प्रत्येक बारकावा आपल्यामध्ये यावा, यासाठी कष्ट घेतले होते. नाटकाच्या जवळची ही भूमिका साकारताना चित्रपट या माध्यमाचे त्याने जपलेले भान हे केवळ नानाच करू शकतो. नाना ठराविक अंतराने भेटत गेला. त्याला मी लक्षात होतो की नाही, तो आपल्याला नावाने ओळखतो की नाही, याचा विचार करण्याचा तो वावच देत नसे. बरं हे तो केवळ आपल्या बरोबरच करतोय असेही नाही, तो सगळ्यांनाच एक जवळचा मित्र असल्याची भावना देत होता. पत्रकार म्हणून गंभीरपणे विचार मांडत असतानाच आमची फिरकी घेतानाही नानाने कधी कृत्रिमपणा केला नाही. तो आहे तसा भेटत गेला. जे जे बोलायचे आहे ते बोलत गेला. एकदा अबतक छपन्न पाहताना त्याच्या एका निःशब्द सीनबद्दल त्याला फोन केला.
त्याने तो तेव्हा उचलला नाही. त्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी त्याने फोन केला. त्यानंतर जवळ जवळ अर्धा तास बोलत होता. त्याच्याकडे माहितीचा खजिना होता. त्याच्या एक एक क्लिप सकाळपासून पाहतोय प्रत्येकाशी वेगवेगळे आणि तितकेच अर्थपूर्ण बोलण्याची त्याची प्रज्ञा होती. नानाबद्दल कितीही लिहिलं तरी ते साधारणतः टिटवीच्या चोचीत मावलेल्या समुद्रासारखे आहे. तो तितका नाही. नाना मला पत्रकार म्हणून जितके वेळा भेटला तेव्हा तेव्हा तो आपलासा वाटलाच. त्याबरोबरच महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना एका कार्यक्रमाला त्याला निमंत्रित करण्यासाठी त्याच्या पुरुष नाटकाला गेलो होतो. मध्यंतरात त्याला भेटलो तेव्हा त्याने आपलेपणाने हात हातात घेतला आणि थोपटत म्हणाला की, अरे मी त्या दिवशी नाही रे.
तुम्हीच चांगला कार्यक्रम करा. तो हात नंतर त्याने अनेक वेळा हातात घेतला. आता हातात हात घेणारा तो हात निघून गेला आहे. नानाशिवायचे यापुढचे आयुष्य शब्दशः रिकाम्या हाताने
जगायचे आहे.

Nana, what is this!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *