– जगन घाणेकर
स्त्रीसन्मानाचा आणि उदारतेचा संदेश देणारी
वसुबारस आणि धनत्रयोदशी हे दिवाळीतीलच सण असले, तरी खरी दिवाळी सुक्षीं होते ती नरक चतुर्दशीपासून. या दिवशी बहुतांश घरांत बच्चेकंपनीसह वयोवृद्ध आजी-आजोबाही पहाटे लवकर उठून अंगाला सुगंधी तेल आणि सात्त्विक उटणे लावतात. शीतोष्ण पाण्याने अभ्यंगस्नान करतात आणि स्नानानंतर ओल्या अंगाने डाव्या पायाच्या अंगठ्याखाली नरकासुराचे प्रतीक म्हणून कारेटे ठेवून ते फोडतात. त्यातून निघणार्या बियांपैकी एक बी कपाळाला लावतात आणि रक्ताचे प्रतीक असलेला त्यातील कडू रस थोडा जिभेला लावतात. श्रीमद्भागवतपुराणातील कथेनुसार पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता. देव आणि मानव यांना तो प्रचंड त्रास देत असे. तो स्त्रियांचाही छळ करत असे. त्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले आणि कुणाकडूनही वध होणार नाही- असा वर मागून घेतला होता. त्या वराच्या बळावर त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या आणि त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले होते. नरकासुराने अश्या एकूण 16,100 स्त्रियांना पळवून नेले आणि मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले होते. त्याने राजांची संपत्ती लुटली होती हव्यासापोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले आणि वरुणाचे विशाल छत्रही बळकावले होते. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व आणि मानवांना तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. त्याच्या या बलपूर्वक छळाने समस्त देवता आणि राजे-महाराजे त्रस्त झाले होते. त्याच्या जाचातून मुक्त होण्यासाठी सर्वांनी मिळून श्रीकृष्णाचा धावा केला. नरकासुराला जन्माची अद्दल घडवण्यासाठी श्रीकृष्णाने सत्यभामेसह नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व उपवर राजकन्यांना मुक्त केले. त्या काळात शत्रूच्या कैदेत राहिलेल्या स्त्रियांना समाज किंवा त्यांचे स्वतःचे कुटुंब देखील परत स्वीकारत नसे. त्या स्त्रियांनी श्रीकृष्णाकडे आपलं रक्षण करण्याची आणि त्यांना सन्मान देण्याची विनंती केली. श्रीकृष्णाने तात्काळ त्यांच्याशी विवाह करून त्यांना ’राजराणी’चा दर्जा दिला. त्यांनी समाजासमोर घोषणा केली की या सर्व स्त्रिया आता ’कृष्णपत्नी’ म्हणून ओळखल्या जातील, जेणेकरून कोणाचीही त्यांच्यावर बोट दाखवण्याची हिंमत होणार नाही. 16,100 स्त्रियांशी झालेला हा विवाह कोणताही विलासी विवाह नसून एक अवतारी पुरुषाने स्त्रीच्या सन्मानासाठी आणि प्रतिष्ठेसाठी उचललेले क्रांतिकारी पाऊल होते. नरकासुराच्या बंदिवासातून मुक्त करून आणि त्यांच्याशी विवाह करून श्रीकृष्णाने केवळ 16,100 स्त्रियांचाच उद्धार केला नाही, तर तत्कालीन अनिष्ट बाबींविरुद्ध बंड पुकारून स्त्रीसन्मानाचे मूर्तिमंत उदाहरण जगासमोर ठेवले आहे. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले. उन्मत्त आणि भोगविलासी नरकासुराला इच्छित वर देऊन आणि नरकासुराच्या नावाला अमरत्व देऊन श्रीकृष्णाने आपली उदारता दर्शवली आहे. या दिवशी सकाळी अभ्यंगस्नानानंतर अपमृत्यू निवारणार्थ यमतर्पण केले जाते. तर्पणाचा विधी पंचांगात दिलेला असतो त्याप्रमाणे करावा. या दिवशी काही जण ब्राह्मणभोजन घालतात, तसेच या दिवशी वस्त्रदानही केले जाते. या दिवशी प्रदोषपूजा आणि शिवपूजाही केली जाते. उन्मत्त झालेल्या नरकासुराला श्रीकृष्णाने ठार करून देवतांसह प्रजाजनांना भयमुक्त केले. असे असताना गोव्यासारख्या काही ठिकाणी दिवाळीनिमित्त भगवान श्रीकृष्णाचे पूजन करण्याऐवजी नरकासुर वधाची स्पर्धा आयोजित केले जाते. त्यामध्ये तेथील मंडळे, संस्था, संघटना मोठ्या प्रमाणात भाग घेतात. या स्पर्धेसाठी प्रत्येक मंडळ नरकासुराचा भव्य पुतळा बनवतात. त्याची मिरवणूक काढली जाते. नागरिकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जरी या स्पर्धेचे आयोजन केले जात असले, तरी या माध्यमातून दुराचारी नरकासुराचे उदात्तीकरण करत आहोत हे नागरिकांच्या केव्हा लक्षात येणार? कोकणपट्टीचा भाग असलेले गोवा पूर्वीपासून शेतीप्रधान राज्य होते. कोकणात प्रामुख्याने भाताची शेती केली जाते. या दिवसांत शेतातून भाताचे पीक काढल्यावर उरलेल्या तणापासून पूर्वी नरकासुराचा पुतळा बनवला जाई आणि त्याचे दहन केले जात असे. ही प्रथा पुढे व्यापक होऊन आजमितीला सहस्रो रुपये व्यय करून नरकासुराचे पुतळे बनवले जातात. गोव्यातील नरकासुर स्पर्धेचे लोण हळूहळू सिंधुदुर्गातही येत चालले आहे. ज्यामुळे या सणामागील मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. असुरी प्रवृत्तीला खतपाणी घालणार्या या
स्पर्धेला खरेतर नागरिकांनीच विरोध करायला हवा.
Naraka Chaturdashi
- सुप्रिया सुरवाडे सध्याचा घडीला माणसाला काय हवं आहे माहिती...? या शुष्क होत जाणार्या जगात...कोरड्या…
- आनंदा जाधव एरवी दीपावलीत पंधरा दिवस अगोदर गजबणार्या बाजारपेठेत यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे वसुबारसपासून गर्दीचा…
- गोरख काळे कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राज्यात ऐन दिवाळीत राजकीय फटाक्यांची जोरदार आतषबाजी…
- सचिन अहिरराव मैदानावर चेंडू पायाशी आला की, प्रतिस्पर्ध्यांच्या काळजाचा ठोका चुकायचा... वेगवान धाव, चपळ…
पतीच्या मेंदूमृत्यूनंतर पत्नीचा अवयवदानाचा हृदयस्पर्शी निर्णय नाशिक : प्रतिनिधी दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा आणि नव्या…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक शहरात दिवाळीच्या दरम्यान थंडीची चाहूल नागरिकांना जाणवू लागली आहे. शनिवारी (दि.7)…