संपादकीय

‘जय हनुमान’च्या गजराने दुमदुमली नाशिकनगरी

’जय हनुमान ज्ञान गुन सागर’, तसेच भीमरूपी महारूद्रा, अशा स्तोत्रपठणांसह मारुतीरायांचा जयजयकार करीत नाशिकमधील लाखो भाविकांनी हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित उत्सवात सहभाग घेतला. यानिमित्ताने विविध मठ-मंदिरे-आखाडे व धार्मिक-सांस्कृतिक संस्थांच्या वतीने धार्मिक व सामाजिक उपक्रम झाले. काही भागांत श्री हनुमान पालखी, तर कुठे मिरवणूक अन् कुठे सजीव देखावे सादर करीत या उपक्रमांनी वेगळेपण जपले गेले.
हनुमान जयंती उत्सव हा श्री समर्थ रामदास स्वामी स्थापित गोमय मारुती देवस्थान आगर टाकळी, गोदाकाठावरील दुतोंड्या मारुती, काट्या मारुती, दंडे हनुमान, श्री काळाराम मंदिरातील दास मारुती, पंचमुखी हनुमान आदींसह उपनगरांमधील जुन्या व नवीन मंदिरांतदेखील पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. तपोवनातील बटुक हनुमान मंदिरात महाप्रसादाचे वाटप झाले. उत्सव थाटात पार पडला.
पंचमुखी हनुमान मंदिरात सुरेख आरास करण्यात आली होती. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम झाले. पहाटे पाच वाजता पंचमुखी हनुमान मंदिरात महंत भक्तिचरणदास महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिषेक झाला. यानंतर सकाळी सहाला हनुमान जन्मोत्सव झाला. नंतर हनुमान चालीसा पठण, होमहवन आदी कार्यक्रम आयोजित केले होते. सिडको, इंदिरानगर, सातपूर, नाशिकरोड आदी परिसरातही हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले होते.
नवज्योती मंडळाच्या वतीने कार्यक्रम
नवज्योती महिला मंडळाच्या वतीने बिग तंबोला हा मनोरंजन व स्पर्धात्मक कार्यक्रम झाला. मंडळाच्या सभासद तसेच इतर सर्व महिलांसाठी खुला असलेल्या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंपर बक्षीस मिळविण्याचा मान दीप्ती मेहता यांना मिळाला. म्हसरूळ येथील श्रद्धा ज्येष्ठ नागरिक हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमास नेहा दोशी यांची उपस्थिती होती. स्पर्धात्मक पद्धतीने खेळले गेलेले विविध खेळ, मौजमस्ती करत महिलांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. मंडळाच्या वरिष्ठ संस्थापक सदस्या रंजना दालमिया व माजी अध्यक्षा भावना कासलीवाल, तसेच समिती सदस्यांच्या आयोजनासाठी सहकार्य लाभले. प्रकल्प संयोजक दक्षना औटी यांनी नियोजन केले. मंडळाच्या अध्यक्षा दीपाली दशपुत्रे व सचिव नयना सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.
औद्योगिक कामगार नाट्य स्पर्धा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित सोळाव्या औद्योगिक व व्यावसायिक कामगार राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेला मान्यवरांच्या उपस्थितीत मोक्षदाह नाटकाने उत्साहात प्रारंभ झाला. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा महोत्सव सुरू झाला आहे. यात राज्यभरातील संघांकडून चौदा नाटके सादर होणार आहेत. राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन झाले. अभिनेत्री शीतल अहिरराव, अपोलो रुग्णालयाचे मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी दीपेटू पांडा यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातर्फे मोक्षदाह नाटक सादर झाले. डॉ. सोमनाथ सोनवलकर लिखित व अलका जाधव-गांगुर्डे दिग्दर्शित या नाटकात राकेश भंडारी, नलिनी जाधव, प्रशांत सोनवणे व अलका गांगुर्डे यांच्या भूमिका होत्या.
कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावर व्याख्यान
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या 104 व्या वर्धापन दिनानिमित्त परशुराम साईखेडकर नाट्यगृहात लेखिका मुक्ता चैतन्य यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि शिक्षण या विषयावर विचार मांडले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके होते. यावेळी मुक्ता चैतन्य यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता हा मुद्दा अधोरेखित करताना गेल्या वीस वर्षांत तंत्रज्ञानात झालेला बदल व त्याचा धोका याबाबत विस्तृतपणे मार्गदर्शन केले. येणार्‍या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेबरोबर कृतियुक्त शिक्षण गरजेचे असणार आहे, असे त्या म्हणाल्या. संस्थाध्यक्ष प्रा. फडके यांनी संस्थेच्या इतिहासात योगदान देणार्‍या अनेक गुरुजनांचे व देणगीदारांचे ऋण व्यक्त केले. उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, अ‍ॅड. जयदीप वैशंपायन, कार्यवाह राजेंद्र निकम, शिक्षक मंडळ अध्यक्षा नंदा पेटकर आदी उपस्थित होते.
वासंतिक उत्सवात सुरांचा जागर
येथील श्री दुर्गा महिला संस्थेचा वासंतिक उत्सव नुकताच उत्साहात झाला. त्याचे मुख्य आकर्षण सगुण-निर्गुण ही शास्त्रीय व भक्तिसंगीताची मैफल ठरली. सुप्रसिद्ध गायक प्रीतम नाकील यांनी आपल्या गायकीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रारंभी त्यांनी राग मालकंस सादर करून मैफलीची उंची वाढवली. त्यानंतर यमन रागातील भजनांची सुरेख मेडली सादर केली. कानडा राजा पंढरीचा, राजस सुकुमार, विष्णुमय जग, राम का गुणगान, बाजे रे मुरलीया, लक्ष्मी वल्लभ, उड जायेगा हंस आणि सुनता है गुरुज्ञानी यांसारख्या लोकप्रिय भक्तिगीतांनी चैतन्य निर्माण केले. त्यांना सुधन्वा चिपळूणकर यांनी साथ दिली. संस्थेच्या अध्यक्षा हिरा कुलकर्णी यांनी नाकील व त्यांच्या सहकार्‍यांचा सत्कार केला. नाकील यांच्या हस्ते डॉ. अंजली कुलकर्णी यांचा सन्मान झाला.
आनंदे गावे गाणे मैफल रंगली
बाबाज् थिएटर्सतर्फे आयोजित आनंदे गावे गाणे या आठवणीतील भावगीतांच्या मैफलीत सुरेल स्वरांची बहार अनुभवायला मिळाली. शंकराचार्य न्यासाच्या कुर्तकोटी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात गायक नरेंद्र टोंगळे आणि गायिका अपर्णा देशपांडे यांनी सादर केलेल्या गीतांनी रसिकांना जुन्या सुवर्णकाळात नेले. संगीतप्रेमींसाठी दर महिन्याच्या पहिल्या तारखेला या मोफत मैफलीचे आयोजन केले जाते. यात सादर करण्यात आलेल्या भावगीतांनी उपस्थित रसिकांना भुरळ घातली. कार्यक्रमाची सुरुवात अपर्णा देशपांडे यांच्या ‘उंच माझा झोका’ या गीताने झाली. त्यानंतर नरेंद्र टोंगळे यांनी ‘बगळ्यांची माळ फुले’ सादर करत वातावरणात सुरांची उधळण केली. जुन्या मराठी भावगीतांच्या सादरीकरणामुळे रसिकांच्या आठवणींना उजाळा मिळत भावनांचा सुरेल प्रवास अनुभवायला मिळाला. कार्यक्रम यशस्वितेसाठी बाबाज् थिएटर्सचे अध्यक्ष प्रशांत जुन्नरे, कैलास पाटील, प्रा. डॉ. प्रीतिश कुलकर्णी यांनी सहकार्य केले.
‘रोटरी’तर्फे समाजसेवकांचा गौरव
रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थतर्फे व्होकेशनल अवॉर्ड-2026 पुरस्कारांचे वितरण नुकतेच झाले. कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा संकुलातील शर्मन सभागृहात झालेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रांत सामाजिक कार्य करणार्‍या समाजसेवकांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी दिल्लीतील राष्ट्रीय हातमाग आणि हस्तकला विकास परिषदेचे कार्यकारी संचालक व्ही. पी. ठाकूर यांना लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड-2026 प्रदान करण्यात आला. क्लबचे अध्यक्ष आशिष चांडक यांनी रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थच्या उपक्रमांची माहिती दिली. संस्थेशी नव्याने जोडलेल्या सदस्यांची ओळख करून देत त्यांचा सत्कार करण्यात आला. समाजात निःस्वार्थ भावनेने कार्य करणार्‍यांचा सन्मान करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

 

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बोल्डनेस आणि ’ती’

इतकेच नव्हे, तर मद्याच्या धुंदीत पोलिसांच्याच अंगचटीला जाणार्‍या या तरुणींनी नंतर त्यांच्यावरच अतिप्रसंगाचा गुन्हा दाखल…

21 hours ago

एकच धर्म-निसर्ग धर्म

सुख, शांतता, समाधान जिथे मिळते त्याला धर्म म्हणतात. धारण केला जातो तो म्हणजे धर्म. भारतीय…

21 hours ago

स्वतःसाठी थोडं जगा..!

स्त्रीने तिचा स्वाभिमान जपायला हवा...आणि तुम्हाला स्वतःचा अभिमानही वाटला पाहिजे...स्त्री ही अशी शक्ती आहे.संपूर्ण जगाला…

21 hours ago

गुन्हेगारीकडे नेणारे यशाचे शॉर्टकट्स

यशाची नशा आणि दिखावा मनुष्याला न्यायालयाची पायरी चढायला भाग पाडतात. हे लोभाचे चक्र आहे, ज्यामुळे…

21 hours ago

परिवर्तनाकडे नेणारी कलाकृती- निळी सावळी नव्हाळी

आयुष्यातील उलाघाली, स्थित्यंतरे, जगण्याची विविध व्यवधाने अनुभवत असताना कवी नेहमी त्याच्या कवितेमधून डोकावत असतो. किंबहुना…

21 hours ago

मनाचा निचरा आणि विचारांची शुद्धता

या जगात आपण अनेक गोष्टी शिकतो अनुभवतो कमावतो, पण तरीही मनात एक पोकळी राहते. मनुष्य…

21 hours ago